भारतीय माणसाचा प्रत्येक दिवस टाटांपासून सुरू होतो आणि टाटांपाशी संपतो असं एक विधान कधी कधी केलं जातं. म्हणजेच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीय माणसाच्या आयुष्यात लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू असतात, त्या टाटांनी बनवलेल्या असतात. त्यातूनच टाटा म्हणजे दर्जा, टाटा म्हणजे विश्वास असं समीकरणच भारतीय माणसांच्या मनात तयार झालेलं आहे.
अलीकडच्या काळात आपल्याला वरपासून खालपर्यंत सगळीकडे मिळेल त्या क्षेत्रातून, मिळेल त्या गोष्टीतून, मिळेल ते ओरबाडून घेत आपल्या पुढच्या सात पिढय़ा बसून खातील याची तजवीज करून ठेवण्याची वृत्ती आपल्या आसपास दिसत असते. अशा समाजात आपल्याला जे मिळालं, ते समाजाला परत देणारे, आपल्या भविष्यवेधी दृष्टीने देश विज्ञान-तंत्रज्ञान-संशोधन, उद्योग अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहील यासाठी रक्ताचं पाणी करणारे टाटा वेगळेच ठरतात.
देशात इतकी बडी उद्योगघराणी असताना सगळ्या थरांमधल्या देशवासीयांना टाटा या नावाबद्दल एक ओतप्रोत जिव्हाळा आहे तो टाटांच्या या वेगळेपणामुळे, त्यांच्या टाटापणामुळे. या जिव्हाळ्याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे गिरीश कुबेर यांचं टाटायन हे पुस्तक. प्रत्येक टाटाप्रेमी माणसाला हे पुस्तक आवडेलच. शिवाय ज्यांना टाटांबद्दल फारशी माहिती नाही असा प्रत्येक वाचक या पुस्तकामुळे टाटांच्या प्रेमात पडेल. नुसेरवानजी टाटांपासून ते रतन टाटांपर्यंतच्या टाटा समूहाच्या वाटचालीचा, योगदानाचा हा आलेख वाचणाऱ्याला थक्क करतो. महिनोन्महिने बोटीने प्रवास करत जग फिरणारे, जगात काय चाललंय ते समजून घेणारे, सतत नव्याच्या शोधात असणारे, स्वप्नं बघणारे, ती प्रत्यक्षात उतरवायला धडपडणारे जमशेदजी, त्यांची अपुरी स्वप्नं पूर्णत्वाला नेण्यासाठी धडपडणारी त्यांची पुढची पिढी, लोभस पण कणखर जेआरडी टाटा आणि रतन टाटांचं ऋजू, पण पोलादी व्यक्तिमत्त्व टाटायनच्या माध्यमातून समजून घेणं निखळ आनंददायक आहे.
इंग्रजीतून टाटांवर पुस्तकं लिहिली गेली आहेत. त्यांची मराठीत भाषांतरंही झाली आहेत; पण जमशेदजींपासून ते रतन टाटांपर्यंतच्या टाटा समूहाच्या वाटचालीचा इतका वाचनीय प्रवास मराठीत पहिल्यांदाच मांडला गेला आहे. (हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्यांत त्याच्या पाच आवृत्त्या निघाल्या आहेत.) टाटांनी देशाला, समाजाला एवढं दिलं आहे की त्याची परतफेड फक्त प्रेमातूनच होऊ शकते. लेखक गिरीश कुबेर यांनी ती टाटांवर पुस्तक लिहून केली आहे. ते वाचणं, टाटांचं टाटापण समजून घेणं हीसुद्धा त्या प्रेमऋणाची उतराईच ठरेल.
व्यापारी आणि उद्योजक यांच्यात एक मूलभूत फरक असतो. मागणी आणि पुरवठा यांच्यामधली दरी सांधत व्यापारी आपला नफा कमवतो. नफा मिळाला की त्याचं काम संपलं. उद्योजकाचं तसं नसतं. तो पैसे गुंतवतो, निर्मिती करतो, जोखीम पत्करतो, नवनव्या क्षितिजांचा शोध घेतो. जमशेदजी टाटा यांनीही पोलादनिर्मिती, कापडनिर्मिती, वीजनिर्मिती, रेशीमउद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण, मूलभूत संशोधन, हॉटेल व्यवसाय अशा कितीतरी क्षेत्रांत मोठी कामं उभारली. नुसती कामं उभारली नाहीत तर जे करायचं ते सर्वोत्तम, काळाच्या पुढचं असेल असा त्यांचा आग्रह असायचा. त्यांनी जे जे उद्योग उभे केले त्यातही प्रामाणिकपणा, सचोटी, दर्जा यांचा आग्रह धरला. उद्योगधंदा फक्त नफा मिळवण्यासाठी करायचा नाही तर सर्वोत्तम सेवा देऊन तो मिळवायचा हा त्यांचा दृष्टिकोन होता. तोच कित्ता त्यांच्या नावाचा वारसा सांगणाऱ्या टाटा समूहाने कायमच गिरवला. टाटा या नावाला आज जी विश्वासार्हतेची जोड आहे, तिचा पाया जमशेदजींनी घातला आहे.
मिडास राजा ज्या ज्या वस्तूला हात लावायचा तिचं सोनं होत असे, असं मिडास राजाच्या गोष्टीत सांगितलं जातं. जमशेदजींच्या डोक्यातून ज्या ज्या कल्पना त्या वेळी आल्या, त्यांचा त्यांनी पाठपुरावा केला, त्यातल्या बहुतेक कल्पनांचं आज सोनं झालं आहे. हे सगळं करणारे जमशेदजी टाटा एवढय़ावरच समाधानी नव्हते, कारण त्यांच्यामध्ये आंत्रप्रोनरशिपसुद्धा होती. दीडशे वर्षांपूर्वी या संकल्पनेचा मागमूसही नसताना जमशेदजी ही संकल्पना प्रत्यक्ष जगले. या उद्यमशील माणसाच्या अचाट कार्यक्षमतेबद्दल सांगणारं ‘स्वप्नं पेरणारा माणूस’ हे प्रकरणं तर पुन:पुन्हा वाचण्यासारखं आहे.
शालेय अभ्यासात भारतीय उद्योगविश्वाचे पितामह असा जमशेदजींचा उल्लेख असणारा धडा असतो. त्यांनी उभारलेल्या उद्योगांची माहिती रूक्षपणे दिलेली असते. पण हे प्रकरण वाचल्यावर जमशेदजी भारतीय उद्योगविश्वाचे पितामह कसे आहेत ते आपल्याला नव्याने उलगडत जातं. एक कमालीचा जिवंत, रसरशीत माणूस शालेय अभ्यासक्रमात कसा बंदिस्त होऊन आपल्यासमोर येतो याचीही जाणीव होते.
त्या काळात विमाने नव्हती. आजच्यासारख्या अद्ययावत बोटी नसत. बोटीवरच्या माणसांना आहारासाठी लागणाऱ्या कोंबडय़ा, शेळ्या जिवंतच घ्याव्या लागत. त्यांची संख्या प्रचंड असे. त्यांचा प्रचंड दर्प असे. त्यातच महिनोन्महिने प्रवास करावा लागे. असा प्रवास करत जमशेदजी त्यांच्या व्यवसायासाठी जगभर फिरत. त्या काळात जगात प्रचंड वैचारिक घुसळण सुरू होती. ते ती सगळी समजून घेत. त्यातूनच पोलाद कारखान्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. त्यासाठी त्यांनी केलेली धडपड अवर्णनीय आहे. जमशेदजींचं एक एक स्वप्न म्हणजे,
‘हजारो ख्वाइशे ऐसी
की हर ख्वाईश पे दम निकले,
बहोत निकले मेरे अरमां
फिर भी कम निकले’
अशीच होती. त्यांनी पाहिलेल्या आणि प्रत्यक्षात आलेल्या स्वप्नांनी आपण अवाक् होतो. पण त्यांची प्रत्यक्षात न आलेली स्वप्नंही अशीच अवाक् करणारी आहेत. ठाण्याच्या खाडीचा उपयोग करून या अचाट माणसाला तिथे पूर्वेकडचं व्हेनिस उभं करायचं होतं. एकीकडे पोलाद कारखाना उभा करणारे जमशेदजी दुसरीकडे ताजमहाल हॉटेलसारखं स्वप्न साकारत होते. त्यांची बहीण त्यांना म्हणालीही होती की अरे तुला काय काय करायचंय? तुला एकीकडे कापडगिरण्या चालवायच्या आहेत, दुसरीकडे पोलादाचा कारखाना काढायचा आहे, इमारती उभ्या करायच्या आहेत आणि भटारखाना काढायचा आहे?’ पण जमशेदजींची एनर्जीच तशी आणि तेवढी होती. ताजसंदर्भात त्यांनी त्यांच्या मुलाला केलेल्या बारीकबारीक सूचना वाचल्या की हा माणूस काय चीज होता त्याची झलक मिळते.
एकीकडे मुंबईतले म्हशींचे गोठे कुठे असावेत, कसे असावेत याचा अभ्यास करवून घेणाऱ्या जमशेदजींनी जपानमधून रेशीम लागवड उत्पादनातले जाणकार लोक आणून म्हैसूर परिसरात रेशीम उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. वीज उत्पादनाच्या त्यांच्या प्रकल्पाविषयी ऐकल्यावर ब्रिटिश अधिकारीही चक्रावून गेले होते. कापडगिरण्या चालवतानाही त्यांच्याकडे त्या वेळी जगातले सर्वोत्तम माग होते. नागपूरची एम्प्रेस मिल चालवताना त्यांनी काम करण्याची फारशी सवय नसलेल्यांना वेगवेगळ्या योजना आखून कामाची गोडी लावली. कार्यसंस्कृती शिकवली. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ उभारण्यासाठी तर त्यांनी जंग जंग पछाडलं. त्यांच्या हयातीत त्यांचं हे स्वप्नं पूर्ण होऊ शकलं नाही, पण त्यांच्या मुलांनी ते पूर्ण केलं.
मोठय़ा माणसांच्या मुलांच्या बाबतीत खूपदा दिव्याखाली अंधार अशी परिस्थिती असते. जमशेदजींच्या दोराब आणि सर रतन टाटा या मुलांबाबतीत सुदैवाने तसं झालं नाही. त्यांनी वडिलांनी उभा केलेला डोलारा सांभाळला, वाढवला. जमशेदजींचा पोलाद प्रकल्प त्यांच्या हयातीत पूर्ण झाला नाही. पण त्यांचं ते स्वप्न प्रत्यक्षात आणायला झटले ते त्यांचा मोठा मुलगा दोराब आणि भाचा रतन टाटा. त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. मयूरभंजमध्ये कसल्याही सोयी नसलेल्या जंगलात पोलाद कारखाना उभा करणं हे अतिशय जिकिरीचं आव्हान होतं. पण नंतर झालेल्या महायुद्धात ब्रिटिशांना १५०० मैल लांबी भरेल इतके रूळ टाटांच्या पोलाद कंपनीनं पुरवले. त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून ब्रिटिश सरकारनं नंतर त्या शहराचं नाव जमशेदपूर आणि रेल्वे स्थानकाचं नाव टाटानगर केलं.
महायुद्धानंतर मात्र या कारखान्यावर हलाखीची वेळ आली. त्या काळात दोराबजींनी पदरचे पैसे घालून आणि कर्ज काढून कारखाना सुरू ठेवला, पण एकाही कामगाराला कमी करू दिलं नाही. दोराबजींनीही जमशेदजींच्या या पसाऱ्यात भर घातली. शिवाय ऑलिम्पिकला जाऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना मदत, टाटा कर्करोग संशोधन संस्था काढणं असे उद्योगही केले. मुख्य म्हणजे स्वत:चा पैसा मृत्यूनंतर समाजातल्या विविध संस्थांना देऊन टाकला.
जमशेदजींचा धाकटा मुलगा म्हणजे सर रतन टाटा यांना मानव्यशाखांमध्ये अतिशय रस. त्यातूनच मोहेंजेदरो हरप्पा इथल्या संशोधनाला आर्थिक पाठबळ देऊन चालना दिली. गरिबीचा अभ्यास केला जावा यासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला त्या काळात ते चौदाशे पौंड निधी दरवर्षी देत. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या भारत सेवक समाजाला, महात्मा गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णविद्वेषविरोधातल्या कामांना त्यांनी त्या काळात भरघोस आर्थिक मदत दिली. शालेय पोषण आहारासारख्या कल्पना त्यांनी त्या काळात मांडल्या होत्या.
दोराबजी आणि सर रतन टाटा यांच्या कर्तृत्वावर चार चाँद लावले ते जेआरडींनी. जेआरडी हे दोराब टाटांचे मामेभाऊ रतन टाटा यांचा मुलगा. त्यांची आई फ्रेंच. जेआरडींचा आयुष्याचा सुरुवातीचा काळ फ्रान्समध्ये कलाक्षेत्रात त्या काळात शिखरावर असलेल्या पॅरिसमध्ये गेला. त्यांच्यावर उत्तम फ्रेंच संस्कार झाले होते. त्यांच्या लहानपणापासूनच्या विमानवेडातून भारतीय विमानक्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. जवाहरलाल नेहरू, मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी या तिघांच्याही सरकारशी जेआरडींना संघर्ष करावा लागला. त्यांचा जीव की प्राण असलेला विमानउद्योग सरकारच्या हवाली करून टाकावा लागला. सरकारी बाबूंचा सामना करावा लागला. टाटापण अंगात मुरलेलं असल्यामुळे सर्वोत्तमाचा ध्यास असलेले जेआरडी आणि सरकारी खाक्या मिरवणारे अधिकारी, विमानोद्योगाचा कोणताही गंध नसलेले मंत्री अशा संघर्षांत जेआरडींना किती मनस्ताप झाला असेल याची कल्पना करता येते.
जमशेदजींना आपल्या वेगवेगळ्या कल्पना प्रत्यक्षात आणताना जेवढा संघर्ष तत्कालीन ब्रिटिश सरकारशी करावा लागला नसेल त्याहूनही जास्त संघर्ष जेआरडींना स्वतंत्र भारताच्या सरकारशी करावा लागला असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. गांधीजी आणि नेहरूंच्या आर्थिक विचारांबाबत जेआरडींची स्पष्ट नाराजी होती. विशेषत: नेहरू सरकारच्या समाजवादी विचारसरणीमुळे उद्योगपती म्हणजे धनदांडगे, गरिबांना लुटणारे अशी सार्वत्रिक घृणा तयार झाली होती. ती बराच काळ टिकलीही. नेहरूंनी एकदा जेआरडींना असंही ऐकवलं होतं की मला नफा या शब्दाविषयीच घृणा आहे. पण याच नफ्यातून टाटांनी आंत्रप्रोनरशिप केली हे मात्र त्या समाजवादी अर्थव्यवस्थेत नजरेआड केलं गेलं.
या सगळ्यातून जेआरडी बरेच दुखावले गेले. पण त्यांचं मोठेपण असं की ते त्यातच अडकून पडले नाहीत. चीनच्या दणक्यानंतर नवे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी देशाच्या दीर्घकालीन हवाई गरजा या विषयावर एक गुप्त अहवाल तयार करायची विनंती केली. त्यानुसार जेआरडींनी तयार केलेला अहवाल इतका मूलभूत आहे की आजही हवाई दलप्रमुखाची सूत्रं हातात घेणारे हवाई दलप्रमुख तो अभ्यासाचा भाग म्हणून वाचतात. जेआरडींमधल्या अशा अतिशय कणखर आणि तितक्याच लोभस माणसाचं टाटायनमधून दर्शन होतं.
जेआरडींनंतर टाटा समूहाचा सगळा डोलारा रतन टाटांच्या हातात आला. रतन टाटा आपल्यासारखेच आहेत ते फायदा मिळवण्यासाठी कोणत्याही तडजोडी करणार नाहीत, हा जेआरडींना विश्वास होता. तो ते बोलूनही दाखवत. पण तरीही त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा वारस म्हणून इतरही नावं होती. पण रतन टाटा निवडले गेले ते त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर. आणि जेआरडींची निवड किती सार्थ होती हे रतन टाटांनी कसं सिद्ध केलं, टाटा समूहात आलेला विस्कळीतपणा त्यांनी कसा घालवला, त्यासाठी कसे पोलादी निर्णय घेतले, त्यानंतर इंडिकापर्व, जग्वार, टीसीएस हे सगळं मुळातूनच वाचण्यासारखं आहे. ७५ व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेऊन समूहातल्या बुजुर्गाना घरचा रस्ता दाखवणारे रतन टाटा स्वत:ही ७५ व्या वर्षी पायउतार झाले आणि त्यांनी सायरस मिस्त्री यांच्याकडे सूत्रं सोपवली.
जमशेदजींपासून सुरू झालेला टाटा समूहाचा प्रवास अशा रीतीने सायरस मिस्त्री यांच्यापर्यंत येऊन पोहोचतो. या सगळ्या प्रवासात संघर्ष आहे, आव्हानं आहेत, अडचणी आहेत, त्याच्या जोडीला जिद्द आहे, साहस आहे, नवी क्षितिजं धुंडाळण्याची उमेद आहे, पैसा आहे आणि त्याचा सुसंस्कृत व्यय आहे. हे आहे टाटापण. ही आहे टाटा संस्कृती. समाजातून मिळवलेला पैसा परत समाजासाठी खर्च करणं आणि त्याचा कोणताही बडेजाव न मिरवणं ही टाटा संस्कृती ‘उदास विचारे वेच करी’ या प्रकरणात तपशीलवार मांडली आहे. टाटांनी समाजासाठी दिलेलं योगदान विलक्षण आहे. ‘टाटायन’मधून भरगच्च माहितीसह अतिशय सहजसोप्या भाषेत, त्याला पुरेपूर न्याय दिला गेला आहे.
पारशी समाजाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की तो समाज दुधातल्या साखरेसारखा भारतीय समाजात विरघळून गेला आहे. पण टाटायन वाचताना जाणवतं की टाटा दुधातल्या केशरासारखे भारतीय समाजात विरघळून गेले आहेत.

टाटांनी सुरू केलेले, चालवलेले
विविध व्यापार, उद्योग, आंत्रप्रोनरशिप
अफू , कापूस निर्यात, कापडगिरण्या, वीज, कॉफी, स्ट्रॉबेरी, रेशीम उद्योग, पोलाद, ताज हॉटेल, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स, टाटा ऑइल मिल, टॉम्को, टिस्को, टाटा इंडस्ट्रियल बँक, न्यू इंडिया अ‍ॅश्यूअरन्स, लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट, रतन टाटा इंडस्ट्रियल इन्स्टिटय़ूट, टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, टाटा एव्हिएशन सवर्ि्हस, टाटा केमिकल्स, लॅक्मे, ट्रेंट, टाटा टी, नेल्को, टाटा मोटर्स, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रीसर्च, टाटा लोकोमोटिव्ह अँड इंजिनीयरिंग (टेल्को), असोसिएटेड सिमेंट कंपनी, टायटन, टीसीएस.
टाटायन
लेखक : गिरीश कुबेर
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
किंमत : रु. ४००/-
पृष्ठ : ४१९
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
guru asta 2024
१४ दिवसांनी गुरु होणार अस्त! ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; नोकरीपासून प्रेमापर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते यश
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Budh Gochar Till 9 April 2024 Kendra Trikon Rajyog To Bless Vrushbh Makar Rashi
१३ दिवस केंद्र त्रिकोण राजयोग कायम; ‘या’ राशींना लाभतील सुगीचे दिवस; ‘या’ रूपात होईल लक्ष्मीचं आगमन