कोकणातील शाकाहारी, मांसाहारी पदार्थ जसे जगभरात लोकप्रिय आहेत. तसेच काही गोड पदार्थही तितकेच फेमस आहेत. विशेषत: यात मालवणी खाजा अनेक जण आवडीने खातात. बेसन, गुळासह काही मोजक्या पदार्थांपासून तयार होणाऱ्या मालवणी खाजाचे अनेक प्रकार कोकणात तयार होतात; शिवाय मुंबईत ठिकठिकाणी भरणाऱ्या ‘मालवणी जत्रे’तही स्पेशल ‘मालवणी खाजा’चे स्टॉल पाहायला मिळतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी मालवणी स्पेशल खाजा कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहोत.
साहित्य
१) बेसन- १ कप
२) गूळ- १ कप किंवा पाऊण कप (गोडाच्या आवडीप्रमाणे)
३) आले- १/२ चमचा (किसून घेणे)
४) मोहनासाठी तूप- १ चमचा
५) तळण्यासाठी तेल
कृती
सर्वप्रथम बेसन पीठ चाळून घ्या. त्यानंतर मोहनासाठी एक चमचा तूप गरम करून घ्या. आता गरम तूप बेसन पिठामध्ये घालून पीठ चांगले मळून घ्या. मळून घेतलेले पीठ १० मिनिटे झाकून ठेवा. १० मिनिटांनंतर मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन, पोळपाटावर हाताने चांगला दाबून लांब रोल करून घ्या. त्यानंतर सुरीने त्याचे हव्या त्या आकारात तुकडे करून घ्या.
आता एका पॅनमध्ये तेल तापवून घ्या आणि मध्यम आचेवर हे सर्व खाजे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. एका पॅनमध्ये गूळ घेऊन, ते चांगले वितळवून घ्या. त्यामध्ये आल्याचा कीस चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. आता त्यात हे तळलेले खाजे घालून सतत मिक्स करीत रहा. सर्व खाजांवर गुळाचे आवरण चढेपर्यंत सतत मिक्स करीत राहा. आता गॅस बंद करा आणि थोडा वेळ गुळाच्या पाकात टाकलेला खाजा हलवत (कोरडे होईपर्यंत) राहा.
आता खाजा थोडा वेळ थंड होऊ द्या आणि नंतर एकेक खाजा वेगळा करून घ्या. अशा प्रकारे खुसखुशीत खाजा खाण्यासाठी तयार आहेत.