पाकिस्तानी हॅकर्सकडून पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचे आणि जनवाणी संस्थेचे संकेतस्थळ हॅक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संकेस्थळावर अवमानकारक मजकूर टाकण्यात आला होता. याप्रकरणी जनवाणी संस्थेकडून पुणे सायबर शाखेकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
भारतातील शासकीय संकेतस्थळ १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानी हॅकर्सकडून हॅक करण्यात आल्याचे आढळून आले आहे. मुंबई महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल), एका मंत्र्याचे खासगी संकेस्थळ, पुणे वाहतूक शाखा, जनवाणी संघटना यांच्या संकेतस्थळाचा समावेश आहे. हॅकर्सनी या संकेतस्थळावर भारताबद्दल अवमानकारक मजकूर टाकला होता. त्याच बरोबर ‘हॅपी इंडिपेन्डन्स डे’ असा मजकूर अपलोड केला होता. याबाबत माहिती झाल्यानंतर तत्काळ संकेस्थळाची सुरक्षितता करण्यात आली आहे. फेसबुकवर ‘क्रिप अॅट लोकल होस्ट’ नावाने अकाउंट असून यावर हॅकर्सनी पुणे वाहतूक शाखा, एमटीएनएल आणि जनवाणी संस्थांची संकेस्थळं हॅक केल्याचे म्हटले आहे.
 याबाबत जनवाणी संस्थेच्या स्नेहा जाजू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांचे संकेस्थळ हॅक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्याचबरोबर सायबर पोलिसांकडे तक्रार केल्याचे ही सांगितले. ‘पाकिस्तानी हॅकर्स १४ ऑगस्टच्या सुमारास भारतीय संकेस्थळ हॅक करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे याकाळात शासकीय संकेतस्थळाच्या सुरक्षिततेचा सायबर तज्ज्ञाकडून आढावा घेण्याची आवश्यकता आहे,’ अशी माहिती सायबर तज्ज्ञानी दिली.
पुणे वाहतूक शाखेचे संकेस्थळ हॅक झाल्याबद्दल वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी संकेस्थळ हॅक झाल्याचा प्रकार घडला होता. त्याबाबत सायबर शाखेला कळविण्यात आले होते. त्याचबरोबर वाहतूक शाखेचे संकेस्थळ चालविण्याचे काम करणाऱ्या जनवाणी संस्थेला संकेतस्थळाची सुरक्षितता वाढविण्यास सांगितले होते. आता वाहतूक शाखेचे संकेस्थळ शासनाच्या ‘नॅशनल इन्फर्मेशन सेंटर’  याच्याकडे देण्यात आहे. सध्या पुणे वाहतूक पोलिसांचे संकेस्थळ व्यवस्थित सुरू आहे.