दैनंदिन जगण्यात उपयोगी, मार्गदर्शक ठरतील अशी सूत्रे सुलभपणे सांगणे हे समर्थ रामदासांचे वैशिष्टय़. गेल्या वर्षभरात त्याचे अनेक दाखले आपण पाहिले. याच संदर्भातील अतिशय अटळ आणि महत्त्वाच्या विषयांवरचे त्यांचे विवेचन आज.

हे दोन महत्त्वाचे विषय म्हणजे मूर्खपणा आणि मृत्यू. प्रत्येक माणसाच्या ठायी कमी-अधिक प्रमाणात यातील पहिला घटक असतो. आणि दुसरा घटक तर प्रत्येकासाठी अटळच असतो. प्रथम आपल्या मूर्खपणाविषयी.

When can my baby drink cow’s milk
सहा महिने की बारा महिने, बाळाला गायीचे दूध केव्हा देऊ शकता? WHO चे नवे मार्गदर्शक तत्व काय सांगतात? जाणून घ्या
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

रामदासांनी सर्वसाधारण मूर्खपणाची जवळपास ७५ लक्षणे सांगितलेली आहेत. पढतमूर्खाची ४० लक्षणे वेगळीच. अशा तऱ्हेने दोन्ही मिळून रामदासांनी मूर्खाना ओळखण्याचे जवळपास सव्वाशे मार्ग दिलेले आहेत. आपल्यापैकी अनेकांना यातील काही लक्षणे लागू पडतील; तर काहींना काही. परंतु कोणालाही यातील काहीच लागू नाही अशा व्यक्ती दुर्मीळ असाव्यात. नमुनादाखल रामदास कोणाकोणास मूर्ख म्हणतात, ते पाहू या..

‘समर्थावरी अहंता। अंतरीं मानी समता।

सामथ्र्येविण करी सत्ता। तो येक मूर्ख।।’

म्हणजे आपल्या संगतीत आलेल्या समर्थाच्या सान्निध्यात एखादी व्यक्ती स्वत:लाही समर्थ मानत असेल आणि कोणत्याही सामर्थ्यांविना सत्ता राबवू पाहत असेल तर तीस खुशाल मूर्ख मानावे.

‘आपली आपण करी स्तुती, सांगे वडिलांची कीर्ती, अकारण हास्य करी, विवेक सांगतां न धरी, बहुत जागते जन, तयांमध्यें करी शयन, परस्थळीं बहु भोजन, घरीं विवेक उमजे.. आणि सभेमध्यें लाजे, आपणाहून जो श्रेष्ठ.. तयासीं अत्यंत निकट, सिकवेणेचा मानी वीट, नायेके त्यांसी सिकवी, वडिलांसी जाणीव दावी, जाला विषईं निलाजिरा, मर्यादा सांडून सैरावर्ते, औषध ने घे असोन वेथा.. पथ्य न करी सर्वथा, संगेंविण विदेश करी, वोळखीविण संग धरी, उडी घाली माहापुरीं, आपणास जेथें मान.. तेथें अखंड करी गमन, विचार न करिता कारण.. दंड  करी अपराधेंविण, मार्गे जाय खात खात, करी थोडें बोले फार, विद्या वैभव ना धन.. कोरडाच वाहे अभिमान, दंत चक्षु आणि घ्राण.. सर्वकाळ जयाचे मळिण। तो येक मूर्ख..’ असे यातील काही दाखले. किती विविध आहेत पहा ते. म्हणजे स्वत:ची स्तुती करणारा, वाडवडिलांच्या नावे फोके मारत हिंडणारा, चारचौघे बसलेले असताना त्यात लोळत राहणारा, घरी बडबड करून बाहेर मात्र बोलावयास लाजणारा, दुसऱ्याच्या घरी जाऊन तुडुंब जेवणारा, नवीन काही शिकावयाचा कंटाळा करणारा, आपल्यापेक्षा वडील व्यक्तीस शहाणपण शिकविणारा, आजार असूनही पथ्ये न सांभाळणारा, उगाच पुरात उडी मारून पौरुष मिरवू पाहणारा, रस्त्यावरून मार्गक्रमण करताना खाणारा, तोंड, नाक आदींची स्वच्छता न पाळणारा.. असे सर्व मूर्ख समजावेत असे रामदास सांगतात. खरे तर ही अशी सर्वच्या सर्व ७५ लक्षणे येथे देण्याचा मोह होतो; पण स्थळमर्यादेअभावी ते शक्य नाही.

यात थक्क व्हायला होते ते रामदासांचे विचार आणि कल्पनाशक्तीने. माणसाकडे किती दूरवरून, तरीही किती सर्वागाने ते पाहतात हे पाहिल्यास आपणास थक्क होण्याखेरीज पर्याय नसतो. अशी आणखी काही वेगळी उदाहरणे..

‘तश्करासी वोळखी सांगे.. देखिली वस्तु तेचि मागे, समर्थासीं मत्सर धरी.. अलभ्य वस्तूचा हेवा करी, घरीचा घरीं करी चोरी, अल्प अन्याय क्षमा न करी, सर्वकाळ धारकीं धरी, जो विस्वासघात करी, क्षणा बरा क्षणा पालटे, ज्याची सभा निर्नायेक, अनीतीनें द्रव्य जोडी, संगतीचें मनुष्य तोडी..’ वगैरे.

म्हणजे तस्कराशी ओळख सांगणारे, दिसेल ती वस्तू मागत सुटणारे, उच्चपदस्थांचा मत्सर करणारे, जी वस्तू आपल्याला अप्राप्य आहे तिचा हेवा करणारे, स्वत:च्या घरी चोरी करणारे, लहानशा चुकीची शिक्षा देणारे, सतत आरडाओरड करत लोकांना धारेवर धरणारे, विश्वासघात करणारे, स्वत:च्या मन:स्थितीवर नियंत्रण नसणारे, शेंडा ना बुडखा अशा सभेत जाणारे, अनीतीने द्रव्य जोडणारे, संगतीच्या मनुष्यास तोडणारे.. हे सर्व रामदासांच्या मते मूर्ख. इतकी सर्व ‘मूर्ख’पणे ओळखून त्याप्रमाणे त्यांची लक्षणे नोंदविणारा हा जगातील एकमेव संत असेल. रामदासांचा हा रोखठोकपणा विलोभनीय आहे.

अशाच रोखठोकपणाने त्यांनी हाताळलेला आणखी एक विषय म्हणजे- मृत्यू. रामदास अगदी मनाच्या श्लोकातही- ‘मरे एक त्याचा। दुजा शोक वाहे। अकस्मात तोही। पुढे जात आहे।।’ अशा स्वरूपाचा सल्ला सहज देऊन जातात. दासबोधात तर त्यांनी मृत्यूवर एक समग्र समासच्या समासच लिहून ठेवलाय. मूर्खाच्या लक्षणांइतकाच तोही तितकाच बोधप्रद आहे.

‘होतां मृत्याची आटाटी। कोणी घालूं न सकती पाठीं।’

म्हणजे एकदा का ती वेळ आली की कोणीही मृत्यूपासून वाचू शकत नाही. जगातील कोणते एखादे अंतिम सत्य असेल तर ते मृत्यू हेच- असे रामदास बजावतात. मोठी काव्यात्म मांडणी आहे  मृत्यूविषयक समासाची.

‘मृत्य न म्हणे किं हा क्रूर। मृत्य न म्हणे हा जुंझार।

मृत्य न म्हणे संग्रामशूर। समरंगणीं।।

मृत्य न म्हणे किं हा कोपी। मृत्य न म्हणे हा प्रतापी।

मृत्य न म्हणे उग्ररूपी। माहाखळ।।

मृत्य न म्हणे बळाढय़। मृत्य न म्हणे धनाढय़।

मृत्य न म्हणे आढय़। सर्व गुणें।।

मृत्य न म्हणे हा विख्यात। मृत्य न म्हणे हा श्रीमंत।

मृत्य न म्हणे हा अद्भुत। पराक्रमी।।’

याच्या स्पष्टीकरणाची काही गरजच नाही. इतक्या सुलभ मराठीत आजदेखील फार कमीजणांना लिहिता येते. रामदासांनी हे चारशे वर्षांपूर्वीच्या मराठीत लिहिले आणि आजही ते सहजपणे समजते हे त्यांच्या भाषिक द्रष्टत्वाचेही लक्षण मानावयास हवे.

‘मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं। मृत्य न म्हणे राजकारणी।

मृत्य न म्हणे वेतनी। वेतनधर्ता।।

मृत्य न म्हणे वित्पन्न। मृत्य न म्हणे संपन्न।

मृत्य न म्हणे विद्वज्जन। समुदाई।।

मृत्य न म्हणे हा धूर्त। मृत्य न म्हणे बहुश्रुत।

मृत्य न म्हणे हा पंडित। माहाभला।।

मृत्य न म्हणे बाळ तारुण्य। मृत्य न म्हणे सुलक्षण।

मृत्य न म्हणे विचक्षण। बहु बोलिका।।’

हे असे सांगून रामदास म्हणतात..

‘च्यारी खाणी च्यारी वाणी। चौऱ्यासी लक्ष जीवयोनी।

जन्मा आले तितुके प्राणी। मृत्य पावती।।

मृत्याभेणें पळों जातां। तरी मृत्य सोडिना सर्वथा।

मृत्यास न ये चुकवितां। कांहीं केल्या।।

गेले बहुत वैभवाचे। गेले बहुत आयुष्याचे।

गेले अगाध महिमेचे। मृत्यपंथें।।’

हे जर सत्य असेल तर आहे तो काळ सार्थकी लावणे इतकेच काय ते आपल्या हाती राहते. हे का करायचे?

‘असो ऐसे सकळही गेले। परंतु येकचि राहिले।

जे स्वरुपाकार जाले। आत्मज्ञानी।।’

कारण आपल्या पश्चात तेच राहणार आहे.

याचा अर्थ इतकाच, की जे जन्माला येते ते मरण पावते. आणि जे सुरू होते ते कधी ना कधी संपते.

त्याप्रमाणे ‘रामदास विनवी’ या स्तंभाच्या संपण्याचा हा क्षण. यावर्षीच्या जानेवारीस तो सुरू झाला. ‘लोकसत्ता’ संपादकांनी घालून दिलेल्या मुदतीत तो संपवणे आवश्यक आहे. तेव्हा हा स्तंभ संपवण्यासाठी मृत्यूविषयक समास अगदी चपखल. म्हणून त्याची येथे निवड केली.

या वर्षभरात शेकडो वाचकांनी ई-मेलद्वारे प्रस्तुत लेखकाशी, ‘दै. लोकसत्ता’ कार्यालयाशी संपर्क साधून याविषयी प्रतिक्रिया दिल्या. यातून समर्थ रामदासांचे कालजयीत्व तेवढे दिसून येते. चारशे वर्षांनंतर आजही त्यांची शिकवण इतकी समर्पक वाटत असेल, तर ती जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य ठरते. त्या कर्तव्यभावनेतूनच प्रस्तुत लेखकाने हे स्तंभलेखन केले. ज्यांनी हे सर्व आधीच वाचले असेल त्यांना यातून पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला असावा. जे यास अपरिचित आहेत, त्यांना या लिखाणाचे महत्त्व लक्षात आले असावे. ते अधिक समजून घेण्यासाठी जिज्ञासूंनी समर्थाचे समग्र वाङ्मय मुळातूनच वाचावे.

‘वीस दशक दोनीसें समास। साधकें पाहावें सावकास।

विवरतां विशेषाविशेष। कळों लागे।।’

हे झाले ‘दासबोधा’विषयी. पण त्याखेरीजदेखील रामदासांनी विपुल लेखन केले आहे. रामदास त्याविषयी सांगतात..

‘ग्रंथाचें करावें स्तवन। स्तवनाचें काये प्रयोजन।

येथें प्रत्ययास कारण। प्रत्ययो पाहावा।।’

तेव्हा असा प्रत्ययो प्रत्येक जाणत्याने घ्यावा. असा प्रत्यय घेण्याची इच्छा प्रस्तुत लेखमालेने निर्माण झाली असेल तर हे प्रयत्न सार्थकी लागले असे म्हणता येईल. नसेल तर ते प्रस्तुत लेखकाचे न्यून. असो. इति लेखनसीमा.

(समाप्त)

ता. क. :

अनेक वाचकांनी समर्थानी लिहिलेल्या अन्य काव्याविषयी अनेकदा विचारणा केली. रामदासरचित लावणी, विविध मारुती स्तोत्रे, हिंदी पद्य आदींविषयी अनेकांना उत्सुकता आहे. अशांसाठी दोन ग्रंथांची शिफारस येथे करणे सयुक्तिक ठरेल. पहिला म्हणजे ‘समग्र समर्थ साहित्य’ हा कालनिर्णय प्रकाशनाचा महाग्रंथ. समर्थाचे जवळपास सर्वच वाङ्मय या ग्रंथात आढळेल. दुसरा असा ग्रंथ म्हणजे ‘श्रीसमर्थ ग्रंथ भांडार’ हा ह. भ. प. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांनी संपादित केलेला ग्रंथ. याचे वैशिष्टय़ म्हणजे या ग्रंथात अप्रकाशित ‘दासबोधा’चा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. प्रस्तुत लेखमालेसाठी प्राधान्याने यातील पहिल्या ग्रंथाचा आधार घेण्यात आला.

समर्थ साधक samarthsadhak@gmail.com