Recipe for Paneer Tikka: काही लोकांना कच्चे पनीर किंवा त्याची नेहमीची भाजी आवडत नाही. अशा लोकांसाठी पनीर टिक्का हा एक उत्तम आणि स्वादिष्ट पर्याय आहे. शहरांमधील रेस्टॉरंट्समध्ये लोक आवडीने आणि उत्साहाने पनीर टिक्का खाताना दिसतात. हा पदार्थ दही आणि बेसन यांच्या मिश्रणात घोळवून भाजला जातो, ज्यामुळे त्याची चव अधिकच लज्जतदार होते. त्यासोबत सिमला मिरची आणि कांदा वापरल्याने त्याला एक खास आणि वेगळी चव येते. पनीर टिक्का घरी बनवणं अगदी सोपं आहे आणि त्याला जास्त वेळही लागत नाही. तुम्ही हा पदार्थ स्नॅक म्हणून किंवा मुख्य जेवणासोबतही खाऊ शकता.
पनीर टिक्का बनविण्यासाठी लागणारे साहित्य
पनीर: ३००-४०० ग्रॅम
सिमला मिरची २
कांदा: २
लिंबाचा रस: १ चमचा
कसुरी मेथी: १ चमचा
गरम मसाला: १ चमचा
हळद : अर्धा चमचा
जिरे पावडर (भाजलेले): १ चमचा
दही (घट्ट): अर्धा कप
भाजलेले बेसन: ५० ग्रॅम
आलं-लसूण पेस्ट: २ चमचे
तिखट पावडर आणि मीठ: चवीनुसार
पनीर टिक्का बनवण्याची सोपी कृती
स्टेप १:
सर्वांत आधी कांदा आणि हिरवी सिमला मिरची चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घ्या. त्याचप्रमाणे पनीरचेही चौकोनी तुकडे करून बाजूला ठेवा. आता एका मोठ्या भांड्यात किंवा वाडग्यात दही घ्या आणि ते हलके फेटून घ्या. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. फेटलेल्या दह्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ आणि बाकीचे सर्व मसाले गरम मसाला, हळद पावडर, जिरे पावडर, तिखट पावडर, कसुरी मेथी घाला.
स्टेप २ :
तयार झालेल्या दह्याच्या मिश्रणात चौकोनी कापलेले कांदे, सिमला मिरची व पनीरचे तुकडे घाला. हे सर्व तुकडे मिश्रणासोबत हळुवारपणे एकत्र करा, जेणेकरून प्रत्येक तुकड्याला मिश्रण चांगले लागेल. आता हे पनीर कांदा आणि सिमला मिरचीचे मिश्रण झाकून ठेवा आणि चव चांगली मुरण्यासाठी सुमारे दोन तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
स्टेप ३ :
दोन तासांनंतरमिश्रण केलेले पनीर, कांदा व सिमला मिरचीचे तुकडे बाहेर काढा. त्यानंतर त्यांना बांबूच्या लाकडी किंवा लोखंडी सळईमध्ये टाका. आता ओव्हनमध्ये किंवा गॅसवर सात ते १० मिनिटांपर्यंत ते भाजण्यासाठी ठेवा. जर तुम्ही पॅनमध्ये करीत असाल, तर थोडे तेल वापरून मंद आचेवर भाजा. एका बाजूने भाजून झाल्यावर, उलटून दुसऱ्या बाजूनेदेखील हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
पनीर टिक्का सर्व्ह करा!
आता तुमचा गरमागरम आणि स्वादिष्ट पनीर टिक्का तयार आहे. त्यावर वरून चाट मसाला आणि थोडा लिंबाचा रस टाकून लगेच गरमागरम सर्व्ह करा. हा पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ तुमच्या कुटुंबाला आणि मित्र-मैत्रिणींना नक्कीच आवडेल.