भ्रष्टाचार आणि सत्तेचा दुरूपयोग या संकल्पनांवर आधारित मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत प्रदर्शित झाला. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात एका अशा व्यक्तीची कथा आहे जो अत्यंत क्रोधेने आणि हिंसेने भ्रष्टाचाराविरोधात लढत असतो. चित्रपटाचं कथानक जरी ठिकठाक असलं तरी सादरीकरणात तो कुठेतरी कमी पडत असल्याचं दिसतं.

मुंबईसारख्या शहरात पोलिसांच्या हत्या होऊ लागतात. हे सर्व पोलीस भ्रष्ट असतात. हे हत्यासत्र थांबवण्यासाठी आणि यामागे नेमकं कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सुट्टीवर असलेल्या एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याला बोलावलं जातं. इथून चित्रपटाच्या मूळ कथेला सुरुवात होते. पोलिसांची हत्या करणारा सतत त्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात असतो. आता भ्रष्ट पोलिसांच्या हत्येमागे त्या व्यक्तीचा काय उद्देश असतो, तो नेमका कोण असतो याचा उलगडा पुढे चित्रपटात होतो. ही संपूर्ण कथा ऐकायला जरी चांगली वाटत असली तरी त्यांची पडद्यावर मांडणी तितक्याच प्रकर्षाने झाल्याचं दिसत नाही.

गोष्टी घडताना दाखवताना त्यामागे प्रेक्षकांना तर्कशुद्ध कारणही द्यावं लागतं. मात्र याच तर्कशास्त्राची कमतरता चित्रपट पाहताना जाणवते. कोणत्याही वेषात येऊन एक व्यक्ती पोलिसांची हत्या करत असतो, पोलीस ठाण्यात जाऊन एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला मारतो, या सर्व गोष्टी मूळ मुद्द्याला सोडून भरकटत असल्याचं वाटू लागतात. त्यातही कंटाळवाणे संवाद आणि थोडाफार मेलोड्रामा यांमुळे चित्रपट अधिकच लांबल्यासारखा वाटतो. जॉन अब्राहम संपूर्ण चित्रपटात यंत्रवत वावरतो आणि त्याची प्रेयसीही प्रेक्षकांवर छाप सोडण्यात अपयशी ठरते. मनोज वाजपेयी यांनी नेहमीप्रमाणेच दमदार भूमिका साकारली आहे.

चित्रपटात अमृता खानविलकर, गणेश यादव, देवदत्त नागे यांसारखे मराठी चेहरेही पाहायला मिळतात. नोरा फतेहीचं ‘दिलबर’ हे गाणं तेवढं प्रेक्षकांना खिळून ठेवतं. एकंदरीत हा चित्रपट कथानकाच्या मांडणीत कमी पडला असंच म्हणावं लागेल.