पुणे शहर आणि जिल्ह्य़ात गेल्या वर्षभरात सापडलेल्या तब्बल २५३९ सापांना आणि ४९८ प्राणी-पक्ष्यांना ‘वाईल्ड अॅनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी’च्या सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे.
जीवदान मिळालेल्या सापांमध्ये ४९७ नाग, ३७६ घोणस, ३३० मण्यार, ३७ फुरसे, १२ चापडा या विषारी सापांबरोबर ५२४ धामण, २७० तस्कर, १४६ दिवड, ९७ गवत्या, ६२ कवडय़ा, ५३ मांडुळ, ८ अजगर, ३४ कुकरी, ३२ धुळनागीण, १९ चित्रांग नायकुळ, ११ हरणटोळ, १८ डुरक्या घोणस, ३ विटेकरी बुवा आणि ७ मांजऱ्या या बिनविषारी सापांचाही समावेश आहे. याशिवाय अल्बिनो तस्कर, अल्बिनो कवडय़ा, अल्बिनो नाग आणि अल्बिनो गवत्या या दुर्मिळ सापांनाही जीवदान मिळाले आहे. जीवदान देण्यात आलेले १२९ साप गारूडय़ांकडून जप्त करण्यात आले आहेत.
सापांबरोबरच वन्य प्राणी आणि पक्ष्यांचेही मानवी वस्तीत येऊन जखमी व्हायचे प्रमाण वाढले असल्याचे संस्थेच्या आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. ९४ घारी, ८६ घुबड, ३४ पोपट, ७ मोर, ८ बगळे, १३ बदके, १२० पारवे, ९० कोकिळा, ११ शिक्रा, ३ ससाणे, २ हरीण, ९ वटवाघळे, १ रोहित पक्षी आणि १३ घोरपडी या जखमी प्राणी-पक्ष्यांना वाचवण्यात आले आहे.
सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद कांबळे, संस्थापक संतोष थोरात, हेमंत शेळके, सुरेश चव्हाण, सोमनाथ खडके, सारंग देवकर, मंगेश कस्तुरे, गणेश भुतकर, गणेश माने, गणेश कबाडे, प्रसाद गोंड यांच्यासह दीडशे सर्पमित्रांनी ही कामगिरी बजावली आहे.
घरात अथवा मानवी वस्तीच्या आसपास साप किंवा वन्यप्राणी आढळल्यास ९८५००६०५७६, ८६०५९८११७८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.