आपटे रस्त्यावरील रामी ग्रॅन्ड हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा सहाव्या मजल्यावरील रुममधून पडल्याने रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. या हॉटेलच्या रुममधून सहज कोणी पडू शकत नाही, त्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात आहे याचा शोध डेक्कन ठाण्याचे पोलीस घेत आहेत.
सागर लक्ष्मण बोरगे (वय २१, रा. बोरगेवाडी, ता. पाटण, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा गेल्या एक महिन्यापासून रामी ग्रॅन्ड हॉटेलमध्ये रुम अटेन्डंट म्हणून काम करत होता. मध्यरात्री दीडच्या सुमारास खोली क्रमांक ६११ मधून स्वागत कक्षाला फोन आला. त्यांनी शॉवर जेलची मागणी केली. त्यानुसार सागरने त्या खोलीत जेल नेऊन दिले. पण, त्यानंतर तो अचानक पोर्चमध्ये वरून खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. सागरचा भाऊ चाकणला कंपनीत कामाला असून बहीण व आई-वडील गावी असतात. त्याने कराड आणि कोल्हापूर येथील हॉटेलमध्ये केटरिंगचे काम केले होते. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याचे आई-वडिलांशी फोनवर बोलणे झाले होते. त्याला कोणतेही व्यसन नव्हते, कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता, अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे.
या हॉटेलमध्ये प्रत्येक मजल्यावर छातीपर्यंत रेलिंग आहे. त्यामुळे कोणी ढकलल्याशिवाय अथवा उडी मारल्याशिवाय कोणीही व्यक्ती खाली पडू शकत नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या केली, की कोणी ढकलले याचा शोध सुरू आहे. शेवटच्या वेळी खोलीत गेलेल्या व्यक्तींचे पोलिसांनी जबाब घेतले आहेत. त्याचबरोबर त्याच्यासोबत काम करणाऱ्या दोन कामगारांकडे चौकशी केली आहे. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपासानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती डेक्कन पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एन. आर. केंचे हे अधिक तपास करत आहेत.