आज जागतिक मानसिक आरोग्य दिन

पुणे : कौटुंबिक कलह, वाढते ताणतणाव आणि जीवघेणी स्पर्धा यातून नैराश्येच्या गर्तेत असलेल्या व्यक्ती अनेकदा आत्महत्येचा पर्याय निवडण्याची भीती असते. अशा व्यक्तींचे दु:ख केवळ ऐकून त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला तरी आत्महत्येपासून त्यांना परावृत्त करता येऊ शकते. गेल्या तेरा वर्षांपासून ‘कनेक्टिंग’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत आत्महत्येच्या विचारांनी ग्रासलेल्या व्यक्तींना त्यापासून परावृत्त करण्याचे काम केले जात आहे.

१० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. ‘आत्महत्या रोखण्यासाठी एकत्र काम करूया’ या संकल्पनेअंतर्गत यंदा हा दिवस जगभरात साजरा होत आहे. अर्नवाज दमानिया यांच्या पुढाकारातून २००५ मध्ये ‘कनेक्टिंग’ या स्वयंसेवी संस्थेचा जन्म झाला. २००९ पासून संस्थेने हेल्पलाइन क्रमांक सुरू करून आत्महत्येच्या विचारांनी ग्रस्त व्यक्तींना संवादाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ईमेलद्वारे देखील अनेक व्यक्ती आपल्या नैराश्येला वाट मोकळी करून देतात. हेल्पलाइनच्या मदतीने दररोज बारा ते आठ या वेळेत गरजू व्यक्तींशी संवाद साधला जातो. या क्रमांकावर संपर्क करणाऱ्या व्यक्तींना त्यांचे नाव, पत्ता अशी ओळख विचारली जात नाही. दररोज किमान दहा ते बारा व्यक्ती या हेल्पलाइनशी संपर्क साधतात.

कनेक्टिंगचे स्वयंसेवक वीरेन राजपूत म्हणाले, आजपर्यंत तब्बल पंचवीस हजार व्यक्तींनी आत्महत्येचे विचार मनात येतात म्हणून कनेक्टिंगशी संपर्क साधला आहे. पंधरा ते एकोणतीस वर्षे वयाच्या मुलामुलींचे सर्वाधिक दूरध्वनी येतात. काही प्रमाणात ज्येष्ठ नागरिक देखील संपर्क करतात. संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणे हेच आमचे धोरण असते. स्वयंसेवकांना देखील समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून घेण्याचे प्रशिक्षण देतो. केवळ ऐकून घेण्यातून देखील अनेक व्यक्ती आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त होतात, तसे पुन्हा संपर्क साधून कळवतात देखील. संपर्क करणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी इच्छूक व्यक्तींना कनेक्टिंगतर्फे स्वयंसेवक म्हणून प्रशिक्षण दिले जाते. आठवडय़ातील चार तासांचा वेळ स्वयंसेवकांनी कामासाठी द्यावा ही अपेक्षा असते.

संपर्कासाठी..

१८००-८४३-४३५३ किंवा ९९२२००११२२ या क्रमांकावर दुपारी बारा ते रात्री आठ या वेळेत संपर्क साधून गरजू व्यक्ती आपले मन मोकळे करू शकतात.

(connectingngo@gmail.com) या क्रमांकावर ईमेल पाठवू शकतात.