पुणे : शहरातील गरीब नागरिकांना कमी खर्चात आरोग्य सुविधा देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाने वेग घेतला आहे. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागेत हे वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात असून, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत इमारतीच्या दोन भागांचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न महापालिकेचा आहे.
महापालिकेच्या वतीने वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी केली जात आहे. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक त्या नियमांची पूर्तता करीत नसल्याचा ठपका ठेवून राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने महापालिकेला नोटीस पाठविली होती. महाविद्यालयात असलेल्या पायाभूत सुविधांचा अभाव, प्राध्यापकांची कमतरता, अपूर्ण आकृतीबंध या त्रुटींबाबत जाब विचारला होता. अनेकदा सूचना देऊनही या त्रुटी दूर करण्यासाठी कार्यवाही होत नसल्याने महाविद्यालय बंद का करू नये? तसेच एक कोटी रुपयांचा दंड का ठोठावू नये? अशी विचारणा केली होती. या पार्श्वभूमीवर हा विषय गांभीयाने घेऊन महापालिकेने पावले उचलली आहेत.
महाविद्यालयातील त्रुटींबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी गेल्या आठवड्यात वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन तेथील कामांचा आढावा घेतला होता. महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी देखील यामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नायडू रुग्णालयाच्या परिसरातील दोन भागांचे काम ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर विद्यार्थी वसतिगृह, महाविद्यालयाच्या स्वतंत्र रुग्णालयाचे कामदेखील पूर्ण केले जाणार आहे.
दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती करण्याच्या प्रक्रियेला महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. यापूर्वी महापालिकेने अनेकदा जाहिराती दिल्यानंतरही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे प्राध्यपकांची भरती ११ महिन्यांसाठी न करता अधिक काळासाठी करता येईल का? याची चाचपणी प्रशासनाने सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा उपकरणे, ग्रंथालय आणि डिजिटल लर्निंग साधनांची खरेदी प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.