01 April 2020

News Flash

हे आपणही करू शकतो..

पुस्तकांची संख्या व त्यांचा दर्जा यांचे परस्पर गुणोत्तर तर अगदीच जेमतेम.

पुस्तक छपाईच्या एकंदर चिरेबंदी रचनेतून जाणे हे तसे अवघड आणि खर्चाचेही.

किरण नगरकर हे मराठीतील आणि इंग्रजीतील श्रेष्ठ लेखक. पुरस्कार ही क्षमतेची पोहोचपावती असते का, अशी शंका यावी अशी सध्याची आजूबाजूची परिस्थिती. मात्र, नगरकर यांना मिळालेले पुरस्कार ही नि:संशय त्यांच्यातील मोठय़ा लेखकाला, त्यांच्या क्षमतेला मिळालेली पोहोचपावती. असे हे नगरकर कधी दे मार मुलाखती देत सुटत नाहीत. सभा-समारंभांत फुकाचे मिरवत नाहीत. इतरांच्या पुस्तकांसाठी प्रस्तावना वा ब्लर्ब लिहीत सुटत नाहीत. मात्र, ते जेव्हा आणि जे काही बोलतात ते महत्त्वाचे असते. आणि मुख्य म्हणजे ते गुळगुळीत नसते, तर थेट असते. खरे तर त्यांची एकूण वागणूक आणि बोलणेही रूढ मराठी वाचनसंस्कृतीला न पेलवणारी अशीच.

नगरकरांनी मध्यंतरी एका प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली. त्या मुलाखतीतील एक प्रश्न हा राजकीय नेत्यांकडून मिथककथांच्या केल्या जाणाऱ्या गैरवापराबाबतचा होता. त्यावर उत्तर देताना नगरकर यांनी राजकारण्यांना थेट भाषेत फटकारलेच. त्या फटकारण्याच्या जोडीचे नगरकर यांचे एक वाक्य मनाशी खूणगाठ बांधावी असे : ‘या सगळ्या भोवतालात या नकोशा गोष्टींविरोधात मी ओरडत राहणारच. भले त्याचा काही उपयोग नसेल, तरीही. आणि मी त्याव्यतिरिक्त करू तरी काय शकतो?’

किरण नगरकर हे जे बोलले तो धागा पकडून दुसऱ्या विषयाकडे येऊ  या.

हा विषय आहे लिट्ल मॅगझिन्सचा..  अनियतकालिकांचा. खरे तर ज्याविषयी आपल्याला बोलायचे आहे त्याला अनियतकालिके म्हणावे का, ही शंका आहे. कारण कितीही नाही म्हटले तरी अनियतकालिकांना काही प्रमाणात ठाशीव रूप असतेच. त्या रूपाची चौकट अगदी घट्ट नसली आणि त्यात प्रयोगांना मुबलक वाव असला, तरीही हे ठाशीव रूप जाणवत राहतेच काही प्रमाणात. शिवाय ही अनियतकालिके रीतसर छापली जातात, त्याचे (प्रामाणिकपणे भरणारे व न भरणारेही) वर्गणीदार असतात, ती वितरीत केली जातात, वगैरे..

आपण ज्याविषयी बोलतोय ती ओळखली जातात ‘मॅगझिन’ या नावाने नव्हे, तर ‘झिन’ या नावाने. त्यांचे स्वरूप एकदम मुक्त.. स्वतंत्र. कुठलेही बंधन नाही त्यास. ना विषयांचे, ना मांडणीचे, ना छपाईचे. कारण ही ‘झिन’ स्वखुशीच्या, स्वविचारांच्या मांडणीची. ज्याला ज्या विषयावर वाटेल ते त्याने त्याला हवे तसे लिहावे. त्याला हवी तशी मांडणी करावी. आणि त्याची छपाईखान्यात छपाई करण्याऐवजी झेरॉक्स वा सायक्लोस्टाईल प्रती काढाव्यात आणि वाटाव्यात आपल्याला हव्या त्या लोकांना. फायदा मिळवणे हा त्यांचा हेतूच नाही. आपल्याला हवे ते लिहिणे.. कथा, कविता, वैचारिक असे काहीही. आपल्याला हवी ती चित्रे काढणे, आणि आपल्या विचारांचे, भावनांचे मुक्त प्रकटीकरण करणे, हा त्याचा मूळ हेतू. म्हणजे हा हेतू साध्य करण्याच्या आड कुणाचाही दबाव नाही. ना वाचकांचा, ना कुठल्या दबावगटांचा, ना आर्थिक व्यवहारांचा.

नगरकर यांच्या अनुषंगाने झिनचा हा मुद्दा येथे आत्ता मांडण्याचे प्रयोजन म्हणजे मुंबईतील कुलाबा येथील चॅटर्जी अ‍ॅण्ड लाल कलादालनात भरलेले अशा झिनचे प्रदर्शन व छोटेखानी संमेलन.

या झिन चळवळीची सुरुवात पाश्चात्त्यांकडे झाली असली तरी त्याबाबत मिळणाऱ्या तपशिलात एकवाक्यता दिसत नाही. अर्थात तपशिलात नसलेली एकवाक्यता हा मुद्दा तितकासा महत्त्वाचा नाही आणि त्यामुळे त्यावर डोकेफोड करीत बसावे याचीही काही आवश्यकता नाही. त्यातली एक गोष्ट मात्र आपल्यासाठी काहीशी तिरकस गमतीची. या झिनची एक आवृत्ती पाचशे ते हजारभर प्रतींची असते म्हणे. आणि ती संपतेही लगोलग. आपल्याकडे मराठी पुस्तकाची तेवढय़ाच प्रतींची आवृत्ती संपायला वर्षे जावी लागतात. ज्या नगरकर यांच्याविषयी आपण बोलत आहोत, त्यांच्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या कादंबरीच्या हजार- दीड हजार प्रती संपण्यासाठी २७ वर्षे जावी लागली. आणि त्यातील बहुतांश प्रती नगरकर यांनीच विकत घेतल्या अशी अफवा पसरवली गेली, असे खुद्द नगरकरच सांगतात! तर ते असो. तसे बघायला गेले तर आपल्या मराठीसाठी ही संकल्पना काहीतरी नवी व अद्भुत आहे असे मुळीच नाही. कारण सत्तरीच्या दशकात नियत/अनितकालिकांची चळवळ जोमात असताना अशा प्रकारचे प्रयोग आपल्याकडे झाले होतेच. कविता, लघुकथा यांच्या सायक्लोस्टाईल प्रती आपापल्या परिचितांमध्ये वितरीत करण्याची प्रथा त्यावेळी होतीच. पुस्तक छपाईच्या एकंदर चिरेबंदी रचनेतून जाणे हे तसे अवघड आणि खर्चाचेही. ते परवडणे अशक्य. कारण हौसेला मोल पडतेच. त्यापेक्षा हा सायक्लोस्टाईल मार्ग सोपा होता.

तर त्या प्रयोगांची आठवण किरण नगरकर यांच्या मुलाखतीमधील विचारांच्या जोडीने येथे काढण्याचे कारण जरा वेगळे आहे. या दोन गोष्टींत एक आंतरिक सूत्र आहे, ते बघायला हवे.

नगरकर यांनी त्यांच्या मुलाखतीत मुद्दा उपस्थित केला आहे तो लेखकाने- खरे तर कुणीही- बोलण्याचा, व्यक्त होण्याचा. हे व्यक्त होणे कशाच्या तरी विरोधात असेल.. म्हणजेच कशाच्या तरी बाजूचे असेल. नगरकर म्हणतात की, भोवतालच्या नकोशा गोष्टींविरोधात मी ओरडत राहणारच. कारण त्याशिवाय मी काहीही करू शकत नाही..

नगरकरांकडे निदान छापील पुस्तकाचे माध्यम आहे. मुलाखतींचे माध्यम आहे. त्यातून ते त्यांना हवे ते जगाला सांगू शकतात. आपल्याकडे- म्हणजे ज्यांना व्यक्त होण्याची इच्छा आहे, मनातले काही सांगण्याची इच्छा आहे अशा सर्वसामान्य वाचकांकडे- ही माध्यमे नाहीत. फेसबुक, ब्लॉग अशी माध्यमे आहेत सगळ्यांच्याच हाती. या माध्यमांची ताकद मोठी असली तरी त्यांच्या म्हणून काही अंगभूत मर्यादा त्या माध्यमांना आहेतच. अशावेळी या झिनचा पर्याय उत्तमच आहे.

खरे सांगायचे तर हल्ली स्वखुशीने.. म्हणजे स्वत:च्या खुशीसाठी आणि हौसेसाठी.. स्वखर्चाने पुस्तके काढण्याची रीत जोरात आहे. मराठीत प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची बेफाम संख्या पाहिली तर ही गोष्ट लक्षात येते. पण ही पुस्तके रीतसर ‘पुस्तके’ या गटातली. त्यात ‘प्रयोग’ अगदीच दुर्मीळ दिसतात. ही पुस्तके प्राधान्याने कविता, आत्मपर लेखन अशी. पुस्तकांची संख्या व त्यांचा दर्जा यांचे परस्पर गुणोत्तर तर अगदीच जेमतेम.

झिनबाबत तसे अपेक्षित नाही. मुळात येथे अपेक्षित आहेत ते ‘प्रयोग’! प्रयोग.. विषयांबाबत, लिखाणाच्या शैलीबाबत, मांडणीबाबत. अगदी तुम्हीही तुम्हाला हव्या त्या विषयावर चार-पाच-आठ-दहा-वीस-तीस ओळी.. जेवढे वाटते तेवढे लिहायचे. त्याची भाषा तुम्हाला हवी ती, हवी तशी निवडायची. त्याची मांडणी तुम्हाला हवी तशी करायची. हवी तशी चित्रे काढायची, वा काढून घ्यायची. या पुस्तकांच्या झेरॉक्स वा सायक्लोस्टाईल प्रती काढणे हे अगदीच सोपे काम. आणि खूपच कमी खर्चातले. या छोटेखानी पुस्तिकांचे म्हणा वा त्यास अन्य काही नाव द्या.. त्यांचे वितरणही सोपे. आणि त्यापुढील गरज त्यावर चर्चेची, समीक्षेची. तर आपापल्या वर्तुळात असतातच अशी मंडळी, की ज्यांना अशा गोष्टींत गती असते, रुची असते. तर अशा मंडळींचे वर्तुळ मग वाढत, विस्तारत जाऊ  शकते, अधिकाधिक समृद्ध होऊ  शकते.

आता नगरकर जे म्हणाले त्याला पुन्हा स्पर्श करू. ‘भोवतालच्या नकोशा गोष्टींविरोधात ओरडत राहणारच मी.. कारण मी तेवढेच करू शकतो.’ तर, त्यानुसार आपल्यालाही या झिनच्या माध्यमातून तसे करता येईलच. आणि झिनची सक्तीही नाही- की कशाच्या तरी विरोधात ओरडायलाच हवे. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही लिहा.. म्हणा.. सांगा.. मग ते हव्याशा गोष्टींबाबतचेही असेल.

यातून व्यक्त होणे हे तर होईलच; शिवाय वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठीही किंचितसा हातभार लागू शकेल, कदाचित. एकदम आकाशात झेपबिप राहू दे; जमिनीवरच राहून अडखळती का होईना, पण पावले तर टाकता येतील.

हे सारे तुलनेने खूपच सोपे आहे.. साधे आहे आणि म्हणूनच कुणासाठीही शक्य आहे.. अगदी आपल्यालाही!

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2017 1:41 am

Web Title: kiran nagarkar thought on conservation of marathi reading culture
Next Stories
1 लिहावे (फेसबुकवरीही) नेटके..
2 अनुवादाचे नवे पान..
3 काम्यू आणि मुराकामी
Just Now!
X