14 October 2019

News Flash

दूध, दही आणि ताक

दूध हा रोजच्या आहारातील अतिशय आवश्यक भाग.

पावसाळ्यात दूध व दुधाचे पदार्थ यांचा वापर कसा करावा ते जाणून घेणं गरजेचं आहे.
दूध हा रोजच्या आहारातील अतिशय आवश्यक भाग. दिवसातून किमान दोन वेळा तरी दूध जरूर घ्यावे. सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी दूध आवश्यक आहेच पण लहान मुले, गर्भिणी, स्तन्यदा, शारीरिक कष्ट करणारे लोक तसेच वृद्ध सर्वानी दूध घेणं गरजेचं आहे. पण ऋ तुनुसार या दूध घेण्यामध्ये बदल जरूर करावा. पावसाळ्यात वारंवार सर्दी-खोकला होत असतो म्हणून केवळ दूध घेण्यापेक्षा हळद व सुंठ टाकून उकळलेले दूध प्यावे. थोडे पाणी घालून हळद, सुंठ घालून ते उकळावे व ते दुधात घालून प्यावे. त्यायोगे हळद, सुंठ यांचे गुणधर्मही त्यात मिसळतात व ते पचायलाही थोडे सोपे होते. वारंवार सर्दी खोकल्याची तक्रार हळूहळू कमी होत जाते. प्रथिने, कॅल्शिअम यातून मिळतातच शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढते व वाढत्या वयानुसार होणारा दूध अपचनाचा त्रास कमी जाणवतो. दुधातील पाण्याच्या भेसळीपासून सावध राहावे कारण मिसळले जाणारे पाणी अशुद्ध असेल तर जुलाब, उलटय़ांचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे सुटे दूध घेताना काळजी घ्यावी. दही या ऋ तुमध्ये शक्यतो कमी प्रमाणात खावे. कदाचित त्याने बऱ्याच जणांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे आपल्या वैयक्तिक अनुभवावरून ठरवावे. शक्यतो दही खाताना ते ताजे असावे. खूप दिवसांचे, खूप आंबट झालेले दही वापरू नये. मिरपूड टाकून दही खाण्यास हरकत नाही आणि शक्यतो ते दुपारी खावे, रात्री टाळावे. त्याचप्रमाणे ताकही ताज्या दह्यचे असावे. आंबट दह्यचे ताक वापरू नये. जिरे टाकून ताक घ्यावे. पचनास चांगली मदत होते. दही व ताक या दोहोंमध्ये ताक घेणे अधिक चांगले.
ज्यांना घसा दुखणे, जंतुसंसर्ग, सर्दी, खोकला इत्यादी जाणवत असेल त्यांनी रोजच्या दुधामध्ये सुंठ, हळद याच्याबरोबरीने किंवा वेगळे तुळशीची पाने, गवती चहा, आले इत्यादी वापरावे आणि गरम असतानाच घ्यावे.

– डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com

First Published on July 23, 2016 1:11 am

Web Title: milk yogurt and buttermilk