‘मृत्युंजय’मधून कर्ण आणि ‘छावा’मधून छत्रपती संभाजीमहाराज यांचे अपरिचित पैलू वाचकांपर्यंत पोहोचविणाऱ्या शिवाजी सावंत यांची ‘युगंधर’ ही श्रीकृष्णावरील कादंबरी आता इंग्रजीमध्ये अनुवादित झाली आहे. ‘मृत्युंजय’कारांची कन्या कादंबिनी यांनी या कादंबरीच्या अनुवादाचे शिवधनुष्य पेलले आहे.
महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेला नायक करून त्याचे विविध पैलू उलगडणाऱ्या ‘मृत्युंजय’ या कादंबरीने शिवाजी सावंत हे नाव घराघरामध्ये पोहोचले. एवढेच नव्हे तर ‘मृत्युंजय’कार अशीच कलाकृतीच्या नावाने त्यांची ओळख प्रस्थापित झाली. सावंत यांच्या निधनाला गुरुवारी (१८ सप्टेंबर) एक तप पूर्ण होत आहे. तर, सावंत हयात असते तर त्यांनी अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले असते. असे दुहेरी औचित्य साधून कादंबिनी यांनी हे अनुवादाचे काम पूर्णत्वास नेले आहे.
‘मृत्युंजय’ आणि ‘छावा’ या कादंबऱ्यांचे लेखन करताना सावंत यांनी पोथ्या, हस्तलिखिते, कागदपत्रे आणि पुराणकालीन स्थळांना भेटी असा प्रचंड अभ्यास केला होता. या सामग्रीला त्यांनी आपली प्रतिभा आणि अनोख्या शैलीची जोड देत या साहित्यकृतींची निर्मिती केली. तोच प्रयत्न त्यांनी ‘युगंधर’ या महाकादंबरीमध्ये केला आणि श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्त्व एका वेगळ्या विश्लेषणातून वाचकांसमोर ठेवले. सावंत यांची ही श्रीकृष्ण कथा इंग्रजी या विश्वभाषेत अवतरत आहे.
सावंत यांच्या कादंबऱ्यांसह अन्य पुस्तके इंग्रजीमध्ये यापूर्वीच अनुवादित झाली आहेत. मात्र, ‘युगंधर’ ही कादंबरी इंग्रजीमध्ये आली नव्हती. एका नामांकित प्रकाशनाकडून कादंबिनी यांना अनुवादाची विचारणा झाली. अमेरिकेतील सिअॅटल येथे वास्तव्यास असलेल्या कादंबिनी यांनी मे २०१३ मध्ये अनुवाद करण्याचा निश्चय केला आणि वर्षभरात हे काम पूर्णत्वास नेले. त्यासाठी मधुरा फडके या मैत्रिणीचे त्यांना सहकार्य लाभले. याविषयी त्या म्हणाल्या, बाबांची अप्रतिम शैली अनुवादित करणे अशक्य होते. शिवाय मराठी भाषेचे खास सौंदर्य अनुवादात पकडणे शक्य नसते. श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या प्रत्येक कृतीमागचे तत्त्वज्ञान हे सारे विलक्षण असून तो भारतीय संस्कृतीचा गाभाच आहे. या लेखनाची पूर्वतयारी म्हणून ‘मृत्युंजय’चा इंग्रजी अनुवाद वाचला होता, असे कादंबिनी यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2014 रोजी प्रकाशित
शिवाजी सावंत यांची ‘युगंधर’ आता इंग्रजीमध्ये!
शिवाजी सावंत यांची ‘युगंधर’ ही श्रीकृष्णावरील कादंबरी आता इंग्रजीमध्ये अनुवादित झाली आहे. ‘मृत्युंजय’कारांची कन्या कादंबिनी यांनी या कादंबरीच्या अनुवादाचे शिवधनुष्य पेलले आहे.

First published on: 17-09-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yugandhar now in english