कसे बनवायचे उपासाचे गुलाबजाम? | How to make Upawas Gulabjam

गोड आवडणाऱ्यांसाठी आणि उपास करणाऱ्यांसाठी स्वादिष्ट पाककृती.

how to make Upwas Gulabjam, उपासाचे गुलाबजाम
Upwas Gulabjam : उपासाचे गुलाबजाम

[content_full]

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करत होता. राजा मनानं खूप चांगला आणि कर्तव्यदक्ष होता. प्रजेवर राजाचं अतोनात प्रेम होतं. प्रजेचं राजावर अतोनात प्रेम होतं. राजाला दोन राण्या होत्या. एक आवडती आणि दुसरी नावडती. आवडत्या राणीला एक मुलगा होता. त्याचं नाव विक्रम. नावडत्या राणीला मुलगी होती, तिचं नाव होतं सुलोचना. सुलोचनाला लहानपणापासूनच चष्मा होता. सगळे तिची चेष्टा करत. तिला कुणी खेळायला घेत नसे. तिला कुणी आपलं म्हणत नसे. राजाला तिचं दुःख कळत होतं, पण वळत नव्हतं. आवडत्या राणीनं राजाला तिच्या ताब्यात ठेवलं होतं. विक्रम हाच राज्याचा वारसदार व्हावा, असं तिला वाटत होतं. त्यासाठी ती राजाला दुसऱ्या राणीबद्दल आणि तिच्या मुलीबद्दल विचारच करू देत नव्हती. नावडती राणी असेच दिवस कंठत होती. आपल्या मुलीला समजावत होती, की एक ना एक दिवस आपल्याला नक्की न्याय मिळेल. आपला भाग्योदय होईल. सुलोचनाला चष्मा असला, तरी ती सगळ्या कामांमध्ये तरबेज होती. स्वयंपाक तर एवढा उत्तम करायची, की तिच्या हातचं खाणारा माणूस बोटं चाटल्याशिवाय जेवण संपवतच नसे. असेच दिवस चालले होते. राज्यात आनंदीआनंद होता. नावडती राणी आणि सुलोचना सोडून बाकी सगळे खूश होते. मात्र या आनंदावर अचानक विरजण पडावं, तसं पडलं. एके दिवशी एक राक्षस त्या राज्यात आला आणि तो सगळ्या प्रजेला छळू लागला. सगळे लोक राजाला शरण आले आणि या संकटातून वाचवण्याची त्याला विनंती करू लागले. राजाला पेच पडला. आवडतीनं ताबडतोब तिच्या पुत्राला आज्ञा केली, की या राक्षसाशी युद्ध कर. विक्रमानं युद्ध केलं, पण तो पराभूत झाला. राक्षस राजाला म्हणाला, राजा, मी तुझं राज्य सोडून जाईन. पण एका अटीवर. राजा म्हणाला, कुठली अट? राक्षस म्हणाला, आज माझा उपास आहे. तू मला उपासाचा एखादा भन्नाट पदार्थ खायला घातलास आणि मी तृप्त झालो, तर मी हे राज्य कायमचं सोडून जाईन. राजा पुन्हा काळजीत पडला. उपासाचा कुठला पदार्थ या राक्षसाला खायला घालायचा? तो नावडतीकडे आला. तिच्यासमोर सगळी कहाणी त्यानं सांगितली. नावडतीनं विश्वासानं तिच्या मुलीवर ही जबाबदारी सोपवली. सुलोचनानं आनंदानं ती जबाबदारी घेतली आणि एक वेगळाच पदार्थ तयार केला. त्याचं नाव उपासाचे गुलाबजाम. राक्षसानं ते खाल्ले आणि त्याला ते प्रचंड आवडले. सुलोचनाचं कौतुक करून, सगळ्या प्रजेची माफी मागून तो कायमचा त्या राज्यातून निघून गेला. तर त्या राजकन्येनं केलेला हा खास पदार्थ आपल्यासाठीही. उपास सोडताना आपल्या पोटातल्या भुकेच्या राक्षसाला शांत करण्यासाठी!

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य

  • ५०० ग्रॅम खवा
  • १ वाटी भगर पीठ
  • ६ वाट्या साखर
  • चिमूटभर खायचा सोडा

[/two_thirds]

[one_third]

पाककृती

  • खवा पुरणयंत्रातून काढणे. नंतर त्यात भगर पीठ घालून मळणे.
  • दोन तास बाजूला ठेवून देणे. 2 तासाने, गुलाबजाम अगदी तळायच्या आधी चिमूटभर खायचा सोडा मिश्रणात घालून पीठ चांगले मळून घेणे. खूप सैल वाटलं तर भगर पीठ अंदाजाने वाढवणे.
  • छोटे छोटे गोळे करून तुपात तळणे
  • 6 वाट्या साखरेत 4 वाट्या पाणी घालून कच्चा पाक करून घ्या. त्यात वेलची पूड घाला.
  • वरील तुपात तळलेले गोळे पाकात टाका. गोळे पाकात टाकताना पाक गरम असावा. अर्धा तास मुरल्यानंतर वाढा.
  • गोळे तळल्यानंतर ते गरम लगेच पाकात घालू नयेत. आधी कागदावर काढून घ्यावेत. दुसरे तळून झाले कि पहिले तेलातील काढलेले गोळे पाकात घालावेत.

[/one_third]

[/row]

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: How to make upawas gulabjam at home maharashtrian recipes

ताज्या बातम्या