03 April 2020

News Flash

लिहावे (फेसबुकवरीही) नेटके..

मुळात ही विभागणी करून टाकण्यामागे, तशी मानसिकता तयार होण्यामागे काही कारणे निश्चितच आहेत.

इंग्रजी साहित्याच्या विद्यार्थ्यांना फेसबुक पोस्ट कशी लिहावी, याचे शिक्षण देण्याचा दिल्ली विद्यापीठाचा मानस

‘लिहिणे’ म्हणजे काय आणि ‘लिहिणारा’ कुणाला म्हणायचे? काय लिहिले म्हणजे ते लिहिणाऱ्याला ‘लिहिणारा’ असे म्हणता येईल?

कुणाला हे प्रश्न अगदीच बाळबोध वाटतील, तर कुणाला अगदीच मूलभूत. पण हे प्रश्न पडण्यामागे आणि ते विचारण्यामागील विचार हा माध्यमाचा, लिखाणाच्या रीतीचा आणि लिखाणामागील उद्देशाचाही! सर्वसाधारण आजच्या लिखाणाचे माध्यम हे कागद, पेन किंवा मग संगणक. आणि ते लोकांपर्यंत पोहोचणार ते पुस्तकरूपात. मग ती कथा असो, कादंबरी असो, कविता असो, आत्मचरित्र असो वा काही वैचारिक मांडणी असो. पण या पुस्तकरूपी माध्यमाच्याही पुढे जाऊन बक्कळ लिखाण आज होत आहे. फेसबुक, ब्लॉगवरील लिखाण हे त्याचे उत्तम व ठळक उदाहरण. मात्र, अद्यापही पुस्तके सोडून इतर माध्यमांतून केले जाणारे लिखाण हे कमअस्सल असते असा शिक्का आधीच तयार करून त्या लिखाणास नाके मुरडणाऱ्यांचे प्रमाण मोठ्ठे आहे.

या अशा स्थितीत दिल्ली विद्यापीठाने घेतलेला एक निर्णय महत्त्वाचा ठरतो.

काय आहे हा निर्णय?

विद्यापीठ म्हटले आणि त्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा अभ्यास म्हटला की त्याची एक ठाशीव रीत असतेच. त्या रीतीमधील लिखाण अर्थातच कागदावरचे. आणि कागदावरील लिखाण म्हटले की त्याची स्वत:ची एक रचना आली. या रचनेच्या पलीकडे जाण्याचा दिल्ली विद्यापीठाचा विचार आहे. तो आहे या विद्यापीठात इंग्रजी साहित्य हा विषय घेऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत. या विद्यार्थ्यांसाठी एक नवा विषय विद्यापीठ आणू पाहतेय. ‘फेसबुकवर पोस्ट कशी लिहावी’ हा तो विषय. ललित साहित्य, ललितेतर साहित्याचे लिखाण म्हणजेच केवळ ‘लिखाण’ असे नव्हे. लिखाणाच्या बदलत्या रीतीस अनुसरून जे काही नवे पायंडे पडत आहेत त्यास एक शिस्तबद्ध रूप देणे, अ‍ॅकॅडेमिक ढाचामध्ये ते बसवणे हेही आवश्यकच आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या नव्या विषयाचा समावेश करणे गरजेचे आहे, अशी दिल्ली विद्यापीठाची सर्वसाधारण भूमिका. याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. महाविद्यालयांकडून त्याबाबत सूचना मागवण्यात आल्या आहेत. पुढील सोपस्कार नीट पार पडले तर हा विषय दिल्ली विद्यापीठातील इंग्रजी साहित्याच्या विद्यार्थ्यांसाठी रीतसर विषय म्हणून येऊ  शकेल.

याच मजकुराच्या प्रारंभी विचारलेले प्रश्न आता येथे पुन्हा विचारता येतील. लिहिणे आणि लिहिणाऱ्याच्या संदर्भातील ते प्रश्न. त्यांची उत्तरे फेसबुक, ब्लॉग्ज अशा माध्यमांच्या अनुषंगाने द्यावी लागतील. ही माध्यमे नवी म्हणावी इतपत आता नवीन राहिलेली नाहीत. ती पुरती परिपक्व झाली आहेत असेही नाही. ती परिपक्व होण्यास काही कालावधी द्यावा लागेल. आणि कुणास ठाऊक, उद्या लिखाणासाठी तंत्रावर आधारीत असे काहीतरी नवेच माध्यम पुढे येईल, की ज्यामुळे आत्ताच्या या  माध्यमांवरील लिखाण, त्याची रीत कदाचित मागेही पडेल. तंत्रविकासाचा झपाटा पाहता ही शक्यता मोडीत नाही काढता येणार. पण भविष्याविषयी राहू देत; सध्या आपण वर्तमानाविषयीच बोलू या.

इंग्रजी साहित्याच्या विद्यार्थ्यांना फेसबुक पोस्ट कशी लिहावी, याचे शिक्षण देण्याचा दिल्ली विद्यापीठाचा मानस म्हणजे एका रीतीने या लेखन-माध्यमास अ‍ॅकॅडेमिक पातळीवरून मिळालेली मान्यतापावती आहे असे समजायला हरकत नाही. तशा पावतीची आवश्यकताही आहेच. कारण फेसबुक वा ब्लॉगवरील लिखाणाकडे पाहण्याची अनेकांची नजर अजूनही म्हणावी तितकी खुली नाही. या माध्यमांवरील लिखाण म्हणजे काहीतरी कुचाळक्या करणे, आले मनात काहीतरी.. लिहिले चार शब्द आणि दिले टाकून त्यावर- अशा रीतीचेच असते, असा अनेकांचा ठाम ग्रह आहे. त्यामुळे पुस्तकांतील साहित्य तेवढे गंभीर आणि या माध्यमांतील साहित्य म्हणजे उथळ अशी सरळसोट विभागणी अनेकांनी करून टाकलेली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या वरील पावलाने या विभागणीमागील मानसिकता काही अंशी तरी बदलण्यास मदत होईल, ही अपेक्षा.

मुळात ही विभागणी करून टाकण्यामागे, तशी मानसिकता तयार होण्यामागे काही कारणे निश्चितच आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे फेसबुक काय किंवा इंटरनेटवरील अन्य माध्यमे काय; एक प्रकारचे खुले कट्टेच ते. कुणीही यावे, काहीही लिहून जावे- अशी सोय या माध्यमांनी केलेली. त्यामुळे त्यावर बरे-वाईट, अस्सल-कमअस्सल, कसदार-फोलपटांसारखे असे सारेच येणार. त्यास पर्याय नाही. पण त्यातही निवडण्याची सोय आहेच की वाचकांना! खरे तर सगळ्यांनाच. तेथे कुणी कुणाला हाताला धरून अमके वाचलेच पाहिजे, अशी सक्ती करीत नसते. त्यामुळे पसंत ते घ्यावे, नापसंत ते दूर सारावे, अशी सोय आहेच तेथे. ती असताना सरसकट त्या माध्यमांच्या नावाने शिमगा करण्याची खरोखरच गरज आहे का?

आणि महत्त्वाचे म्हणजे दर्जाचा मुद्दा पुस्तकांनाही लागू आहेच. अगदी आपल्या मराठीपुरता विचार करू या. मराठीत सातत्याने अक्षरश: पैशाला पासरी रीतीने पुस्तके प्रसिद्ध होत असतात, प्रकाशित होत असतात. ती सारीच श्रेष्ठ असतात, उत्तम दर्जाची असतात असे काही आहे का? त्यातही अत्यंत भंगड असे साहित्य असतेच की!

दुसरा मुद्दा या माध्यमांवरूनही प्रसिद्ध होत असलेल्या चांगल्या व अगदी अव्वल दर्जाच्या साहित्याचा आणि त्यावरून होणाऱ्या साहित्यप्रसाराचा. या माध्यमांवरून होणारे काही लिखाण खरोखरच चांगल्या प्रतीचे असते, हे ही माध्यमे नेहमी हाताळणाऱ्यांना चांगलेच ठाऊक आहे. लेखनातील काही प्रयोगही त्यावर होत असतात. आता बहुशब्दी, दीर्घ लांबीचे साहित्य.. जसे की कथा, कादंबरी हे त्यावर प्रसिद्ध होणे खूपच कठीण. पण त्याव्यतिरिक्तही साहित्य आहेच. या माध्यमांवर सक्रिय असलेल्या काही जाणत्या मंडळींकडून चांगल्या साहित्याविषयीची माहिती पोहोचते, हा फायदा कसा नाकारणार? अनेक चांगल्या लिहित्या मंडळींची ओळख या माध्यमांमुळे होते, हा त्यांचा लाभ कसा नाकारणार?

ही माध्यमे हाताळणे तांत्रिकदृष्टय़ा फारसे अवघड काम नाही. हाताळणीस सोपे असणे हे त्यांच्या लोकप्रियतेमागील एक कारण आहे. त्यामुळे त्यांचा वापर करणे कुणालाही सहज शक्य आहे. असे असले तरी या माध्यमांचे नाते मुख्यत: जोडले गेले आहे ते तरुणाईशी. आता ज्या पिढीशी या माध्यमांचे नाते जोडले गेले आहे, त्या पिढीची आतली आणि बाहेरची अशा दोन्ही भाषा या माध्यमांवर येणे साहजिकच आहे. या पिढीतील मंडळी त्यांना हव्या त्याच पद्धतीने व्यक्त होणार ना.

एक मुद्दा- या माध्यमांवरील लेखनाला, पोस्टना मिळणारी दाद! तर ही प्रक्रिया बहुतांश वेळा काहीशी तातडीची आणि त्यामुळेच फारसा विचार न करता होणारी. त्यामुळे योग्यता नसलेल्या लेखनालाही लाइक्स मिळण्याचे प्रमाण भरपूर. पण म्हणून केवळ तो निकष लावून या माध्यमावर फुली मारण्याचे कारण नाही. शेवटी प्रत्येकाला स्वत:ची अशी रसिकबुद्धी, विवेक असतोच. काहीही झाले तरी या गोष्टी आपल्यापाशी शाबूत ठेवणे हे ज्याचे-त्याचे स्वतंत्र काम व जबाबदारी. ही जबाबदारी सांभाळता येत नसेल तर त्याचे खापर अन्य कुणावरही फोडण्याचे काहीही कारण नाही.

या माध्यमांनी सगळ्यांनाच लोकशाही व स्वातंत्र्य दिलेले आहे, ही गोष्टही महत्त्वाची. हे स्वातंत्र्य अगदी टोकाचे आहे. बेबंद वागता येईल इतके टोकाचे आहे ते. येथे पुन्हा मुद्दा येतो तो ज्याच्या-त्याच्या रसिकबुद्धीचा, दर्जा जोखण्याच्या क्षमतेचा. पण हा गुण तर छापील पुस्तकांबाबत- किंबहुना, एकूणातच जगण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा. त्यामुळे या स्वातंत्र्याच्या नावानेही खडे फोडण्यात हशील नाही.

आता या अशा सगळ्या पाश्र्वभूमीवर दिल्ली विद्यापीठाने टाकलेल्या पावलाकडे बघणे गरजेचे आहे. ‘लिहावे नेटके..’ हे गरजेचे आहेच. त्याचे मोल नाकारून चालणारच नाही. पण आजच्या काळाला अनुसरून ‘लिहावे फेसबुकवरीही नेटके’ असे सांगण्याची, शिकवण्याची गरज आहे. दिल्ली विद्यापीठ तेच करू बघत आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे स्वागतच!

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2017 2:00 am

Web Title: delhi university to teach facebook post writing lessons
Next Stories
1 अनुवादाचे नवे पान..
2 काम्यू आणि मुराकामी
3 मराठी ढोलताशे आणि अभिजातता
Just Now!
X