विकार आणि वासना जन्मजात आहेत. जन्म सरेल पण त्या ओसरणार नाहीत. पण मुळात या विकार-वासनांचेही काही महत्त्व आहे, काही हेतू आहे. श्रीमहाराजांनी तेही दाखवलं आहे. श्रीमहाराजांची कीर्ती दरवळू लागली होती. गोंदवल्यात लोकांची ये-जाही वाढली होती. अनेक कुटुंबे, अनेक साधक महाराजांच्याच आश्रयाला राहात होते आणि रोजच्या पंक्तीला किती माणसं असतील, याचा काही नेम नसे. येणाऱ्याला पोटभर खाऊ घालावं आणि रामाचं नाम त्याच्यात रुजवावं, हा श्रीमहाराजांचा एकमेव उद्योग. त्यामुळे भौतिक शेतीचा आधारही आवश्यक होताच.  श्रीमहाराजांची वडिलोपार्जित शेती तर होतीच. तिच्यावरच त्यांच्या भाऊबंदांचा डोळा होता. त्यांना वाटे महाराजांमागे इतका समाज आहे, त्यांना कसली ददात आहे? त्यांना इतक्या शेतीची काय गरज? त्यांच्या भोळेपणाचा फायदा उठवून जमिनी आपल्या ताब्यात आणाव्यात. मग ते भाऊबंद गोंदवल्यात येत आणि जमिनीसाठी वाद घालत. ते म्हणत, ‘‘तुम्ही आता साधू झालात. तुम्हाला जमिनीची उपाधी हवी कशाला?’’ भारतात अध्यात्माचा दुष्काळ पडायचा नाही, असं महाराज म्हणतात ना? तेव्हा आपल्या स्वार्थापुरता अध्यात्माचा आधार घ्यायला इथे कुणाला शिकवावं लागत नाही. स्वत: जे अनंत उपाधींमध्ये अडकून होते ते उपाधीच्या युक्तिवादात जमीन बळकावू पाहात होते! तर महाराज म्हणाले, ‘‘अरे वा रे वा! साधू झालो म्हणून काय झालं मला प्रपंच आहे. मी माझी जमीन का सोडू?’’ मग हा वाद-प्रतिवाद वाढत जाई. भाऊबंद तावातावानं बोलत, शिव्याही घालत आणि महाराजही त्या सव्याज परत करीत. पाहणाऱ्याला वाटे की आता मारामारीवर जाते काय. पण अचानक भांडण थांबे आणि महाराजांसोबत ते भाऊबंद जेवायला बसत. जाताना त्यांना ‘पुन्हा या’, असा आग्रह करून महाराज त्यांची पाठवणी करीत. विचार करा हो जिथे खरा द्वेष आणि खरा वाद आहे तिथे असं चित्र कधीतरी दिसेल का? पण महाराज रागाचा अवतार धारण करत तेव्हा तयारीच्या शिष्यांच्याही मनात विकल्प येई. एकदा असेच भाऊबंदांशी भांडण जुंपले असताना वामनराव ज्ञानेश्वरींचे मन उद्विग्न झाले. हे वारकरी होते आणि महाराजांच्या आश्रयाला राहात होते. त्यांना ज्ञानेश्वरीचं वेड होतं म्हणून त्यांचं नामकरण असं झालं होतं. तर त्यांच्या मनात आलं, ‘‘विकार ताब्यात ठेवायला महाराज नेहमी सांगतात. मग हे काय आहे?’’ महाराजांची परीक्षा घ्यावी या हेतूनं वामनराव ज्ञानेश्वरीची पोथी घेऊन पुढे झाले आणि म्हणाले, ‘‘महाराज या ओवीचा अर्थ जरा समजावून सांगा हो..’’ ओवी होती : जेथें काम उपजला। तेथ क्रोध आधींचि आला। क्रोधी असे ठेविला। संमोहु जाणे।। श्रीमहाराज पटकन वळले आणि योग्यासारख्या शांत चित्तानं म्हणाले, ‘‘वामनराव हे सोंग आटोपून येतोच मी!’’ रागानं इतका बेफाम असलेला माणूस क्षणार्धात इतका शांत होतो ही अशक्य गोष्ट आहे, हे जाणून वामनराव थक्कच झाले. दहा मिनिटांत भांडण आटोपून महाराज आले तेव्हा वामनराव म्हणाले, ‘‘माझा संशय फिटला!’’