प्रत्येकालाच संगीत या विषयाचे आकर्षण असते. अगदी सर्वाना तालासुरात गाता येत नसले तरी, प्रत्येक जण आपल्या आवडीचे गाणे गुणगुणतो. एवढेच नव्हे, तर स्नान करताना गायनाचा छंद पुरा करणारे ‘बाथरुम सिंगर’ तरी असतो. अशा प्रत्येक सामान्य नागरिकाला संगीताच्या तालावर गीत गायनाची संधी बुधवारी (१९ नोव्हेंबर) उपलब्ध झाली आहे.
विश्व नागरिक गायन दिन (सिंगिंग डे) बुधवारी साजरा होत आहे. सर्व प्रसिद्ध गायक-वादक कलाकारांना मायबाप प्रेक्षकांनी नाव, प्रतिष्ठा आणि वैभव मिळवून दिले. हे ‘प्रेक्षकांचे देणं’ फेडण्यासाठी ‘मॉम इंडिया’तर्फे बारा तासांचा गायन दरबार आयोजित करण्यात आला आहे. घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू  सांस्कृतिक केंद्र येथे प्रसिद्ध अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. शहरातील सर्व वाद्यवंृद कलाकारांतर्फे मोहन जोशी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अनेक नागरिकांच्या अंगी उत्तम कलागुण असूनही त्यांना रंगमंचावर संधी मिळत नाही, अशा सर्वाना या उपक्रमामध्ये सहभागी होता येईल. सलग बारा तासांच्या कार्यक्रमामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर कोणालाही थेट रंगमंचावर आपल्या आवडीचे गाणे सादर करण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी निवडलेले गाणे, त्याचे स्केल आणि गीताचे बोल याचा सराव करण्याची सोय रंगमंचाजवळ करून देण्यात आली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी वयाची अट नाही, की कोणत्याही स्वरूपाचे प्रवेश शुल्क नाही. मात्र, मनापासून गाण्याची इच्छा असलेल्या सर्वाना १९ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून खुल्या प्रवेशिका उपलब्ध होणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना गीत सादरीकरणासाठी काही प्रवेशिका राखीव ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मोहनकुमार भंडारी यांनी दिली. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ८८८८२११११३ किंवा ९८२२२६७९९७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.