घरातील गृहिणी असो, कामावर जाणारी स्त्री किंवा स्वयंपाक करणारी कोणतीही व्यक्ती असो; ‘उद्या जेवायला कोणती भाजी बनवायची’ हा त्यांना पडणारा नेहमीचा प्रश्न असतो. कधीकधी आपल्याला त्याच-त्याच भाज्या खाऊनसुद्धा अगदी कंटाळा आलेला असतो; पण बाजारात भाज्यांना फारसे पर्याय उपलब्ध नाही, असेही बरेचदा होते. अशा वेळेस काय बरं करावे?

तर, एखादी भाजी तुम्ही नेहमी बनवता तशी न बनवता, थोड्या वेगळ्या पद्धतीने करून पाहिलीत तर त्या हटक्या चवीमुळे भाजी खाण्यास कंटाळा येणार नाही. आपल्या महाराष्ट्रात पीठ पेरून काही भाज्या बनवल्या जातात. हा प्रकार कांदा, सिमला मिरची, पडवळ इत्यादी भाज्यांसोबत विशेषतः बनवला जातो. आपण नेहमी शिजवतो अगदी त्या पद्धतीने भाजी बनवून त्याला केवळ बेसन/ डाळीचे पीठ लावायचे असते. अशा पद्धतीने, सिमला मिरचीची भाजी कशी बनवायची ते आपण पाहू.

हेही वाचा : Recipe: कडू-कडू कारलीदेखील अगदी आवडीने अन् गोडीने खाल; पाहा ही मसालेदार कारल्याची रेसिपी

सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी कशी बनवायची?

साहित्य

३ सिमला मिरची
४ चमचे बेसन/डाळीचे पीठ
कोथिंबीर
मोहरी
हिंग
हळद
तिखट
मीठ
पाणी
तेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : Viral video : एका मिनिटात पाच पोळ्या होतील लाटून; पाहा व्हायरल होणारी ‘ही’ Kitchen hack…

कृती

  • सर्वप्रथम सिमला मिरची स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
  • एका पातेल्यात डाळीचे पीठ घेऊन त्याला ४ ते ५ मिनिटे भाजून घ्या. पिठाचा रंग हलका बदलल्यानंतर गॅस बंद करून पीठ एका बाउलमध्ये काढून घ्या. पीठ जळणार नाही याची काळजी घ्यावी.
  • आता एक कढईमध्ये चमचाभर तेल तापवून घ्या. तेल तापल्यानंतर त्यामध्ये, मोहरी घालून तिला तडतडू द्यावे.
  • नंतर कढईत हिंग, चिरलेली सिमला मिरची घालून काही मिनिटांसाठी झाकून ठेवा. मधून मधून भाजी कढईला लागू नये यासाठी ढवळत राहा.
  • भाजी अर्धवट शिजल्यानंतर त्यामध्ये अर्धा-पाऊण चमचा हळद, एक चमचा तिखट, चवीनुसार मीठ घालून सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळून घ्या.
  • सिमला मिरची पाणी सोडू लागल्यानंतर, आधी भाजून घेतलेले डाळीचे पीठ कढईमध्ये हळूहळू घालून भाजी ढवळत राहा. मात्र पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • तुम्हाला भाजी कोरडी हवी आहे की, थोडी रसदार त्यानुसार पाणी घालून पुन्हा एकदा भाजी ढवळून घ्या; आणि काही मिनिटांसाठी झाकून ठेवा.
  • भाजी पूर्ण शिजल्यानंतर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.
  • तयार आहे तुमची पीठ पेरलेली सिमला मिरचीची भाजी.