सर्वच महिलांमध्ये खूप शक्ती असते. त्यांच्यातील उपजत गुणांना वाव दिल्यास त्याही कर्तृत्व सिद्ध करतात. मात्र, पुरुषप्रधान संस्कृतीचे भय त्यांच्या मनावर असते. महिलांनीच एकमेकींना आधार दिला, तर त्या भयमुक्त होतील. एकल महिलांसाठी ‘वंचित विकास’ने सुरू केलेल्या अभया मत्री गटातून त्यांना हा आधार मिळत असल्याचे पाहून आनंद वाटतो, असे मनोगत चेतना महिला विकास केंद्राच्या कार्यकारी अधिकारी अॅड. असुंता पारध्ये यांनी व्यक्त केले.
‘वंचित विकास’च्या अभया मत्री गटाच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘अभया सन्मान-२०१६’ प्रदान सोहळय़ात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी सोस्वा संस्थेच्या कार्यकारी अधिकारी परिणीता कानिटकर, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर, अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका सुनीता जोगळेकर, मीना कुल्रेकर, अभया मत्री गटाच्या प्रमुख नीलिमा शिकारखाने, देवयानी गोंगले आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत यशस्वी झालेल्या सविता तरडे, अनिता निकम, कल्पना मते, मंगला गुराळ, आशा मिरीकर, छाया पवार, शोभा िशदे, शोभना मंत्रवादी, मीना भागवत, गोदावरी भावले, रंजना बलकवडे, भारती शेलार, मंदाकिनी डाखवे, संगीता सलवाजी, निर्मला शेटे आणि अंजली उमराणी या सोळा जणींना कार्यक्रमात मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
असुंता पारध्ये म्हणाल्या, ‘‘महिला-पुरुषांतील भेदभावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करीत आहोत, मात्र कालानुरूप भेदभावाच्या व्याख्याही बदलत आहेत. सासरी त्रास झाल्यावर माहेरच्यांकडूनही योग्य ती साथ मिळत नाही. अशा वेळी एकटीने कोर्टकचेरी करणे जिकिरीचे असते. तिथेही त्यांना साहाय्य करणारी चांगली यंत्रणा अद्यापही नाही. कायदा हा महिला सक्षमीकरणाचा एक चांगला पर्याय आहे. मात्र, या लढाईत महिलेला कोणाचा तरी आधार हवा असतो. तो आधार आपणच एकमेकींना दिला पाहिजे. ज्येष्ठ नागरिक महिलांचे वेगळे प्रश्न आहेत. त्यांनाही आधाराची गरज असते. अशा वेळी सोस्वा, अभया, चेतना अशा मत्री गटांची चांगली मदत होत आहे. त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती होत आहे. अडचणीत असलेल्या महिलांना आधार देण्यासाठी अशा गटांबरोबरच शासकीय पातळीवर आधारगृह उभारावेत. महिलांवरील िहसाचाराचा प्रश्न सोडविण्यासाठी पुरुषांनीच पुढाकार घेतला पाहिजे.’’
परिणीता कानिटकर म्हणाल्या, ‘‘आपल्याकडे एकल महिलांची संख्या मोठी आहे. मात्र, त्यांचा समावेश शासन धोरणात नाही. त्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत. सध्याचा जमाना धावपळीचा असल्याने कुटुंबव्यवस्था डळमळीत होत आहे.
ती सावरण्याची जबाबदारीही महिलांवरच असते. भौतिक सुखे मिळाली, तरीही महिला खऱ्या अर्थाने सक्षम झालेली नाही. ग्रामीण, शहरी, नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्यामुळे हे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा-तालुका पातळीवर आधारगट उभे केले पाहिजेत. त्यातून प्रश्नांना वाचा फुटेल, महिला निर्भय बनतील आणि सन्मानाने जगतील.’’
विलास चाफेकर म्हणाले, ‘‘स्त्री-पुरुष समानता ही केवळ आपल्या ओठांच्या सीमेवर बंदिस्त आहे. माझ्या आईचे जगणे मला अत्यंत जवळून पाहता आले. त्यातूनच महिलांच्या या कार्याची सुरुवात झाली. पुरुष भ्याड असतो.
त्यामुळे महिलांनी वेळीच अत्याचाराचा प्रतिकार केला, तर पुन्हा पुरुष त्यांच्या वाटेला जाणार नाही. विधवा, परित्यक्तांनी स्वत:ला अपराधी न मानता मानाने जगायला हवे. स्त्रिया हुशार असतात, त्यांचा मार्ग त्या शोधतात. गरज असते, ती फक्त त्यांना दिशा दाखविण्याची, पािठबा देण्याची. लहानपणापासूनच स्त्री-पुरुष समानतेचा धडा गिरवला पाहिजे. त्यातून हा भेदभावाचा अडथळा दूर होईल.’’
विजयकुमार मर्लेचा यांनीही मनोगत व्यक्त केले. नीलिमा शिकारखाने यांनी अभया मत्री गटाविषयी माहिती दिली. प्रतिभा िशदे, मीनाक्षी नागरे, उज्ज्वला कुलकर्णी, स्नेहल मसालिया, चत्राली वाघ यांनी मानपत्रवाचन केले. देवयानी गोंगले यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women need to support other women says adv assunta pardhe
First published on: 05-05-2016 at 05:09 IST