शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना झाला, तरीही महापालिका शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना अद्यापही पुस्तके मिळालेली नाहीत. विद्यार्थ्यांचा अभ्यास गेला दीड महिना पुस्तकांशिवाय सुरू असून विद्यार्थ्यांचे त्यामुळे नुकसानही होत असल्याकडे महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके द्यायला उशीर झाल्यामुळे निविदा न मागवता या पुस्तकांची खरेदी करावी, असा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. निविदा न मागवता बालभारतीधून आवश्यक तेवढय़ा पुस्तकांची खरेदी करावी असा निर्णय झाल्यानंतरही  विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मनीषा चोरबेले यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधणारे पत्र आयुक्तांना दिले असून महापालिका शाळातील विद्यार्थ्यांकडून चांगल्या गुणवत्तेची अपेक्षा धरली जात असताना आणि विद्यार्थी देखील तशाप्रकारे चांगले यश मिळवत असताना त्यांना वेळेवर पुस्तके दिली जाऊ नयेत, ही बाब खेदजनक आहे, असे चोरबेले यांनी या पत्रात म्हटले आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश, इतिहास, भूगोल ही पुस्तके अद्यापही वितरित करण्यात आलेली नाहीत. विद्यार्थ्यांवर पुस्तकांविना अभ्यास करण्याची वेळ आली आहे. पुस्तके व अन्य शालेय साहित्य खरेदीसाठी अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद असतानाही पुस्तके का देण्यात आली नाहीत, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.