गौरव सोमवंशी

‘ईथिरियम’ या तंत्रव्यासपीठावरील ‘द डाओ’ या स्वायत्त संस्थेतून तब्बल साडेतीनशे कोटी रुपये किमतीचे टोकन चोरी झाल्याने तांत्रिक त्रुटी स्पष्ट झाली. ती दूर करण्यासाठी उपलब्ध पर्यायांपैकी कोणता निवडला गेला?

Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
High Court
अपंगांसाठीचे कायदे पुस्तकापुरते मर्यादित ठेवू नका, दृष्टीहीन महिलेला रेल्वेतील नोकरीबाबत दिलासा देताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
land reform
UPSC-MPSC : भारतामध्ये जमीन सुधारणांची गरज का पडली? त्यासाठी सरकारकडून कोणते प्रयत्न करण्यात आले?

एका डिजिटल हल्लेखोराने कसे ‘द डाओ’ या ‘वितरित स्वायत्त संस्थे (डिसेण्ट्रलाइज्ड् ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन- डीएओ)’मधून जवळपास साडेतीनशे कोटी रुपये इतक्या मूल्याचे ईथर टोकन एका ‘चाइल्ड-डाओ’मध्ये वळवले,  हे आपण मागील लेखात पाहिले. ‘द डाओ’मध्ये आधीपासूनच असलेल्या काही तरतुदींमुळे हेही निश्चित होते की, या ‘चाइल्ड-डाओ’मधून कोणासही ३९ दिवसांचा कालावधी संपल्याशिवाय ते टोकन खासगी खात्यात हलवता येणार नाहीत. म्हणजे हल्लेखोराने यशस्वीरीत्या चोरी केली असली, तरी त्या ईथर टोकनवर त्याला मालकी मिळण्यासाठी आणखी ३९ दिवस जावे लागणार होते. ते वाचवण्यासाठी जर या ३९ दिवसांत ‘ईथिरियम’ समुदायाने काहीच हालचाल केली नाही आणि ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’मधील (जिच्यामुळे चोरी शक्य झाली, ती) त्रुटी स्वीकारून त्याची ‘शिक्षा’ भोगायचे ठरवले, तर ३९ दिवसांनी तो हल्लेखोर आपल्या वैयक्तिक खात्यात सगळी रक्कम जमा करून कायमचा फरार होईल.

इथे एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे आहे, की हल्ला हा ‘ईथिरियम’ या ‘ब्लॉकचेन’आधारित तंत्रव्यासपीठावर झालेला नसून, त्यावर बनवल्या गेलेल्या एका प्रोग्रामवर झाला होता. हा प्रोग्राम व्हिटालिक ब्युटेरिन किंवा त्याच्या सहकाऱ्यांनी बनवलेला नसून, इतर मंडळींनी स्वतंत्रपणे बनवला होता. असेच लोकांनी स्वतंत्रपणे या तंत्रव्यासपीठाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि हवे ते प्रोग्राम बनवावेत, हेच तर ‘ईथिरियम’चे उद्दिष्ट होते. हा फरक समजून घेणे गरजेचे आहे. जर प्रोग्रामच ‘चोरी करणे शक्य’ अशा पद्धतीने लिहिला गेला असेल, तर ती होईलच. याचमुळे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानात सगळा प्रोग्राम ‘ओपन सोर्स’ केला जातो, जेणेकरून कोणीही तो बघू शकेल आणि त्यात सुधारणा सुचवू शकेल. ‘द डाओ’बाबतही त्यामध्ये असलेली त्रुटी सुधारावी लागेल असे स्पष्टपणे अनेकांनी मांडले होतेच, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अत्यंत मोठय़ा प्रमाणात गुंतवणूकदारांचा निधी (हजारो लोकांकडून आलेले जवळपास अकराशे कोटी रुपये इतक्या मूल्याचे टोकन) जमा झाला, आणि याच धावपळीत प्रोग्राममधील नेमकी त्रुटी शोधून हल्लेखोराने हा जमा झालेला निधी एका ‘चाइल्ड-डाओ’मध्ये वळवण्यास सुरुवात केली. हे सर्व २०१६ मध्ये काही आठवडय़ांच्या कालावधीत घडले. हा प्रकार जगासमोर उघडकीस येण्यास वेळ लागला नाही. कारण ‘ब्लॉकचेन’वर आधारित असल्यामुळे सर्व काही पारदर्शकच होते. आता उरलेल्या साडेसातशे कोटी रुपये मूल्याच्या टोकनचीसुद्धा चोरी होऊ शकते, हे लक्षात येताच काही ‘चांगल्या’ हॅकर मंडळींनी हे उरलेले टोकन ‘हॅक’ करून स्वत:च्या ‘चाइल्ड-डाओ’मध्ये सुरक्षित ठेवले.

आता उरलेल्या दिवसांत करायचे काय?

‘ईथिरियम’ ही जरी व्हिटालिक ब्युटेरिन किंवा त्याचे सहकारी डॉ. गॅव्हिन वूड यांची संकल्पना असली, तरी ‘ईथिरियम’बाबतचे निर्णय लोकशाही पद्धतीनेच होतात. ‘बिटकॉइन’मध्येही लोकशाही पद्धत अवलंबली जाते, हे आपण पाहिले आहेच. तसेच काहीसे ‘ईथिरियम’मध्येही घडते. पण ब्युटेरिन, डॉ. वूड या ‘सातोशी नाकामोटो’प्रमाणे अज्ञात व्यक्ती नाहीत. त्यामुळे या ओढवलेल्या परिस्थितीत ते कोणता पर्याय सुचवतात, याकडे सर्वाचे लक्ष होते.

आता आपण त्यांच्यासमोर असलेले तीन पर्याय पाहू..

(१) काहीच करायचे नाही : म्हणजे जे घडते आहे ते तसेच चालू द्यायचे. काही दिवसांनी तो हल्लेखोर चोरी केलेले ईथर घेऊन कायमचा फरार झालेला असेल. या पर्यायास काही कट्टर ब्लॉकचेनवाद्यांचे समर्थन होते. अगदी त्या हल्लेखोरानेही नंतर एका निनावी पत्राद्वारे हेच कळवले होते की, हा एक ‘धडा’ असू द्या आणि आपणास या युक्तीचे फळ मिळायला हवे.

याच दरम्यान ‘ईथिरियम’च्या संकेतस्थळावर ‘टु फोर्क ऑर नॉट टु फोर्क’ या शीर्षकाचा एक लेखसुद्धा आला होता. ‘फोर्किंग’ काय असते आणि ‘सॉफ्ट फोर्क’ व ‘हार्ड फोर्क’ यांत काय फरक आहेत, हे आपण ‘बिटकॉइन’च्या उदाहरणावरून (‘बिटकॉइनला पर्याय..’, २३ जुलै) पाहिलेच आहे. थोडक्यात, ‘सॉफ्ट फोर्क’ म्हणजे असा बदल ज्याने ‘ईथिरियम ब्लॉकचेन’ची मुख्य साखळी आणि नियमावली अबाधित राहील. तर ‘हार्ड फोर्क’ म्हणजे इतका मोठा बदल करणे, की ‘ईथिरियम’ समूहातील मायनर मंडळींना ‘नवीन’ किंवा ‘जुने’ असे पर्याय निवडावे लागतील, कारण केलेले बदल हे जुन्या ब्लॉकचेनशी संलग्न नसतील.

(२) ‘सॉफ्ट फोर्क’ करून संकटास सामोरे जाणे : असे केल्यास ‘द डाओ’मध्ये असलेले सगळेच ईथर ‘नष्ट’ करता आले असते, म्हणजे त्यांचा वापर पुढे कोणीच करू शकले नसते. पण असे केल्यास हल्लेखोराबरोबरच गुंतवणूकदारांचेही नुकसान. पण ‘ब्लॉकचेन’ची मूळ साखळी कायम राहिली असती.

(३) ‘हार्ड फोर्क’द्वारे जुन्या ब्लॉकमध्ये जाऊन तिथून दुसरी साखळी सुरू करणे : म्हणजे ‘ईथिरियम ब्लॉकचेन’मधील ज्या ब्लॉकला ‘द डाओ’वर हल्ला झाला होता, त्यापासून पुढे एक स्वतंत्र आणि वेगळी साखळी बनविणे. या पर्यायाला ब्युटेरिन आणि डॉ. वूड- दोघांचाही उघड पाठिंबा होता. त्यांच्या मते, तंत्रज्ञान कितीही स्वयंपूर्ण आणि स्वयंनियंत्रित असले, तरी ते वापरणारी शेवटी माणसेच असतात. म्हणून सर्वाना बहुमताने हा पर्याय योग्य वाटत असेल, तर ‘ईथिरियम’मध्ये ‘हार्ड फोर्क’ करणे काहीही वावगे ठरणार नाही. हा पर्याय मग अनेकांना योग्य वाटू लागला.

वास्तविक ‘ब्लॉकचेन म्हणजे काळ्या दगडावरची रेघ’ असे या तंत्रज्ञानाचे वैशिष्टय़ सांगितले जाते. म्हणजे वरील चोरीची नोंद ‘ब्लॉकचेन’मध्ये झालीच असेल ना? मग स्वत:च काळात मागे जाऊन जुन्या ब्लॉकपासून नवीन साखळी सुरू करणे हे ‘ब्लॉकचेन’च्या तत्त्वाशी सुसंगत ठरेल का? डॉ. वूड आणि ब्युटेरिनच्या मते, याचे उत्तर सकारात्मकच आहे. असे असले तरी, बहुमतानेच पर्याय निवडला जाईल. पण जे अल्पमतात आहेत, त्यांनासुद्धा पूर्णपणे स्वातंत्र्य असेल. यामुळे गुंतवणूकदारांना आपले पैसे परत मिळतील.

नेमके तेच घडले. उदाहरणार्थ, अमेरिकी भौतिकशास्त्रज्ञ ह्य़ीव एव्हरेट यांनी मांडलेले ‘मेनी-वर्ल्ड्स इंटरप्रिटेशन’! या अन्वयार्थसूत्रानुसार, निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आपले विश्व हे तितक्या स्वतंत्र भागांमध्ये विभागले जाते आणि प्रत्येक पर्यायाचे एक स्वतंत्र असे विश्व बनते. या विश्वात ‘श्रोडिंगरची मांजर’ जिवंत आहे की मेली आहे, याचे उत्तर असे असते : विश्वाचे आता दोन भाग झाले आहेत. एकामध्ये ती मांजर जिवंत आहे आणि एकात ती मेली आहे. तुम्हाला जर ती मांजर मेलेली दिसली, तर दुसऱ्या विश्वात वावरणाऱ्या तुमच्या दुसऱ्या रूपाला तीच मांजर जिवंत दिसेल!

२० जुलै २०१६ रोजी ‘ईथिरियम’मध्ये वरीलपैकी तिसरा पर्याय निवडून ‘हार्ड फोर्क’ घडवले गेले, तेव्हा असेच काहीसे झाले. ८५ टक्के लोकांनी ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका’ असा पवित्रा घेत ‘हार्ड फोर्क’चा पर्याय निवडला, ज्यामध्ये ती चोरी खोडली गेली होती. उर्वरितांनी जुनीच साखळी सुरू ठेवली. जी नवीन साखळी होती, तिला ‘ईथिरियम’ हे जुने नाव मिळाले; ज्यांनी काहीच बदल न करता जुनीच साखळी चालवायची ठरवले, त्या ब्लॉकचेनला ‘ईथिरियम क्लासिक’ असे नाव मिळाले. पण सर्व विचार वा निर्णयांची परीक्षा ही अंतिमत: बाजारपेठेतच होते. बाजारपेठेने ‘हार्ड फोर्क’ करून बनलेली नवीन ‘ईथिरियम’ हीच श्रेष्ठ ठरवली. २०१६ नंतर जेव्हा केव्हा ‘ईथिरियम’बद्दल बोलले जाते, तेव्हा अनेकांना हे माहीत नसते की आपण नवीन ब्लॉकचेनबद्दल बोलतोय, कारण तीच आता ‘मुख्य’ बनली आहे!

या घटनेनंतर सर्वाना हे कळून चुकले की, प्रोग्रामिंगच्या चुका इतर ठिकाणी केल्यास तितका मोठा धोका नाही जितका ‘ब्लॉकचेन’च्या दुनियेत आहे. कारण इथे अनेक कामे मध्यस्थ बाजूला सारून थेट ‘स्मार्ट कॉण्ट्रॅक्ट’द्वारे केली जातात. त्यामुळे हा नवा मध्यस्थ खरेच किती ‘स्मार्ट’ आहे याची शहानिशा होणे अत्यंत गरजेचे आहे. हेही अधोरेखित झाले आहे की, काही वेळा सर्वासाठी हितकारक असणारे निर्णय हे तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन संवादाने उचितरीत्या घेतले जाऊ शकतात.

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत.

ईमेल : gaurav@emertech.io