हिवाळ्यातील गुलाबी थंडी, आपल्यासोबत गुलाबी आणि आंबट गोड चवीची स्ट्रॉबेरी घेऊन येत असते. बाजारात मिळणारी ही स्ट्रॉबेरी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. स्ट्रॉबेरीज आपण स्वच्छ धुवून नुसत्या किंवा त्याचे विविध पदार्थ बनवून खाऊ शकतो. पण, कधीकधी या स्ट्रॉबेरी घरी आणून नुसत्याच फ्रीजमध्ये पडून राहतात. अशावेळी या स्ट्रॉबेरीज वाया न घालवता, झटपट तयार होणारे स्ट्रॉबेरी मफिन्स बनवून पाहा. आता मफिन्स बनवायचे म्हणजे किती कष्ट असतील असं वाटत असेल तर काळजी करू नका. बिना अंड्याची आणि झटपट तयार होणारी स्ट्रॉबेरी मफिन्सची रेसिपी पाहा. ही रेसिपी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून @burrpet_ या अकाउंटने शेअर केलेली आहे.
बिना अंड्याचे स्ट्रॉबेरी मफिन्स कसे बनवायचे पाहा

स्ट्रॉबेरी मफिन्स रेसिपी

साहित्य

१/२ कप दूध
१ छोटा चमचा [tsp] व्हिनेगर किंवा लिंबाचा रस
१/४ कप तेल
३/४ पिठीसाखर
१ कप मैदा
१/२ छोटा चमचा [tsp] बेकिंग पावडर
१/४ छोटा चमचा [tsp] बेकिंग सोडा
मीठ
१/२ कप स्ट्रॉबेरीज
१० ग्रॅम बटर

हेही वाचा : प्रेशर कुकरमध्ये झटपट बेक करा केक; घरी केक बनवण्यासाठी पाहा या टिप्स…

कृती

  • सर्वप्रथम दुधामध्ये लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालून बाजूला ठेऊन द्या.
  • एका लहान बाउलमध्ये क्रंबल [crumble] बनवण्यासाठी मैदा, पिठीसाखर आणि बटर भुरभुरीत राहील असे एकत्र कालवून घ्या.
  • आता एका मोठ्या बाउलमध्ये तेल आणि पिठीसाखर व्यवस्थित मिसळून घ्या. नंतर त्यामध्ये मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ असे सर्व कोरडे पदार्थ चाळणीने चाळून घालावे.
  • या सर्व पदार्थांमध्ये चिरलेल्या स्ट्रॉबेरीचे तुकडे घालून पदार्थ एकत्र करून घ्यावे.
  • आता यामध्ये मगाशी तयार केलेले दूध आणि व्हिनेगरचे मिश्रण हळू हळू घालून सर्व पदार्थ ढवळत राहावे. मिश्रणात कोरड्या पदार्थांच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • आता हे मिश्रण मफिन्स बनवण्यासाठी तयार आहे.

ओव्हनला १७० डिग्रीवर प्री हिट करून घ्यावे.

बेकिंग ट्रेमध्ये मफिन लाइनर्स ठेवून त्यात तयार मिश्रण घालून घ्या. या मिश्रणावर मगाशी तयार केलेले क्रम्बलदेखील घाला आणि मफिन्स बेक करून घ्या.
तयार आहेत बिना अंड्याचे स्ट्रॉबेरी मफिन्स.

जर तुमच्या घरी ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह नसेल तर काय करावे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा वेळेस मफिन्सचे सर्व मिश्रण तुम्ही बटर किंवा तेल लावलेल्या वाट्यांमध्ये घालून घेऊन, कढईमध्ये १५ ते २० मिनिटांसाठी मध्यम आचेवर बेक करू शकता.