Idli Vada Pav : असा क्वचितच कोणी असेल की ज्याला वडा पाव माहीत नसेल. वडापाव हे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. मुंबईच्या लोकांचा सर्वात जास्त आवडता खाद्यपदार्थ म्हणून वडापाव प्रसिद्ध आहे. तुम्ही सुद्धा वडापाव खाल्ला असेल पण तुम्ही कधी इडली वडा पाव खाल्ला आहे का? तुम्हाला वाटेल, हा कोणता खाद्यपदार्थ आहे? अनेकांना या पदार्थाविषयी माहिती नाही. इडलीपासून बनवला जाणारा हा वडापाव इडली वडापाव म्हणून ओळखला जातो. हा इडली वडापाव चवीला अप्रतिम वाटतो आणि बनवायला सुद्धा तितकाच सोपी आहे. ज्या लोकांना इडली आणि वडापाव दोन्ही आवडतात, त्यांनी हा पदार्थ आवर्जून खावा. कदाचिक त्यांना हा पदार्थ आवडू शकतो. हा इडली वडापाव कसा बनवायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यासाठी तुम्हाला ही सोपी रेसिपी नोट करावी लागेल.

साहित्य

  • इडली
  • बटाटे
  • तेल
  • जिरे
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • जिरेपूड
  • काळे मिरी पावडर
  • हळद
  • लाल तिखट
  • मीठ
  • चाट मसाला
  • मसाले
  • टोमॅटो सॉस
  • हिरवी चटणी
  • शेव

हेही वाचा : Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती

  • सुरूवातीला इडली बनवून घ्या.
  • त्यानंतर बटाटे पाण्यात उकळून घ्या.
  • गॅसवर एक कढई ठेवा
  • त्यात तेल गरम करा.
  • गरम तेलामध्ये जिरे, बारीक चिरलेले लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा टाका आणि चांगल्याने परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात मसाले, चाट मसाला, जिरेपूड, काळे मिरी पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाका.
  • त्यानंतर उकळलेले बटाटे सोलून त्यात टाका आणि चांगल्याने परतून घ्या.
  • एक इडली घ्या. या इडलीला मधोमध कापा आणि त्याचे दोन भाग करा.
  • इडलीला दोन भागामध्ये कापल्यानंतर त्याच्या एका भागावर टोमॅटो सॉस लावा. त्यानंतर त्यावर बटाट्याची भाजी लावा. त्यानंतर इडलीच्या दुसऱ्या भागावर हिरवी चटणी लावा. हिरवी चटणी कोथिंबीर, पुदिना आणि हिरव्या मिरच्यांपासून बनवली आहे. त्यानंतर त्यावर थोडे शेव टाका.
  • दोन्ही भाग एकमेकांवर ठेवा. त्यानंतर इडलीच्या वरच्या भागावर सुद्धा तुम्ही टोमॅटो सॉस, हिरवी चटणी आणि शेव टाकू शकता.
  • तुमचा इडली वडा पाव तयार होईल