How to Make Ukdiche Modak: यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाची सुरूवात झाली. या दहा दिवसांच्या गणेशोत्सवात दररोज बाप्पाच्या आवडीचे पदार्थ आपण बाप्पासाठी खास करत असतो. पण त्यात बाप्पाचा अगदी प्रिय पदार्थ म्हणजे मोदक.

पण अनेकदा हे मोदक करताना फुटतात, वेगळाच आकार येतो अशी अनेकांची तक्रार असते. म्हणून आज आपण अगदी परफेक्ट मोदक कसे बनवायचे त्याची रेसिपी जाणून घेणार आहोत आणि त्यासह काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे मोदक फुटणार नाही.

साहित्य

  • तांदूळ
  • पाणी
  • तूप
  • मीठ
  • खसखस
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • गुळाचा किस
  • सुका मेवा
  • जायफळ
  • वेलची
  • गरम दुधामध्ये घातलेले केशर

कृती

उकड (तांदळाचे पीठ) कसे तयार करावे?

  • एक वाटी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्या.
  • त्यात पाणी टाका आणि चार ते सहा तास हे तांदूळ पाण्यात भिजू घाला. रात्रभर तांदूळ पाण्यात भिजू घातले तरी चालेल.
  • त्यानंतर त्यातील पाणी नीट चाळून घ्या. त्यानंतर हे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करा.
  • बारीक केलेल्या तांदूळमध्ये थोडं पाणी घाला व पुन्हा बारीक पेस्ट तयार करा.
  • त्यानंतर एका कढईमध्ये पाणी गरम करा.
  • आणि त्या कढईवर पुन्हा एक कढई ठेवा ज्याला आपण डबल बॉयलिंग पद्धत म्हणतो.
  • कढईवर ठेवलेल्या कढईमध्ये एक चमचा तूप टाका
  • आणि त्यानंतर बारीक केलेले तांदळाचे पीठ त्यात टाका.
  • त्यानंतर त्यात थोडे मीठ टाका आणि मिश्रण एकत्र करा.
  • पीठ हळू हळू घट्ट होईल.
  • त्यानंतर त्यावर झाकण ठेवा आणि वाफ येऊ द्या.
  • वाफ आल्यानंतर उकड तयार होईल.

सारण कसे तयार करावे?

  • सारणासाठी एक दुसरे पातेले घ्या. त्यात तूप टाका. त्यानंतर त्यात खसखस टाका.
  • खसखस चांगले परतून घ्या.
  • त्यानंतर एक वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घ्या आणि अर्धा वाटी गूळाचा किस घ्या. त्यानंतर चांगले परतून घ्या.
  • हे सारण कोरडे होईपर्यंत परतून घ्या.
  • तुम्ही यामध्ये सुका मेवा टाकू शकता.
  • त्यानंतर गॅस बंद करा.
  • त्यानंतर सारण एका प्लेटमध्ये काढा आणि त्यावर जायफळ किसून टाका.
  • तुम्ही वेलची पुड सु्द्धा टाकू शकता.

मोदक कसे भरावे?

  • त्यानंतर बाजूला ठेवलेली उकड घ्या आणि हाताने नीट मळा.
  • त्याचे छोटे छोटे गोळे करा.
  • हा गोळा गोल गोल फिरवा आणि त्यानंतर हाताने या गोळ्याची पारी तयार करा.
  • मोदकाच्या पारीला कळा पाडून घ्या. गरज पडली तर बोटांना तूप लावा
  • त्यानंतर त्यात सारण भरा.
  • कळा एकाबाजूला दाबून घ्या आणि मोदक पॅकबंद करा.
  • त्यानंतर असे सर्व सर्व मोदक भरा.

मोदक कसे वाफवून घ्यावे?

  • एक पातेले घ्या. पाणी टाका. त्यात प्लेट ठेवा.
  • त्या प्लेटवर स्वच्छ ओला रुमाल ठेवा
  • या रुमालवर एकमेकांना न चिकटता मोदक ठेवा.
  • गरम दुधामध्ये घातलेल्या केशराची एक एक काडी या मोदकावर ठेवा आणि झाकण लावून दहा मिनिटे हे मोदक वाफवून घ्या.
  • तुमचे सुरेख व सुंदर असे उकडीचे मोदर तयार होईल.

टिप्स

  • नारळ पांढेशुभ्र असेल तर सारण उत्तम बनते.
  • गूळ खूप जास्त चिकट व कडक असू नये, नाहीतर सारण बिघडू शकते.
  • उकडीचे मोदक करताना शक्यतो आंबेमोहोर तांदूळ वापरावा.
  • अधिक चांगल्या चवीसाठी हळदीच्या पानांमध्ये मोदक उकडावे.
  • मोदक पात्रात मोदक ठेवताना ते एकमेकांना चिकटणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • जर तुम्हाला कळ्या पाडता येत नसतील तर तुम्ही उकडीच्या मोदकाला चमच्याने कळ्या पाडू शकता.
  • मोदक भरताना बोटांना तूप लावा ज्यामुळे नीट मोदक भरता येईल.