राज्यात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा उद्या (१ डिसेंबर) पासून सुरू होत आहेत. मात्र, करोनाचा नवा विषाणू ‘ओमायक्रॉन’च्या संसर्गाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नाशिक, ठाणे, पुण्यासह अन्य काही मोठ्या शहरांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय तूर्त लांबणीवर टाकला गेला आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली.

एक डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग सुरू होणार ; शिक्षण विभागाने जाहीर केली नियमावली!

उपमुख्यमंत्री म्हणाले, “शाळेच्या संदर्भात मागील वेळी आपण निर्णय घेतला त्यावेळी एवढी तीव्रता नव्हती. म्हणूनच कार्तिकी एकादशीला आपण सर्वांना मूभा दिली. परंतु आता सगळे म्हणत आहेत की, हा नवा व्हेरिएंट तीव्र गतीने फैलावतो, त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू करू नये असं ठरवण्यात आलं आहे. मुंबईतही तसं ठरवलं आहे आणि त्या त्या भागात तशा पद्धतीने ठरवायचं”

पुण्यात पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती!

तसेच, “मी जिल्हाधिकाऱ्यांना दुपारी सांगितलं आहे की, या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यात जो निर्णय घेतला जाईल, त्याची अंमलबजावणी पुण्यात देखील करा. त्यामुळे पुणेकरांना कदाचित असं वाटू शकतं की शनिवारी बैठक झाली तेव्हा एक सांगितलं गेलं आणि आज मंगळवारी वेगळा आदेश निघतो. याचं कारण या चार दिवसांमध्ये या विषाणूच्या संदर्भात बऱ्याच केसेस वाढलेल्या आहेत. म्हणून हा निर्णय आपल्याला घ्यावा लागत आहे.”

याचबरोबर, “मावळते मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राने का नाकारला हे तपासून पाहावं लागेल कारण यापूर्वीच्या मुख्य सचिवांना दोनदा मुदतवाढ मिळाली होती मुख्यमंत्र्यांशी बोलूनच अधिकचं भाष्य करेन.” असंही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.