उन्हाचा पारा आता सर्व ठिकाणी वाढू लागला आहे. याचा अर्थ आता अनेकांच्या घरात, छतावर वेगवेगळ्या प्रकारच्या पापडांची वाळवणं घातलेली आपल्याला दिसू लागणार आहेत. उन्हाळा आला कि गावाकडे भरपूर आणि वेगवेळ्या पद्धतीची वाळवणं घातली जातात. मात्र शहरात त्याचे प्रमाण त्यामानाने कमी दिसते. म्हणून सहसा दुकानांनधून पापडांची तयार पाकिटं आणली जातात.
जेवणाच्या ताटामध्ये सर्व पदार्थांसह कधीतरी मस्त कुरकुरीत असा पापड असेल तर जेवणाची रंगत वाढण्यास मदत होते. परंतु अनेकांना पापडाचे वाळवण घालणे म्हणजे मोठ्या कष्टाचे काम वाटू शकते. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @familyrecipesmarathi नावाच्या अकाउंटने शेअर केलेली साबुदाणा पापडाचे रेसिपी मात्र दिसायला आणि करायला अतिशय सोपी वाटते आहे. तसेच एकदा केलेले हे पापड वर्षभर टिकू शकतात असेही व्हिडीओमध्ये सांगितले आहे. चला तर मग काय आहे साबुदाण्याच्या पापडाची रेसिपी, त्याचे वाळवण कसे घालायचे ते जाणून घेऊ.
हेही वाचा : Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
साबुदाण्याचे पापड
साहित्य
२ वाटी साबुदाणा
पाणी
मीठ
कृती
दोन वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावा.
सर्वप्रथम एक पातेलं घेऊन, त्यामध्ये १० वाट्या पाणी तापवत ठेवावे.
पाणी तापल्यानंतर, त्याला एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीसाठी मीठ आणि भिजवलेला साबुदाणा घालून घ्यावा.
आता हे मध्यम आचेवर किमान दहा ते पंधरा मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहे.
हळूहळू साबुदाण्याच्या मिश्रणाला घट्टपणा येईल.
साबुदाण्याचे मिश्रण घट्टसर झाल्यानंतर पातेल्याखालील गॅस बंद करावा.
वाळवण कसे घालावे?
शिजलेले साबुदाण्याचे मिश्रण कोमट होऊ द्या.
आता हे मिश्रण तुम्हाला हव्या तेवढ्या [लहान किंवा मोठे] आकारात प्लास्टिक शीटवर, एखाद्या डावाच्या मदतीने पसरून घ्यावे.
हे सर्व पापड दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्या.
साबुदाण्याचे पापड वाळून तयार झाल्यवावर, सगळे पापड एका घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
तुम्हाला हवे तेव्हा हे पापड तेलात तळून, खाण्यासाठी घ्यावे.
टीप- साबुदाणा शिजवताना पाण्याचे प्रमाण हे पाच पट असावे. आपण रेसिपीमध्ये २ वाटी साबुदाणा शिजवण्यासाठी १० वाट्या पाण्याचे प्रमाण घेतलेले आहे.
अशी ही साबुदाण्याच्या पापडाची अतिशय सोपी रेसिपी इन्स्टाग्रामवरील @familyrecipesmarathi नावाच्या अकाउंने शेअर केली आहे . या व्हिडीओला आत्तापर्यंत २१.५k इतके व्ह्यूज मिळाले आहेत