गौरव सोमवंशी

हिशेब ठेवण्याची पद्धत सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी मानवाने विकसित केली. वस्तूंची निव्वळ यादी करणे ते देवाणघेवाणीची दुहेरी नोंद ठेवणे असा हा प्रवास आहे. या पद्धती जशा उपयुक्त ठरल्या, तशाच त्यांतील त्रुटींमुळे त्यांस मर्यादाही आहेत.. पण या साऱ्याचा ‘ब्लॉकचेन’ या नवतंत्रज्ञानाशी काय संबंध आहे?

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

या सदरात ‘ब्लॉकचेन’ या नवतंत्रज्ञानाबद्दल जाणून घेत आहोत. ते जाणून घेताना, येत्या काळात या तंत्रज्ञानामुळे कोणत्या क्षेत्रांत मूलभूत बदल घडून येतील हे तर पाहूच, पण त्याआधी या तंत्रज्ञानाला विविध अंगांनी समजून घेऊ या. मागील लेखात म्हटल्याप्रमाणे, ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान कमी, तत्त्वज्ञान अधिक आहे. त्यामुळे ब्लॉकचेनचा इतिहास हा २००८ मध्ये बिटकॉइन आले आणि ‘ब्लॉकचेन’ हा शब्द पहिल्यांदाच वापरण्यात आला, त्याहीपेक्षा जुना आहे. या इतिहासात पशाचा आणि त्यासोबत आलेल्या बँक आणि न्यायालये यांचाही इतिहास समाविष्ट आहेच; पण त्याचबरोबर आणखी एक पलू यास जोडून आहे, तो म्हणजे- ‘अकौन्टिंग’.. हिशेबनीसाच्या कामाचा इतिहास!

वर्गात ब्लॉकचेन शिकवताना, अकौन्टिंगबद्दल माहिती देणारी स्लाइड पॉवरपॉइंटवर झळकते तेव्हा समोर बसलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसून येते. ही उदासीनता आपण समजू शकतो, कारण हा विषय अगदीच अवघड आणि क्लिष्ट असल्याची सार्वत्रिक भावना आहे. त्यामुळे इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हिशेब ठेवणे आणि संगणकशास्त्रातील ब्लॉकचेन यांमध्ये नक्की संबंध काय? हे जाणून घेण्याआधी अकौन्टिंगचा इतिहास थोडक्यात पाहू या..

कोणत्याही गोष्टीचा हिशेब ठेवणे मानवजातीने केव्हापासून सुरू केले हे सांगणे अशक्य असले, तरी त्याचे सर्वात प्राचीन अवशेष हे पाच हजार वर्षांपूर्वीचे असून ते प्राचीन सुमेरियन संस्कृतीत आढळतात. त्यात दगडाच्या तुकडय़ावर एका विशिष्ट पद्धतीने रेषा ओढल्या गेल्या आहेत. हे करण्यामागील त्यांचा उद्देश असा की, या रेषांच्या संख्येवरून- किती पशू, अवजारे, धान्य वगैरे साठय़ात ठेवले आहेत, हे समजणे सोपे होत असे. यालाच आपण ‘एकेरी नोंद हिशेबपद्धत’ (सिंगल एण्ट्री अकौन्टिंग) असे म्हणतो. हे वाचायला जितके साधे आणि सोपे आहे, तसेच वास्तवातसुद्धा आहे. उदा. वाणसामानाच्या दुकानातून खरेदी करण्यासाठीची सामानयादी आई कागदावर लिहून देते, तेसुद्धा सिंगल एण्ट्री अकौन्टिंगच असते. कारण यात प्रत्येक गोष्टीची नोंद ही एकाच वेळी एकाच ठिकाणी केलेली असते. ती यादी हरवल्यास परत येऊन आईलाच विचारावे लागेल, की काय काय किराणा आणायचा होता! पण हे समजायला सोपे असले तरी लक्षात घ्या की, याच प्रणालीचा उपयोग करून राजा-महाराजांना किल्ले-राजवाडे बांधता आले, सन्य व्यवस्थापन करता आले आणि दैनंदिन व्यवहारही आखता आले. कारण हे सारे करण्यासाठीही हिशोब ठेवणे अनिवार्य आहेच.

पण या सिंगल एण्ट्री अकौन्टिंग पद्धतीत काही त्रुटी आहेत. समजा, जी व्यक्ती हे सगळे हिशेब ठेवण्याचे काम करते, तिच्याकडून काही चुका किंवा खोडसाळपणा झाला तर? उदाहरणार्थ, कोणत्या मजुराने किती तास काम केले किंवा किती दगड-लाकडे ओढून आणलीत (ज्यासाठी मजुराला मोबदला मिळणार आहे), याचा हिशेब ठेवण्याचे काम एका व्यक्तीस दिले आहे. हिशेब ठेवणाऱ्या व्यक्तीने चुकून किंवा मुद्दामहून एखाद्या मजुराने केलेल्या कामाची नोंद मिटवली तर? त्या मजुराकडे कोणताच पुरावा उरणार नाही, की ज्याने हिशेब ठेवणारी व्यक्ती चुकीची आहे हे त्याला सिद्ध करता येईल. दुसरी त्रुटी म्हणजे, सिंगल एण्ट्री अकौन्टिंग हे एका संस्थेसाठी काही प्रमाणात सोयीचे असले, तरी ते व्यवहारासाठी किंवा व्यापारासाठी बिलकूल उपयोगाचे नाही. मग व्यवहार आणि व्यापारासाठी हिशेब ठेवण्याच्या योग्य पद्धतीचा आविष्कार होण्यास हजारो वर्षांचा कालावधी उलटून गेला.

आता आपण येऊ या पंधराव्या शतकात.. इटलीमध्ये! व्हेनिससारख्या समुद्रकिनाऱ्याजवळील शहरांची तेव्हा जगभरातील व्यापारामुळे भरभराट होऊ लागली होती. ज्यास आपण विद्य् चे पुनरुज्जीवन (रेनेसान्स) म्हणतो, तेसुद्धा याच काळात घडले. जर इथे मी असे म्हणालो की, या साऱ्यामागे ‘अकौन्टिंग’चाच वाटा होता; तर काहींना यात अतिशयोक्ती वाटेल. पण.. उदाहरणार्थ, लिओनार्दो दा विंची हे नाव अनेकांना माहीत असेल; तेही याच काळात इटलीमध्ये राहत होते. आपण त्यांना गणितज्ञ, संशोधक, उत्तम चित्रकार म्हणून ओळखतो. पण लिओनार्दो दा विंची यांना ज्यांनी गणित शिकवले त्या फादर लुका पॅचिओली यांचा विसर अनेकांना पडला आहे. या पॅचिओली यांनी पंधराव्या शतकात जगाला ‘दुहेरी नोंद हिशेबपद्धत’ (डबल एण्ट्री अकौन्टिंग) दिली.

काय आहे ही पद्धत? तर.. यात कोणत्याही वस्तूची नोंदणी ही दोन वेळा केली जाईल. उदाहरणार्थ, एका रकमेची आपण ‘डेबिट’ म्हणून नोंदणी केली, की त्याची दुसऱ्या खात्यामध्ये ‘क्रेडिट’ म्हणून नोंदणी करणे गरजेचे आहे. जेव्हा दुकानातून एखादे शीतपेय विकत घेतो, तेव्हा तुम्ही आणि दुकानदार यांच्यात जो व्यवहार झाला त्याचे दोघांसाठी दोन परिणाम संभवतात : काही तरी आले आहे आणि काही तरी गेले आहे. एकाकडे पैसे जाऊन माल मिळाला आहे आणि दुसरीकडे माल जाऊन त्याच्या बदल्यात पैसे मिळाले आहेत. प्रत्येक व्यवहारातील दोन्ही परिणामांची नोंदणी करणे म्हणजे डबल एण्ट्री अकौन्टिंग करणे. याने काय झाले? तर.. यामुळे समुद्रापार व्यापार/ व्यवहार करणे आणि त्याची वेळोवेळी तपासणी होणे हे सोयीचे झाले. म्हणून काहींच्या मते, डबल एण्ट्री अकौन्टिंगमुळे व्यापाराला प्रेरणा मिळाली, त्याने आर्थिक भरभराट झाली, ज्यामुळे पुढे विज्ञान आणि कलेच्या क्षेत्रात प्रतिभेला वेळ आणि प्रयत्न करण्यासाठी अवकाश आणि वाव मिळाला. फादर पॅचिओली यांनी दिलेली ही हिशेब ठेवण्याची पद्धत थोडाफार बदल करून सगळेच वापरतात, अगदी छोटय़ा व्यवसायांपासून बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत!

परंतु डबल एण्ट्री अकौन्टिंग या पद्धतीतही काही त्रुटी आहेतच. समजा, एका बाजूने आपल्या खात्यात नोंदणी केली, पण दुसरी नोंदणी झालीच नसेल तर? कोणाचे बरोबर? अशा अनेक बाबी समोर येत गेल्या आणि म्हणून बँक व न्यायालये यांचा उगमसुद्धा याच काळात झाला. हा काही योगायोग नाही. एन्रॉन कंपनीने केलेल्या घोटाळ्याची २००१ साली चर्चेत आलेली बातमी बऱ्याच जणांना आठवेल. या कंपनीने आपल्या खात्यात खोटे बोलून करोडो रुपयांचा घोटाळा केला होता. हे शक्य झाले, त्यामागे मानवी चूक तर आहेच, पण त्याचसोबत डबल एण्ट्री अकौन्टिंगमधील त्रुटींचा केलेला गैरवापरही आहे.

२००१ पासून काही वर्षे मागे येऊ या.. १९८९ मध्ये, युजी इजिरी या संशोधकाकडे. जपानमधील सर्वात तरुण वयात प्रमाणित लेखापरीक्षक बनण्याचा मान आजसुद्धा त्यांच्या नावावर आहे. नंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांनी १९८९ साली आपल्या अभ्यासात असे नमूद केले की, जर आपण एक असे जागतिक खाते बनवले- ज्यामध्ये प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या व्यवहारांची नोंदणी करावी लागेल; आणि हे सारे हवी ती माहिती गुप्त ठेवून शक्य होत असेल व या जागतिक खात्यात कोणतेच बदल करणे शक्य होणार नसेल, तर आपण ‘त्रिवार नोंद हिशेबपद्धती (ट्रिपल एण्ट्री अकौन्टिंग)’कडे वळू शकतो. म्हणजे काय? तर.. डबल एण्ट्री आणि ट्रिपल एण्ट्री अकौन्टिंग यांत फरक इतकाच की, यातील जी एक अधिकतम नोंद आहे, ती एका अशा अनोख्या खात्यातील नोंद आहे की ज्यातील नोंदींमध्ये खाडाखोड करणे शक्य नाही. आपण खरेदीनंतर दुकानदाराकडे वेगळी पावती मागतो, तसेच हे! इथे वेगळ्या पावतीचे काम त्या अनोख्या खात्याने केले आहे. हे शक्य होण्यासाठी युजी इजिरी यांनी अकौन्टिंगसोबत ‘क्रिप्टोग्राफी’ या पद्धतीचा वापर व्हावा, असे सुचवले होते. (‘क्रिप्टोग्राफी’बद्दल पुढील लेखात जाणून घेऊच!) पण १९८९ मध्ये मांडलेली ही युक्ती कधी अमलात आलीच नाही, कारण तेव्हा आपले ज्ञान आताइतके प्रगत नव्हते.

पण या साऱ्याचा ‘ब्लॉकचेन’शी काय संबंध? तर.. युजी इजिरी यांनी ज्यास ट्रिपल एण्ट्री अकौन्टिंग म्हणून संबोधले होते, ते आणि ब्लॉकचेन यांत बरेच साम्य आहे. म्हणजे, एक जागतिक खाते- ज्यात केलेली नोंदणी बदलली जाऊ शकत नाही. हेच ‘बिटकॉइन’चे दुसरे रूप नव्हे का? म्हणून असेही भाकीत केले गेले आहे की, चलनामध्ये जसा मूलभूत बदल बिटकॉइनने आणला, तसाच बदल जागतिक अकौन्टिंग क्षेत्रातही या ब्लॉकचेनने प्रेरित ट्रिपल एण्ट्री अकौन्टिंगमुळे आलेला असेल. यामुळे हिशेब ठेवण्याच्या प्रक्रियेत सोपेपणा येईलच व त्याच वेळी खात्यांमध्ये बदल करणे जवळपास अशक्य होईल. ब्लॉकचेनचा वापर यासाठीही व्हावा म्हणून अनेक मंडळी कार्यरत आहेत, ज्याबद्दल या लेखमालेत आपण विस्ताराने पाहूच!

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io