हवामान विभागाकडून नेहमीच्या अंदाजांबरोबरच आता पर्यटकांसाठी खास हवामानाचा अंदाज देण्यात येत असून, त्यासाठी देशभरातील ८८ मोजक्या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांबरोबरच महाबळेश्वर, नाशिक, सोलापूर, परभणी या शहरांचासुद्धा समावेश आहे.
सर्वच प्रगत देशांसह अनेक देश पर्यटनस्थळांच्या हवामानाचा अंदाज देतात. त्या ठिकाणांना भेटी देण्यासाठी हे अंदाज सोयीचे ठरतात. आता भारतातही त्याची सुरुवात झाली आहे. देशात हवामानाच्या विविधतेनुसार ३६ उपविभाग ठरवण्यात आले आहेत. या उपविभागांचे हवामान तसेच, एकूण देशासाठी हवामानाचा अंदाज दिला जातो. याचबरोबर वेगवेगळय़ा शहरांसाठी स्थानिक पातळीवरही हवामानाचा अंदाज दिला जातो. या सर्व सेवा हवामान विभागाकडून पुरवल्या जातात. आता त्यात पर्यटनस्थळांची भर पडली आहे. ही सेवा नव्यानेच सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील http://202.54.31.7/citywx/touristwx.php  या पत्त्यावर विविध पर्यटनस्थळांचा अंदाज पाहणे शक्य होणार आहे.
उत्तराखंड येथे ढगफुटीमुळे झालेली दुर्घटना व त्यात काही हजार यात्रेकरूंचे प्राण गेल्याच्या पाश्र्वभूमीवर ही सेवा तातडीने सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सध्या त्या ठिकाणाचे तापमान, सूर्योदय, सूर्यास्त, पावसाचा अंदाज तसेच, पुढील चार दिवसांच्या तापमानाचा अंदाजही दिला जात आहे. त्यामुळे या ठिकणांना भेटी देण्यापूर्वी तेथील हवामानाची स्थिती नेमकी कशी असेल, तिथे पाऊस सुरू आहे का, पुढच्या काही दिवसात तापमानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे का, याची माहिती पर्यटकांना मिळू शकते. सध्या देशातील एकूण ८८ ठिकाणांच्या हवामानाचा अंदाज देणे सुरू करण्यात आले आहे. त्यात जम्मू-काश्मीरपासून केरळपर्यंत सर्व राज्यांमधील निवडक ठिकाणांचा समावेश आहे. लक्षद्वीप बेटांवरील मिनिकॉय आणि अंदमान-निकोबारवरील पोर्ट ब्लेअर या ठिकाणांचाही त्यात समावेश आहे. या निवडक ८८ ठिकाणांमध्ये सर्वात जास्त ठिकाणे महाराष्ट्रातील आहेत. याशिवाय आणखीही काही ठिकाणांचा या सेवेत समावेश करण्यात येणार आहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.