अन्नाचे महत्त्व सर्वच जण जाणतात; पण घरातील ताटात अन्न वाया घालवले जाते, पैसे देऊन घेतलेले हॉटेलमधील अन्नही वाया घालवले जाते आणि लग्नसमारंभांसह छोटय़ा-मोठय़ा समारंभांमध्येही अन्न वाया जाते. वाया जाणारे अन्न गरजूंना पोहोचवणे हा एक मार्ग आहे; पण अन्न वायाच जाऊ नये हा विचार समाजमनात रुजवला तर..
पुण्यातील संजीव नेवे यांच्या मनात ही कल्पना सातत्याने येत होती. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा गेल्या वीस वर्षांचा दीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या लेवे यांनी हा विचार कृतीत आणला आहे. सध्याच्या युगाला साजेसा आणि युवक-युवतींनाही आपलासा वाटेल असा उपक्रम लेवे यांनी सुरू केला असून त्यांनी या उपक्रमाला ‘माय इंडिया ड्रीम’ असे नाव दिले आहे. समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) वापर वाढत असल्यामुळे ‘समाजमाध्यमे-सामाजिक कामांसाठी’ (सोशल मीडिया फॉर सोशल कॉजेस) हा विचार घेऊन लेवे यांनी हे काम सुरू केले. त्यांनी सुरू केलेला ‘झीरो फूड वेस्टेज’ हा उपक्रम आता चांगला रुजला आहे आणि ‘अन्न वाया घालवू नका’ हा विचार समाजातील विविध घटकांपर्यंत विविध उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहोचवला जात आहे.
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील सध्याची नवी पिढी, तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत, महिलांपर्यंत ‘अन्न वाया घालवू नका’ हा विचार माय ड्रीम इंडियातर्फे स्पर्धा, प्रात्यक्षिके, मॅरेथॉन आदी अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून पोहोचवला जात आहे. वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांपर्यंत हा विचार पोहोचवण्यासाठीही  संस्थेचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे काम करत आहेत आणि समाजमाध्यमांचा योग्यरीत्या वापर करून हजारो जणांपर्यंत देखील हा विचार पोहोचवण्यात आला आहे. ‘अन्न वाया जाणार नाही यासाठी स्वत:पासून सुरुवात करू या, या संकल्पनेचे चांगले स्वागत होत असून युवक-युवतींकडून मिळत असलेला प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक आहे,’ असा अनुभव नेवे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितला. या कामाला अनेक जण स्वत:हून पाठिंबा देत आहेतच, शिवाय स्वयंसेवक म्हणूनही या कामासाठी आमच्या बरोबरीने सहभागी होत आहेत, असे ते म्हणाले.
लोकांपर्यंत ‘अन्न वाया जाऊ देऊ नका’ हा संदेश देण्यासाठी आमच्या संस्थेतर्फे जे उपक्रम आम्ही करत आहोत त्यात सुशिक्षित, उच्चशिक्षित तसेच चांगल्या ठिकाणी नोकरीला असलेल्या युवक-युवतींकडून, व्यावसायिकांकडून, शिक्षण क्षेत्रातील मंडळींकडून साहाय्य मिळत असून अनेक चांगल्या कल्पना नागरिकांकडूनही येत आहेत. उपक्रमासाठी घोषवाक्ये सुचवली जात आहेत. हा विचार मांडण्यासाठी आम्हाला शिक्षणसंस्थांमध्येही बोलावले जात आहे, अशी माहिती नेवे यांनी दिली. एक चांगला विचार सर्वांपर्यंत नेण्यासाठी आणि त्यातून लोकांनी काही कृती करायला सुरुवात करावी यासाठी आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. स्वाभाविकच या चांगल्या विचारांचे स्वागत होत आहे आणि आम्हाला मिळणारा प्रतिसादही वाढत आहे, असा अनुभव नेवे यांनी सांगितला. प्रतिसाद वाढत असल्यामुळे ज्या उद्देशाने हे काम आम्ही सुरू केले तसे काम योग्य पद्धतीने सर्वाच्या मदतीने उभे राहात आहे. या कामात मी कशापद्धतीने सहभागी होऊ शकेन असा विचार करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे, असेही ते म्हणाले.