तीन दुचाकी आणि एक रिक्षा जाळली;  रिक्षा व मोटारीची तोडफोड

वडिलांनी रागवल्याने तरुणाने स्वत:च्या दुचाकीसह शेजाऱ्यांच्या दुचाकी पेटवून दिल्याची घटना जनवाडी भागात रविवारी (१८ सप्टेंबर) पहाटे घडली. त्याने शेजाऱ्यांची मोटार आणि रिक्षाची तोडफोड केली.

धीरज शंकर कटीकर (वय २२,रा.जनवाडी, गोखलेनगर)असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेजारी किसनसिंग रमेशसिंग रजपूत (वय २८) यांनी यासंदर्भात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. धीरज बेकार आहे. तो उनाडक्या करत असल्याने त्याला वडिलांनी खडसावले. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. वडिलांनी खरडपट्टी काढल्याने धीरज चिडला. रविवारी पहाटे तो घरातून बाहेर पडला. काही वेळाने तो पुन्हा घरी आला. मात्र,वडिलांनी दरवाजा न उघडल्याने तो चिडला. रागाच्या भरात त्याने स्टम्पने स्वत:च्या दुचाकीची तोडफोड केली आणि पेटवून दिली. त्यानंतर शेजारी किसनसिंग रजपूत, रोहित मोतलिंग यांची दुचाकी आणि दस्तगीर सैय्यद यांची रिक्षा  पेटवून दिली. नरसिंह महिंद्रकर यांची रिक्षा आणि फरीद मणीयार यांच्या मोटारीची काच त्याने फोडली. दुचाकींनी पेट घेतल्याने मोठया प्रमाणावर धूर झाला. त्यामुळे झोपेत असलेल्या रहिवाशांना जाग आली. रिक्षा जळताना एका नागरिकाने पाहिले. त्याने तातडीने पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी धीरज एका मोटारीची काच फोडत असल्याचे एकाने पाहिले. त्याने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस घटनास्थळी दाखल होणार असल्याची कुणकुण लागल्याने धीरज तेथून पळाला. एका मंडळाच्या मांडवात तो लपला होता. पोलिसांनी त्यााला पकडले.

जामीन मंजूर; पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई

दरम्यान, पोलिसांनी धीरजला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.  त्याच्यावर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या एका दुकानाच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने केलेल्या चित्रीकरणाची पडताळणी केली. चित्रीकरणात धीरजला वाहनांची तोडफोड करताना टिपले आहे. उपनिरीक्षक कोळी तपास करत आहेत.