News Flash

प्लेग ते करोना मार्गे स्वाइन फ्लू

करोना विषाणू संसर्गाचे राज्यातील पहिले रुग्ण दुबईहून परतलेल्या दाम्पत्याच्या रूपाने पुण्यातच आढळून आले

प्लेगवर उपचार करणारे पुण्यातील आरोग्यकेंद्र (१८९७) आणि करोना संसर्ग काळातील संचारनियमन झुगारणाऱ्यांवर कारवाई करणारे पोलीस. (२०२०)

भक्ती बिसुरे

१८९६-९७ सालची प्लेगची साथ असो की मधल्या काळातील स्वाइन फ्लू, डेंग्यूच्या साथी असोत किंवा आताची करोनासाथ, पुण्याला साथरोगांचा अनुभव दांडगा आहे. या अनुभवातून घ्यायचे धडे कोणते?

साथीचे आजार आणि पुणे म्हटले की, त्याचा संदर्भ थेट १८९६-९७ च्या प्लेगच्या साथीपर्यंत जातो. इतिहासाच्या पुस्तकांत अनेकांनी पुण्यातील प्लेगच्या साथीची गोष्ट वाचली असेल; पण ती वाचत असताना, अशी एखादी मोठी साथ आपल्याच आयुष्यात प्रत्यक्ष अनुभवावी लागेल असे मात्र कुणाच्या ध्यानीमनीही नसेल! योगायोग असा की, तब्बल १२३ वर्षांनंतर आलेल्या करोना विषाणूच्या साथीनेही महाराष्ट्रात शिरकाव केला तो पुण्यातूनच! अर्थात, मधल्या काळात स्वाइन फ्लूची मोठी साथ पुण्याने अनुभवली. त्यानंतर स्वाइन फ्लू आणि डेंग्यू हे दरवर्षी नित्यनेमाने येणारे साथविकार जणू पुण्याचे पाहुणे म्हणून येतात. स्वाइन फ्लू ते करोना मार्गे डेंग्यू असा साथीच्या आजारांचा भलादांडगा अनुभव आजच्या पुणे परिसराला आहे हे खरे; मात्र अनुभव आहे म्हणून शहर त्यातून काही शिकले आहे असे म्हणायला फारसा वाव नाही. करोनाकाळात अगदी ठसठशीतपणे ते दिसून आले आहे.

करोना विषाणू संसर्गाचे राज्यातील पहिले रुग्ण दुबईहून परतलेल्या दाम्पत्याच्या रूपाने पुण्यातच आढळून आले. ९ मार्चपासून सुरू झालेला शहरातील रुग्णसंख्येचा हा प्रवास आता तब्बल ४० हजार रुग्णसंख्येच्या घरात जाऊन पोहोचला आहे. दिवसाला काही हजार नव्या रुग्णांची भर पुणे शहर आणि जिल्ह्य़ात पडत आहे. परंतु त्यांना पुरे पडतील अशा आरोग्यसुविधा शहरात खरोखरच आहेत का, असा प्रश्न पडावा असे चित्र सध्या पुण्यात आहे. प्लेगच्या साथीच्या काळात साथरोगांसाठी म्हणूनच उभे राहिलेले डॉ. नायडू रुग्णालय हे आज थोडय़ाथोडक्या नव्हे, तर १२० वर्षांनंतरही पुणे शहराच्या साथरोग उपचारांच्या केंद्रस्थानी आहे. स्वाइन फ्लू काळातही आपली उपयुक्तता सिद्ध केलेल्या नायडू रुग्णालयाने करोनाकाळातही शहराच्या आरोग्याची मोठी भिस्त आपल्यावरच असल्याचे दाखवून दिले. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की, या रुग्णालयाकडे अद्यापही स्वत:चा सुसज्ज अतिदक्षता विभाग नाही. रुग्णालयाचा विस्तारही अनेक वर्षांपासून कागदावरच आहे. करोनाकाळात तातडीने उभा केलेला सहा खाटांचा अतिदक्षता विभाग सोडल्यास, पुणे महापालिका आपली अतिदक्षता विभागाची गरज पूर्ण करण्यासाठी मात्र ससून सर्वोपचार रुग्णालयावर आणि त्यानंतर खासगी रुग्णालयांच्या यंत्रणेवर अवलंबून आहे, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. प्लेग ते करोना या १२३ वर्षांच्या कालावधीत पुणे आणि परिसरात ससूनच्या क्षमतेची आणखी काही रुग्णालये उभी राहणे गरजेचे होते, मात्र तसे घडलेले नाही. एवढेच नव्हे, तर महापालिकेच्या सुसज्ज रुग्णालयांच्या इमारती या केवळ इमारतीच असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे.

पुणे शहर हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक म्हणून नावाजले जाते. अर्थातच पुणे महापालिकेची आर्थिक उलाढालही मोठी आहे. असे असले तरी, आरोग्याच्या पायाभूत सुविधांसाठी त्याचा काही लाभ होताना दिसत नाही. मुळात पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी सक्षम आरोग्य विभाग असणे अपेक्षित आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे हा वर्षांनुवर्षे बातमी, चर्चा आणि चिंतेचा विषय ठरत आला आहे. करोना हे अचानक, अनपेक्षितपणे आलेले संकट क्षणभर बाजूला ठेवले तरी; दरवर्षी डेंग्यू आणि स्वाइन फ्लू या दोन मोठय़ा आजारांना तोंड देणाऱ्या पुणे शहराच्या महापालिकेकडे मधली दोन वर्षे आरोग्य प्रमुखही नव्हते, ही बाब शहराच्या आरोग्याबाबत लोकप्रतिनिधी आणि शासन यांना असलेली ‘आस्था’ दाखवण्यास पुरेशी ठरते.

ज्या प्रमाणात पायाभूत सुविधा आणि यंत्रणा ही शहराच्या अनारोग्याची प्रमुख कारणे आहेत, तसाच नागरिकांचा बेजबाबदारपणा हेही प्रमुख कारण असल्याचे सर्व प्रकारच्या साथींत दिसले आहे. स्वाइन फ्लू या आजारावर लस उपलब्ध आहे; ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुले आणि दुर्धर आजारांचे रुग्ण यांना दरवर्षी ती उपलब्ध करून दिली जाते. मात्र, किती जण ती खरोखरच घेतात हा प्रश्नच आहे. विषाणूजन्य आजाराची प्राथमिक लक्षणे- म्हणजे ताप, सर्दी, खोकला झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, जेणेकरून पहिल्या ४८ तासांत मिळालेले टॅमिफ्लू हे औषध संसर्ग बळावू नये यासाठी मदत करते, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. प्रत्यक्षात आजार अंगावर काढल्याने आणि उपचार वेळेवर उपलब्ध न झाल्याने आजार बळावलेल्या किंवा मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण बरेच असून ही बाब चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोविड हा आजार पुणे शहरात बळावला तो प्रामुख्याने दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टय़ांसदृश परिसरांमध्ये. त्यामुळे त्याबाबत वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना दोष देणे कदाचित सोपे, पण दरवर्षी हजारो डेंग्यूचे रुग्ण शहरात सापडतात. हे रुग्ण सर्रास लब्धप्रतिष्ठित परिसरांतील सदनिकांमध्ये राहणारे ‘सुशिक्षित पुणेकर’ असतात, हे कटू असले तरी सत्य आहे.

करोनाकाळात पाटील इस्टेट, भवानी पेठ, येरवडा, जनता वसाहत अशा दाट वस्तीच्या ठिकाणांनी आरोग्य विभाग आणि यंत्रणांना मोठय़ा चिंतेत टाकले. या भागातील लहान घरे, दाटीवाटी, शिक्षण व सुविधांचा अभाव आणि प्रामुख्याने सामाईक वापरली जाणारी स्वच्छतागृहे, त्यानिमित्ताने एकत्र येणारे नागरिक या समस्या ही या चिंतेची मुख्य कारणे होती. मात्र, महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करून या वस्त्यांतील करोना रुग्णसंख्येला आता आटोक्यात आणले आहे. शहरांतील कोथरूड, बावधन, कर्वेनगर, औंध बाणेर अशा ‘स्मार्ट’ भागांमध्ये वाढत चाललेली रुग्णसंख्या ही आता यंत्रणांची मुख्य डोकेदुखी ठरत आहे. राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही) ही करोना निदान चाचण्या करणारी देशातील महत्त्वाची प्रयोगशाळा पुण्यात आहे. तिच्यावर देशभरातील करोना चाचण्यांची भिस्त; मात्र करोना विषाणू संसर्गाचा हाताबाहेर जाणारा धोका वेळीच ओळखून शहरातील करोना चाचण्यांचे प्रमाण दिवसाला २००-३०० पासून वाढवून ते पाच हजापर्यंत नेण्यात आले आहे. परंतु वाढता संसर्ग रोखण्यास केवळ तेवढेच पुरेसे नाही, हे शहरातील सद्य:स्थितीवरून लक्षात येत आहे.

जे देश जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधांसाठी ओळखले जातात, त्यांनाही करोना विषाणू संसर्गाने मेटाकुटीस आणले आहे. त्या देशांतील आरोग्य सुविधांशी आपल्याकडील सुविधांची तुलना करणे हा फारसे उचित ठरणार नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या सुविधा गरजू रुग्णांनाच मिळाव्यात यासाठी खबरदारी घेणे, हा एकमेव पर्याय सद्य:स्थितीत दिसतो. ते व्हावे यासाठी वेगवान चाचण्या, जोखीम गटातील नागरिकांना वेळीच हेरून त्यांचे विलगीकरण करणे, टाळेबंदीपेक्षा नागरिकांच्या अनावश्यक हालचालींना प्रतिबंध करणे या गोष्टी उपाय म्हणून राबवणे आवश्यक आहे. देशातील शंभर टक्के नागरिकांनी मुखपट्टय़ा वापरल्या आणि नेहमी परस्परांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवले तर करोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. केवळ करोनाच नव्हे, तर या खबरदारीमुळे इतरही अनेक संसर्गाचे प्रमाण कमी होणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. करोनाकाळातही रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे, मुखपट्टी न वापरणारे, घोळका करून रस्त्यांवर गप्पांचे अड्डे जमवणाऱ्या काही पुणेकरांनी थोडी शिस्त अवलंबली, तर या साथरोगास तोंड देण्यासाठी यंत्रणांना मोठी मदतच होईल.

bhakti.bisure@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2020 2:49 am

Web Title: plague coronavirus and swine flu zws 70
Next Stories
1 तरीही महाराष्ट्र पुरोगामी?
2 उभेच नव्हते.. ते ढासळणार कसे?
3 नोकरशाहीची प्रयोगशाही
Just Now!
X