नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी काउन्सिल आणि डायरेक्टोरेट ऑफ स्टीम बॉयलर्स यांच्यातर्फे ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी बॉयलर्स संदर्भातील राष्ट्रीय कार्यशाळेचे चिंचवड येथील ऑटो क्लस्टर डेव्हलपमेन्ट अॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट येथे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन आज सकाळी ९.४५ वाजता होणार आहे.
या कार्यशाळेमध्ये बॉयलर इंडस्ट्रीशी निगडित असलेल्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. चर्चेमध्ये समोर आलेल्या मुद्यांवर अभ्यास करुन नंतर त्याचा शोधनिबंध तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी काउन्सिलचे महासंचालक हरभजन सिंह यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. कार्यशाळेमध्ये बॉयलर्समधील नवीन तंत्रज्ञान, या क्षेत्रातील नवीन संधी आणि आव्हाने यांच्याबरोबरच विविध प्रकारच्या बॉयलर्सवरही चर्चा करण्यात येणार आहे. कार्यशाळेमध्ये बॉयलर इंडस्ट्रीतील कर्मचारी, व्यावसायिक, भागीदार आणि या इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या सुमारे दोनशे व्यक्ती सहभागी होणार आहेत. उद्घाटनप्रसंगी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष एस. के. जैन उपस्थित राहणार आहेत.