Gudipadwa 2024 Special Recipe: गुढीपाडव्याला अनेकांच्या घरी दरवर्षी श्रीखंड-पुरीचा बेत ठरलेलाच असतो. महाराष्ट्रात प्रत्येक सणाला काहीतरी गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. यात ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा सण साजरा होणार आहे. हा सण म्हणजे मराठी माणसाच्या नव वर्षाची सुरुवात असते. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला जातो. यात आता आंब्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळे नेहमीच्या त्याच श्रीखंडापेक्षा यंदा तुम्ही घरच्या घरी आम्रखंड बनवू शकता. स्वादिष्ट आणि बनवायला अगदी सोप्पी अशी आम्रखंडाची रेसिपी आहे. चला तर मग जाणून घेऊयात आम्रखंड बनवण्याची पद्धत.
Gudi Padwa 2024 : ‘या’ तारखेला साजरा होणार यंदाचा गुढी पाडवा? जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्व
आम्रखंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य
१) ५०० ग्रॅम ताजे दही
२) १/४ कप पिठीसाखर
३) १ कप आंब्याचा पल्प
४) ५ काजू किंवा बदाम
६) ५ ते ६ पिस्ता
७) ४ ते ५ वेलची
आम्रखंड बनवण्याची कृती
सर्वप्रथम एका जाड कापडात ताजे दही घट्ट बांधून एका ठिकाणी रात्रभर लटकत ठेवा, जेणेकरून सकाळपर्यंत त्यातील पाणी निघून जाईल, अशाप्रकारे दह्यापासून चक्का तयार होईल, तुम्ही वेळ कमी असल्यास बाजारातूनही रेडिमेट चक्का विकत घेऊ शकता. यानंतर काजू बदामचे छोटे तुकडे करा, वेलची सोलून ती थोडी जाडसर ठेचून घ्या. यासह पिस्त्याचेही जाडसर तुकडे कापा.
आता एका भांड्यात दह्यापासून तयार चक्का घ्या. त्यात पिठीसाखर, आंब्याचा पल्प, काजू बदाम पिस्ता आणि वेलची घालून चांगले मिक्स करा. यानंतर त्यावर छोटे आंब्याचे तुकडे, काजू-बदाम-पिस्त्याने ते सजवा, यानंतर काही वेळ फ्रीजमध्ये चांगले थंड होण्यासाठी ठेवा. यानंतर पुरीबरोबर सर्व्ह करा.