[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजी हा प्रत्येकाच्या आयुष्यातला हळवा कोपरा असतो. आजी म्हणजे मायेची सय. आजी म्हणजे दुधावरची साय. आजी म्हणजे प्रेमाची भाकर. आजी म्हणजे दुधात साखर. सुरकुतलेल्या हातांनी, आपुलकीच्या स्पर्शानं ती जेव्हा आपल्याला कुरवाळते, तेव्हा सगळी दुःखं, सगळे त्रास पळून जातात. `कसा आहेस बाळा,` असं विचारते, तेव्हा शरीरातला थकवा कुठच्या कुठे नाहीसा होतो आणि मन पिसासारखं हलकं होतं. अख्ख्या जगाबद्दलचा आपल्या मनातला भयंकर रागही आपण विसरून जातो. पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शत्रूलाही आपण अशा अवस्थेत माफ करू शकतो. मी मायेनं केसांवरून हात फिरवते, तेव्हा आपला भांग विस्कटला, हेअरस्टाईल बिघडली, म्हणून आपण कटकट करत नाही. तिनं भल्या पहाटे उठून केलेले लाडू, चिवडा, लोणची, अशा पदार्थांची शिदोरी आपल्या सामानात जड होत नाही किंवा आपलं डाएटही बिघडवत नाही. `सावकाश जा रे बाबा`, हा तिचा सल्ला मुख्य रस्त्याला लागल्या-लागल्या आपण धुडकावून लावणार आहोत, हे माहीत असतानाही आपण अगदी आज्ञाधारकपणे ऐकून घेतो. सगळ्यांनी कायम एकत्र राहावं, दगदग करू नये, तब्येतीची काळजी घ्यावी, आठवड्यातून दोनदा तरी फोन करावा, एखादवेळी सविस्तर पत्र लिहावं, या आपल्या अपेक्षांपैकी कुठलीच अपेक्षा सर्वार्थानं पूर्ण होण्याची शक्यता नाही, याची तिलाही कल्पना असते, पण दरवेळी गावाहून निघताना ती यापैकी एकही निरोप द्यायचं विसरत नाही. आपण मात्र आपल्या घरी आल्यानंतर तिला विसरतो. वर्ष-दोन वर्षांनंतर तिला भेटायला जातो, तेव्हा ती जरा आणखी थकलेली असते. लहानपणी सगळ्या संदर्भांसह, रंगवून सांगितलेल्या राजाराणी, राक्षसाच्या गोष्टी सोडा, रोजच्या व्यवहारातल्या गोष्टीही ती विसरायला लागलेली असते. आता तिला जास्त जपायची वेळ आलेली असते. तरीही निघताना तीच हातावर गूळ-पापडीची वडी ठेवून म्हणते, `जपून जा रे बाबा!`

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make gul papdi vadi maharashtrian recipe
First published on: 12-12-2016 at 01:15 IST