पुणे : सध्या सिनेमा आणि सिनेमा बनवण्याच्या तंत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. आता केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून कोणताही चित्रपट बनवणे शक्य झाले आहे. पुण्यातील एका तरूणाने अशीच एक कमाल केली आहे. पुण्यातील अक्षय काकडे या तरुणाला नुकताच ‘द आर्का गिदान प्राइझ’ (The Arca Gidan Prize) या जगप्रसिद्ध स्पर्धेत ‘वोव्हन’ (Woven) या एआय-अॅनिमेटेड लघुपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट लघुपट’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ओपन सोर्स (open-source) एआय मॉडेल्सच्या आधाराने चित्रपट निर्मिती करणाऱ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या तरुणांना चित्रपट बनवण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली जाते. या मुदतीत सर्वाधिक सृजनशील कल्पना मांडणाऱ्या स्पर्धकाला पुरस्काराने सन्मानित केले जाते. जगभरातील चित्रपट प्रेमींमध्ये हा पुरस्कार चर्चेचा विषय असतो. यंदा पुण्यातील अक्षय काकडे या तरुणाने ‘द आर्का गिदान प्राइझ’ मिळवत नावलौकिक कमवला आहे. लॉस एंजेलिस येथील ‘मॅक सेनेट स्टुडिओ’मध्ये झालेल्या कार्यक्रमात अक्षयला हा पुरस्कार जाहीर झाला.
अक्षय काकडे याने एआयच्या मदतीने ३ मिनिटांच्या ‘वोव्हन’ या लघुपट बनवला. हा एक सायन्स-फिक्शन लघुपट आहे. या लघुपटातून अक्षयने चेतन (sentient) नावाच्या ग्रहावर जीवन शोधलेल्या एका अंतराळवीराची गोष्ट सांगितली आहे. ९०च्या दशकातील रेट्रो-फ्युचरिस्टिक ॲनिमेपासून प्रेरणा घेत हा लघुपट बनवला आहे. अक्षयने या लघुपटात ‘फर्नवेह’ (Fernweh) या जर्मन संकल्पनेची चर्चा केली आहे. फर्नवेह म्हणजे ‘ज्या जागेला आपण कधीही भेटलो नाही, पण तिची तीव्र ओढ वाटत राहणे, त्या जागेशी काहीतरी संबंध (connection) असल्याची जाणीव असणे.’ या संकल्पनेच्या आधारे अक्षयने हृदयाला स्पर्श करणारी कथा सादर केली आहे.
…अशी केली चित्रपटाची निर्मिती
संपूर्ण ३ मिनिटांचा चित्रपट अक्षयने एकट्याने, खुल्या-स्रोत (open-source) आणि जनरेटिव्ह एआय साधनांचा वापर करून तयार केला आहे. त्यासाठी त्याने ‘फ्लक्स मॉडेल्स’ (Flux models) वापरून मूळ प्रतिमा तयार केल्या. ‘वॅन २.२ व्हिडिओ मॉडेल’ (Wan2.2 video model) वापरून दृश्यांना ॲनिमेट केले.
व्हॉइसओव्हरसाठी मायक्रोसॉफ्टच्या ‘व्हायबव्हॉईस’चा (VibeVoice) उपयोग केला, ऑडिओसाठी ‘एसीई स्टेप’ (ACE Step) आणि चित्रपटाची खास ॲनिमे शैली टिकवून ठेवण्यासाठी ‘कस्टम-ट्रेन्ड लोरा’ (custom -trained Lora) या साधनांचा वापर केल्याची माहिती अक्षयने दिली. या सन्मानाबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. ‘एआय’ हे कोणत्याही प्रकारचा चित्रपट निर्माण करण्यासाठी एक साधन ठरू शकते. त्यामुळे चित्रपट बनविण्यासाठी साधनांची मर्यादा हा अडथळा ठरणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर एकेकाळी मोठ्या स्टुडिओंच्या मक्तेदारीत असलेले जागतिक दर्जाचे ॲनिमेशन आता एकट्या निर्मात्यांनाही शक्य आहे. – अक्षय काकडे, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक
