शिक्षणानं बाईचं सक्षमीकरण केलं हे काही उदाहरणांमधून दिसून येतं. बंजारा समाजातील शंकुतला चव्हाण यांचा संघर्षही काहीसा असाच आहे. त्यांना शिक्षणामुळे आत्मविश्वास मिळाला. त्या बळावर त्यांनी लहान वयात होणाऱ्या लग्नाला विरोध करून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाच्या जोरावर बंजारा समाजातील एका तांड्यावर ( जिल्हा : परभणी, तालुका : सोनपेठ) काही हजार लोक वस्तीमध्ये राहणाऱ्या शकुंतला चव्हाण या आज पुण्यातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात गृहपाल म्हणून, मागील बारा वर्षापासून काम पाहत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक महिला दिनानिमित्त या शकुंतला चव्हाण यांनी त्यांचा आजपर्यंतचा जीवन प्रवास लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना उलगडून दाखवला. शकुंतला चव्हाण म्हणाल्या, ‘मी बंजारा समाजातील. परभणी जिल्हा सोनपेठ तालुक्यातील एका लमान तांडयावर काही हजार लोक वस्तीमध्ये राहायचे. माझ बालपण गावाकडे गेलं आहे. आमची दोन एकर शेती आणि त्यावर आमचं घर चालत होतं. मी खूप शिकाव, अस आई बाबांना वाटत राहत होते. त्यामुळे सुरुवातीला गावांमध्ये पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पण त्या पुढचं शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी होतं. गावापासून तालुक्याचं ठिकाणी सात किलोमीटर अंतरावर होतं. एवढ अंतर कसं जाणार? असा प्रश्न आई बाबांच्या मनात आला. त्यावर मी म्हटलं की ‘मी काही झाले, तरी शाळेत जाणार’. त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी शाळेला जायचं ठरलं. तेव्हा गावातील आम्ही पाच ते सहा जण चालत सात किलोमीटर जायचो आणि पुन्हा तेवढच अंतर येत चालत येत असतं. शाळेला जायला किमान दीड लागत होता. पण आम्ही सर्व हसत खेळत जात असल्याने खूप लांब अंतर असल्याचं केव्हाच जाणवलं नाही. पुन्हा घरी येऊन आम्ही अभ्यास करायचो. अस करीत पुढचं शिक्षण चालू राहिल. याच दरम्यान दहावीची परीक्षा झाली. तेव्हा घरातील वडिलधारी मंडळी आता मुलीच लग्न करून टाक, पुढच्या शिक्षणाला बाहेर कशाला बाहेर पाठवतो. असं सतत म्हणत राहिले. पण त्याकडे आई बाबांनी दुर्लक्ष करीत, मी माझ्या मुलीला उच्च शिक्षित करणार असल्याचे ठामपणे सांगितलं. तेव्हा लग्नाची चर्चा थांबली. त्यानंतर दहावी, बारावी, बी.ए, एम.एस.डब्ल्यू. अस शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मला शासनाच्या आदिवासी मुलींच्या वसतीगृहाच्या गृहपाल म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जर माझ्या आई बाबांनी घरातील इतर मंडळीचं लग्नाचं ऐकलं असतं, तर माझ शिक्षण आणि शासनाच्या सेवेत येता आले नसते. त्यामुळे माझ्या आजपर्यंतच्या यशाचे सर्व श्रेय आई बाबांना जाते,’ हे सांगत असताना त्यांना अश्रू अनावर झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens day struggle story of a woman who working in girl hostel bmh 90 svk
First published on: 08-03-2020 at 11:42 IST