24 November 2020

News Flash

शेती राजकारण क्रिकेट… बालगीतं.. गुडघेदुखी… इ.

माणूस १- गुडघेदुखी सुरू झाली चार वर्षांपासून. पण आता मात्र कमी झालीये या केरळच्या तेलाने.

माणूस २- लहान मुलांसमोर बोलताना विषय कसा मांडावा हे इतकं सुंदर सांगितलं आजच्या व्याख्यानात चौबळांनी.. फार सोपं करून सांगितलं.

खालील संवाद पाहा..

माणूस १- गुडघेदुखी सुरू झाली चार वर्षांपासून. पण आता मात्र कमी झालीये या केरळच्या तेलाने.

‘तो’- कसलं तेल लावता? अहो, जाहिरातबाजी असते नुस्ती. व्यायाम करा.. नाहीतर सरळ बदलून घ्या गुडघे. आजकाल तीस टक्के लोकांचे गुडघे हे कृत्रिम असतात. तुम्हीपण करून घ्या ऑपरेशन. पुढे ३० वर्षे कटकट नाही.

…..

माणूस २- लहान मुलांसमोर बोलताना विषय कसा मांडावा हे इतकं सुंदर सांगितलं आजच्या व्याख्यानात चौबळांनी.. फार सोपं करून सांगितलं.

‘तो’- सोपंच सांगणार. अवघड यायला हवं ना? लहान मुलांना वास्तवाची जाणीव योग्य वेळेला करून द्यायला हवी. उगीचच दारूला मोठय़ांचं औषध म्हणायचं नाही. दारू आहे तर दारू आहे सांगायचं. पोरं फार तयार असतात. चौबळांना म्हणावं वाचन कमी पडतंय.

…..

माणूस ३- किती सोप्या शब्दांत किती सुंदर गाणं लिहिलंय ना हे? अगदी आपल्याच मनातलं सगळं मांडलंय असं वाटतं.

‘तो’- शी! हे काय गाणं आहे? पूर्वीची गाणी ऐका.. उगाच नाही आम्ही वेडे व्हायचो गाण्यांवर!

…..

माणूस ४- देवाधर्माचं करायलाच हवं हो.. चालीरीती पाळायला हव्यात..

‘तो’- कुठल्या जमान्यात राहता तुम्ही? ‘कर्मवाद’ शब्द ऐकलाय का कधी?

…..

माणूस ५- अरे श्रावणबिवण कसला पाळतोस? अमेरिकेत कुठे पाळतात आपली लोकं?

‘तो’- परंपरा वगैरे सगळं गुंडाळून ठेवलंय वाटतं. देव बघतोय- लक्षात ठेव. सगळं या जन्मातलं या जन्मात फेडाल.. लक्षात ठेवा.

या सर्व संवादांतील ‘तो’ हा माणूस कोणत्याही विषयावर कुठल्याही वेळी कितीही बोलू शकतो. विषयाची अट नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निष्पन्न होण्याची गरज नाही. किंबहुना, त्यातून कोणत्याही एका ठाम अशा मतावर न पोहोचणे हेच ‘तो’ करत असलेल्या चर्चेचं वैशिष्टय़.

अशी माणसं लहानपणापासूनच वेगळी दिसतात. त्यांना आंबा आवडत नाही. ते शाळेत असताना सहलीला गेल्यावर सगळा वर्ग गाण्यांच्या भेंडय़ा खेळायला लागला की ते बसमधून खिडकीतून निसर्ग बघतात आणि म्हणतात, ‘अरे, गाणी कसली म्हणता? निसर्ग बघा किती सुंदर आहे..’ मग त्यांना कोणीतरी ‘ट्रिपला आला आहेस तर आमच्याशी खेळ की! निसर्ग बघायला नंतर एकटा ये..’ असं सांगतं. ते त्याला पटतं, पण तेव्हा शाब्दिक वाद चालू ठेवला जातो आणि..

कॉलेजच्या ट्रिपला ते शाळेतलं वाक्य एका दुसऱ्या मुलावर फेकलं जातं.. ‘अरे, खेळ की! निसर्ग कसला बघतोस?’’

एकूणच स्वत:ची अशी पक्की विचारधारा किंवा मतं असण्याची यांना गरज वाटत नाही. मतांची एक पोतडी मिळाली की ती दुसरीकडे जाऊन उघडायची- हाच छंद. सातत्याने ‘मी ‘वेगळा’ आहे, ‘माझे’ म्हणून काही स्वतंत्र विचार आहेत’ हे दुसऱ्यांना सांगण्यातच मजा येते यांना. शाळेमध्ये खूप मार्क्‍स मिळून पहिले-दुसरे येणाऱ्यांना हे ‘घासू’ म्हणतात. शिक्षकांच्या लाडक्या विद्यार्थ्यांना ‘चमचे’ म्हणतात. स्वत:वर सातत्याने होणारा अन्याय हा गप्पांसाठीचा सर्वात आवडता विषय असतो यांचा. ‘आम्हाला कुठे रे आई-वडिलांनी लहानपणापासून चैन करू दिली?’ ‘आम्हाला कधी मिळणार चान्स टॅलेन्ट दाखवायचा?’ हे गॅदरिंगनंतर! पुढे जाऊन हाच विषय ऑफिसमध्ये प्रमोशनपर्यंत जातो.

कॉलेजमध्ये टाय डेला यांचा राष्ट्राभिमान उफाळून येतो आणि पारंपरिक कपडे दिन साजरा करायच्या दिवशी हे मुद्दाम वैश्विक धोरण अंगीकारून शर्ट-पॅन्ट घालून कॉलेजमध्ये येतात. सिद्ध काहीच करायचं नसतं; पण एक आगळावेगळा ‘असहकार’ अवलंबणारी ही मंडळी सतत आपलं अस्तित्व दाखवत राहतात. कोणीही कोणाचंही गरजेपेक्षा जास्त कौतुक करणं यांना मंजूरच नसतं. तुम्ही चहाची तल्लफ आलीये म्हणा, हे कॉफीचं कौतुक सांगतात. तुम्ही तेंडुलकरचे भक्त आहात हे समजलं की हे लगेच ब्रायन लाराचे किस्से सांगतील. सचिनने सेंच्युरी करूनही भारत कसा हरला याची चर्चा करतील. तुम्ही मराठी भाषेचं गुणगान करा.. हे लगेच बंगालीसुद्धा तितकीच समृद्ध आहे सांगतील. तुम्ही पुणेकर असलात तर ते पुण्याची थट्टा करून मुंबई, नागपूर, कोल्हापूरचे गोडवे गातील. मुंबईकराला मुंबईविषयी टीका करून भंडावून सोडतील. आत्ताच इंजेक्शन घेऊन आलो सांगा- ते त्यापेक्षा चूर्ण बरं म्हणतील. डॉक्टरने ऑपरेशन नक्की केलं की हा रोग फक्त योगासनांनी बरा होतो अशी माहिती देतील. एकूणच तुम्ही जे म्हणाल त्यावर टिप्पणी करायची शक्ती- आणि त्यापेक्षाही हौस असलेली ही मंडळी. एखादा माणूस एखादी गोष्ट करतोय तर त्याला अनुमोदन देणे, त्याने घेतलेला निर्णय योग्य समजणे आणि दुसऱ्याच्या मताचा आदर करणे- या गोष्टी यांना संपूर्णपणे नामंजूर असतात.

यांना खूप गर्दी होणारे गाण्याचे कार्यक्रम, नाटक व चित्रपट आवडत नाहीत. जसा स्वत:वर अन्याय झालाय तसा दैवाने ज्यांच्यावर अन्याय केल्यामुळे प्रेक्षागृहामधल्या आणि रंगमंचावरच्या लोकांच्या संख्येत चढाओढ असते अशी नाटकं व गाण्याचे कार्यक्रम यांना आवडतात. गर्दीने डोक्यावर घेतलेल्या गोष्टी यांना उथळ वाटतात आणि फार आडवळणाने जाणाऱ्या कलाकृती या ‘मुद्दाम अवघड करतात हे कलाकार!’ अशा रकान्यातील वाटतात.

यांचा नेमका कोणावरच आक्षेप नसतो. आक्षेप असतो तो स्वत: दुसऱ्याचं मत, आवड, विचार स्वीकारण्यावर! सहजपणे दुसऱ्याचं मत पटवून घेणारे लोक म्हणजे अगदीच बावळट, दुबळे असं समजणारे हे अस्वस्थ आत्मे नक्की कोणत्या गोष्टीवर खूश होतील हे सांगता येत नाही. अनेक गटांत वावरताना एका ठिकाणी वाद घालून जिभेला धार झाली की ते दुसरीकडे ड्रॅगनच्या तोंडातून ज्वाळा याव्यात तशी आपली मतं फेकतात. बरं, त्यांना कोणाला खूप नीट समजावून सांगण्यात रस नसतो. तुम्ही जर म्हणालात की, ‘बरं सांग मला नीट उकलून..’ तर ते म्हणतील, ‘तुझा तू विचार कर.’ पॉमेरियन कुत्रा जसा चेंडूशी खेळत बसतो तशी मुद्दा घेऊन त्याच्याशी खेळत बसणारी ही मंडळी! रात्री गाडीतून जाताना, रिक्षातून जाताना गाडीमागे जीव तोडून धावणारी कुत्रीही अशीच. बारा-पंधरा पावलं जीव तोडून पळतात आणि मग एकदम अशी मागे फिरतात, की जणू त्यांना वेगळ्या नंबरची गाडी हवी होती. योगी मंडळी म्हणतात की, ‘साध्य मिळेल म्हणून साधना करू नका. साधनेचा आनंद मिळवा.’ तसंच मुद्दा समजावा, समजून घ्यावा अथवा द्यावा म्हणून हा वाद, ही चर्चा नसते; तर केवळ वादाचा आनंद म्हणून त्यांना बोलायला आवडतं.

हे लोक कोणाचं काही वाईट करत नसतील- किंबहुना, करत नाहीतच. त्यांचा इतरांना होणारा त्रास हा त्या- त्या वादापुरताच. पण नीट विचार केला तर या मंडळींनाच किती त्रास होत असेल! प्रत्येक गोष्टीत काहीतरी न्यून शोधा, त्यापेक्षा दुसरं काहीतरी कसं सरस आहे हे दुसऱ्याला पटवून सांगा.. फार खोलवर नाही, पण त्या क्षणापुरता तरी तो वाद जिंकल्याचा आनंद मिळवा.. बाप रे!

मला अगदी मनापासून काळजी वाटते अशा वादनिपुण मित्रांची. कसलाच आनंद न मिळणे, मनापासून आवडलं तरीही केवळ आपली इमेज राखायला त्याला वाईट म्हणणे, सातत्याने तुलना करत राहणे, हे तसे काळजी करण्यासारखेच आजार आहेत.

आरशात बघतानाही ‘आपण का आहोत? आपण ‘असे’ का आहोत?’ अशा नजरेने बघणारे हे म्हणजे परमेश्वराने मूड ऑफ झालेला असताना बनवलेली गाणी वाटतात मला.

कार वॉश करणाऱ्या पंपासारखा एखादा पाण्याचा फवारा घेऊन यांचा मेंदू धुऊन पुन्हा फिट् करायला हवा. आपण अशांना ‘येडा’ म्हणून सोडून देऊच हो; पण त्यांचं जगायचं राहून जातंय त्याची चिंता वाटते!!

लेख वाचून ‘तो’ मला सांगेल, ‘अरे, अशा लोकांना एकटं राहू द्यावं. फार त्रास देतात हे. तू चिंता नको करू. ध्यान धर. योगासनं कर. नाहीतर मग तू ७७७ किंवा ७७७ आणि मग ७७७ शिवाय..’

– सलील कुलकर्णी
saleel_kulkarni@yahoo.co.in

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2015 12:44 am

Web Title: article about unique peoples
Next Stories
1 प्लीज थोडं समजून घ्याल ना?
2 ‘सुखानेही असा जीव कासावीस’
3 वैचारिक बैठक.. तत्त्वं.. आणि खिडकीतला हात!!
Just Now!
X