महापालिकेतील अधिकाऱ्यांनी मराठीतून स्वाक्षरी करावी, घरे व इमारतींची नावे मराठीतून असावीत, मराठी भाषा प्रसारासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावीत, आदी सूचना मराठी भाषा संवर्धन समितीच्या बैठकीत शुक्रवारी केल्या जात होत्या आणि त्याचवेळी महापौर वैशाली बनकर यांनी बैठकीच्या उपस्थितीपत्रकावर इंग्रजीऐवजी मराठीतून स्वाक्षरी करून समितीच्या कामकाजाची सुरूवात करून दिली.
पुणे महापालिकेने मराठी भाषा संवर्धन समिती स्थापन केली असून या समितीच्या कामासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात दहा लाखांची तरतूदही करण्यात आली आहे. समितीची पहिली बैठक शुक्रवारी बोलावण्यात आली होती. उपस्थित सदस्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी मराठी भाषा संवर्धनाबाबत विविध सूचना केल्या. डॉ. न. म. जोशी, डॉ. विद्यागौरी टिळक, अनिल गोरे, सुधीर नारखेडे, श्याम भुर्के, संजय भगत, प्रदीप निफाडकर हे समितीचे सदस्य या वेळी उपस्थित होते. शहरातील घरे, इमारतींची नावे मराठीतून असावीत, महापालिकेतील अधिकाऱ्यांनी मराठीतून स्वाक्षरी करावी, मराठी शब्दकोष विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावीत आदी अनेक सूचना यावेळी सदस्यांनी केल्या. मराठी साहित्य परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्षा माधवी वैद्य यांची समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करावी, असाही निर्णय या वेळी घेण्यात आला.
ही बैठक सुरू असताना स्वाक्षरीसाठी उपस्थितीपत्र सदस्यांसमोर ठेवले जात होते. महापौर बनकर यांनी या उपस्थितीपत्रकावर मराठीतून स्वाक्षरी करून मराठी स्वाक्षरीला स्वत:पासून सुरूवात केली. बैठकीची माहिती पत्रकार परिषदेत देताना त्या म्हणाल्या की, मी स्वत:पासूनच या कामाला सुरूवात केली आहे. मराठी संवर्धनाबद्दल अनेक चांगल्या सूचना आल्या आहेत. त्यासाठी पाच सदस्यांची एक उपसमितीही नियुक्त करण्यात आली आहे. ही उपसमिती दर पंधरवडय़ाला समितीच्या कामाचा आढावा घेणार आहे.