Fanney Khan Movie Review : आपण पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. अनेकदा ही अपुरी स्वप्नं पालक आपल्या मुलांच्या माध्यमातून पूर्ण करताना पाहायला मिळतात. स्वप्न, नाती आणि आशावाद यांच्यात विणल्या गेलेल्या ‘फन्ने खान’ या चित्रपटाची कथा अशीच काहीशी आहे. मुंबईतल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील हा पिता आपल्या मुलीला गायिका बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना, झटताना दिसतो.

मोहम्मद रफी होण्याचं स्वत:चं स्वप्न अपुरं राहिल्याने मुलीला लता मंगेशकर यांच्यासारख्या मोठ्या गायिकेच्या स्थानी पोहोचवण्याचं स्वप्न पाहतो. सुपरस्टार होण्याची स्वप्नं पाहणारा प्रशांत शर्मा (अनिल कपूर) आपल्या मित्रांमध्ये फन्ने खान नावाने ओळखला जातो. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो जिवापाड मेहनतही करतो. शम्मी कपूर आणि मोहम्मद रफी यांची अक्षरश: पूजा करणाऱ्या फन्ने खानचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. मात्र मुलीच्या जन्मानंतर त्याची स्वप्नपूर्तीची आशा पुन्हा जागी होते. यासाठी तो मुलीचं नाव लता (पीहू संध) असं ठेवतो. मोठी झाल्यावर लतासुद्धा अप्रतिम गाऊ लागते आणि तिच्यात नृत्यकौशल्यही असतं. मात्र, स्थूलतेमुळे नेहमीच तिला हिणवलं जातं.

प्रशांत आपल्या मुलीला स्टार बनवण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. त्याची पत्नी कविता (दिव्या दत्ता) त्याला यात मदत करत असते. या चित्रपटातून पीहूने पदार्पण केलं असून तिने भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. मात्र सतत तिचं वडिलांवर चिडणं समजण्यापलिकडचं वाटतं. सिंगिंग सेन्सेशनच्या भूमिकेतील बेबी सिंह (ऐश्वर्या राय बच्चन) आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसते. मात्र तिच्या भूमिकेला चित्रपटात फारसा वाव नाही. राजकुमार राव आणि ऐश्वर्याच्या केमिस्ट्रीत सहजता नसल्याचं जाणवतं. बऱ्याच कॉमेडी दृश्यांमुळे त्यांच्यातील मूळ केमिस्ट्रीच हरवल्यासारखी वाटते.

बेबी सिंहच्या भूमिकेला कोणतीच पार्श्वभूमी नसल्याने उत्तरार्धात चित्रपटाची कथा भरकटल्यासारखी वाटते. ‘अच्छे दिन’ या गाण्यावरून सुरुवातीला वाद झाला खरा, पण हे एकमेव गाणं सोडता इतर कोणतीच गाणी मनाला भिडत नाहीत. एकंदरीत पालक कशाप्रकारे आपली स्वप्नं मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात यावर ‘फन्ने खान’ हा म्युझिकल ड्रामा आधारित आहे. यामध्ये अनिल कपूर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतात.