‘‘ज्या गोष्टीची आस लागते तिचा ध्यास लागतो. जसा आळीला भुंग्याचा ध्यास लागतो. ध्यास म्हणजे स्वतचा विसर. तो भगवंताच्या स्मरणातच झाला पाहिजे’’, या बोधवचनाद्वारे श्रीगोंदवलेकर महाराज जणू सांगतात की, माणसाला प्रपंचाची आस आहे, प्रपंचाचाच ध्यास आहे आणि म्हणून प्रपंचात माणूस स्वतला विसरून जगू लागतो. आता स्वतला विसरणं चांगलंच आहे, पण तो विसर भगवंताच्या स्मरणात झाला पाहिजे. याचा अर्थ काय असावा? प्रपंचात आपण स्वतला विसरतो म्हणजे काय? आपण याचा अतिशय बारकाईने विचार करू. प्रपंचाचे दोन अर्थ आहेत, हे आपण पाहिलं. स्थूल अर्थानं प्रपंच म्हणजे घरदार, नातीगोती, बायकामुलं, लग्नसंसार वगैरे. सूक्ष्म अर्थानं विचार केला तर प्रपंच म्हणजे पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं यांद्वारे जगाकडे असलेली माझी ओढ म्हणजे प्रपंच. आता सूक्ष्म आणि स्थूल हे दोन्ही प्रपंच प्रत्येकालाच आहेत. श्रीमहाराजांचंच एक फार मार्मिक वाक्य आहे की, ‘‘राजा व रंक छायेशिवाय असत नाहीत. छायेला तितकं महत्त्व नाही पण ती आहे. तशी साकारांत भगवंताची माया असते.’’ (बोधवचने, क्र. २३३) म्हणजे गरीब असो की श्रीमंत असो, दोघांची सावली पडतेच. दोघांना सावली असतेच. अगदी त्याचप्रमाणे गरीब असो की श्रीमंत दोघांना प्रपंच सुटलेला नाही! बाहेरून दिसायला दोघांच्या प्रपंचात फरक असेल. एखाद्याचा प्रपंच भपकेबाज असेल आणि दुसऱ्याचा खडतर असेल. पण त्या प्रपंचाच्या मुळाशी दोघांना असलेली काळजी, अस्वस्थता, अनिश्चितता, ओढ अगदी एकसारखीच असते. गरीबाला शंभर रुपयांची काळजी असेल तर श्रीमंताला लाखभर रुपयांची काळजी असेल. त्या काळजीत फरक नाही. त्यापायी मनाच्या होणाऱ्या तगमगीत फरक नाही. खरंतर दोघांचाही प्रपंच नश्वरच आहे. एखाद्यानं हवेली बांधली तरी ती कालौघात नष्टच होणार आहे आणि एखाद्यानं झोपडं बांधलं तरी कालौघात नष्टच होणार आहे. गरीब काय नि श्रीमंत काय, दोघांनाही माहीत आहे की प्रपंच नश्वर आहे तरी त्यातली आस आणि ओढ किंचितही कमी होत नाही. (छायेला तितके महत्त्व नाही पण ती आहे). अगदी त्याचप्रमाणे साकारात म्हणजेच दुनियेत भगवंताची माया आहे. म्हणजेच आंतरिक सूक्ष्म अशा प्रापंचिक ओढीला स्थूल दुनियेतील स्थूल प्रपंचाची जोड आहे. हे जग भगवंतानंच निर्माण केलं आहे, त्याच्याच सत्तेवर ते टिकून आहे, पण त्याचा विसर पडून त्या जगाचाच, या दृश्य मायेचाच अमीट असा प्रभाव आपल्यावर पडतो आहे. त्यामुळे ही दुनिया ज्याची आहे त्या भगवंताचं विस्मरण होऊन या दुनियेचंच अहोरात्र स्मरण होत आहे. भगवंतापेक्षा दुनियेचाच आधार मोठा वाटत आहे. दुनियेतच सुख मिळेल, ही आशा आहे. त्यामुळे दुनियेतच सुखाचा शोध सुरू आहे. जे मिळेल ते टिकविण्याची धडपड सुरू आहे. ते अखंड टिकून राहावं यासाठी चोवीस तास खर्चूनही प्रपंच बाकीच राहतो. या प्रपंचाच्या प्रवाहात आपण इतके वाहवत गेलो आहोत की स्वतचंही विस्मरण आपल्याला झालं आहे. स्वतचं विस्मरण म्हणजे काय?
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2013 रोजी प्रकाशित
४९. सावली
‘‘ज्या गोष्टीची आस लागते तिचा ध्यास लागतो. जसा आळीला भुंग्याचा ध्यास लागतो. ध्यास म्हणजे स्वतचा विसर. तो भगवंताच्या स्मरणातच झाला पाहिजे’’, या बोधवचनाद्वारे श्रीगोंदवलेकर महाराज जणू सांगतात की, माणसाला प्रपंचाची आस आहे.
First published on: 11-03-2013 at 12:47 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 49 shadow