[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजी बऱ्याच दिवसांनी घरी राहायला आली होती, त्यामुळे नातवंडं सकाळपासून तिलाच लटकत होती. आजीच्या निमित्ताने दोघांनीही शाळेला दांडी मारली होती. त्यासाठी अंग दुखण्यापासून ते शाळेच्या व्हॅनवाल्या काकांच्या संपापर्यंत सगळी कारणं सांगून झाली होती. निदान दोन दिवस तरी मनसोक्त आजीबरोबर राहायला मिळणार, तिच्या हातचे पदार्थ खायला मिळणार, याचा आनंदच मोठा होता. दिवसभरात आजीबरोबर काय करायचं, याच प्लॅनिंग आठ दिवस आधीच झालं होतं. त्यात बाहेर फिरायला जाणं, आईस्क्रीम खाणं, एखाद्या बागेत जाणं, गोष्टी सांगणं ह्या सगळ्यांचा समावेश होता. आजीलाही नातवंडांबरोबर रमण्याचा आनंद जास्त होता. त्याच ओढीने ती घरी आली होती. सगळ्यात विशेष कार्यक्रम होता तो आजीच्या हातचे वेगवेगळे पदार्थ खाण्याचा. हल्ली बरेच दिवस आजोळची सैर घडली नव्हती, त्यामुळे आजीच्या हातचं खायलाच मिळालं होतं. यावेळी आजी कितीही दमलेली असली, तरी तिला गळ घालून काहीतरी वेगळं करायला लावायचंच, हेही त्यांनी आधीच ठरवून टाकलं होतं. आजी साधेच पदार्थ वेगळ्या पद्धतीने करते, हे मुलांनी बरेच वर्षं ऐकलं आणि अनुभवलंही होतं. अर्थातच मुलांच्या आईलाही त्याबद्दल काही आक्षेप नव्हताच. आजी येणार म्हटल्यावर आपल्याला स्वयंपाकघरातून दोन दिवस सुट्टी, हे तिनं गृहीतच धरून त्यानुसार आपल्या मैत्रिणींच्या भेटीगाठी, रीयुनियन वगैरे कार्यक्रमही आधीच ठरवून टाकले होते. त्यामुळे आजीला आता नकार देणं शक्यच नव्हतं. `काहीतरी वेगळं कर` म्हणजे काय, हे कोडं काही सुटत नव्हतं. आईच्या रोजच्या बंधनांपासूनही आज सुटी मिळणार होती. खरंतर आईच्या वेळापत्रकानुसार आज भेंडीचा वार होता, पण आजीमुळे ती सवलत नक्की मिळेल, याची मुलांना खात्री होती. हो नाही करता करता शेवटी आजीनं एक वेगळीच डिश केली. आजीनं एखाद्या झकास हॉटेलसारखी स्टार्टरची चमचमीत डिश केली, म्हणून मुलं जामच खूश झाली. संध्याकाळी आजीला आईशी बोलताना मात्र, `आज मुलांनी भेंडीसुद्धा आवडीनं खाल्ली गं!` असं बोलताना त्यांनी ऐकलं, तेव्हा मात्र त्यांची तोंडं भेंडीसारखीच बुळबुळीत झाली.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make crispy bhindi maharashtrian recipes
First published on: 25-01-2017 at 01:15 IST