पुण्यामधील कोथरुड भागातील महात्मा सोसायटीमधील नागरिकांसाठी आजची सकाळ आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. या सोसायटीमध्ये आज सकाळच्या सुमारास एक गवा सदृश्य प्राणी दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. प्रामुख्याने जंगलांमध्ये आढळून येणारा हा प्राणी लोकवस्तीमध्ये दिसून आल्याने गोंधळ उडाला. या गव्याला पकडताना वन खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.

कोथरुड सारखी दाट लोकवस्ती असणाऱ्या भागामध्ये हा प्राणी दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहराच्या मध्य भागात गवा सदृश्य प्राणी कसा पोहचला यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा स्थानिकांमध्ये रंगल्याचे चित्र दिसत आहे. या भागामध्ये सध्या या गव्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असल्याचंही सांगितलं जात आहे.

मानवी वस्तीत आलेल्या या जंगली प्राण्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करण्यात आला. सकाळी साडेअकराच्या सुमारास वन अधिकारी या ठिकाणी दाखल झाले. तोपर्यंत गवा उजवी भुसारी कॉलनीमधील एका सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये शिरला. लोकवस्तीमध्ये शिरल्याने काही ठिकाणी धडक दिल्याने गव्याच्या तोंडाला काही प्रमाणात दुखापत झाली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांची या गव्याला पकडताना चांगलीच दमछाक झाली. वन अधिकारी या गव्याचा पाठलाग करत असतानाच तो पौड रोड वरील मुख्य रस्त्यावर पोहचला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर काहींनी त्याला पाहण्याससाठी गर्दी केली. वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोरीच्या मदतीने पकडण्याचे प्रयत्न सुरू केले.

दोरीच्या मदतीनेही गवा ताब्यात येत नव्हता. गव्याला इंजेक्शन देण्यात आले आहे. तरी देखील वन कर्मचाऱ्याच्या अधिकार्‍यांना गव्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं नव्हतं. गवा अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना कोणत्याही प्रकारची दाद देत नव्हा. त्यामुळे जाळीच्या मदतीने त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर दुपारी साडेबाराच्या सुमारास गव्याच्या तोंडावर कापड टाकून त्याला शांत करण्यात वन अधिकाऱ्यांना यश आलं.