04 August 2020

News Flash

५३. सीमारेषा

व्यवहारात व्यसन म्हणून काही करू नये! अर्थात प्रपंचाच्या व्यवहारात अहोरात्र प्रपंचासक्त राहण्याचं व्यसन जडू देऊ नका. जितकं कर्तव्य आहे तितकं पार पाडा. यालाच श्रीमहाराज म्हणतात,

| March 15, 2013 05:02 am

व्यवहारात व्यसन म्हणून काही करू नये! अर्थात प्रपंचाच्या व्यवहारात अहोरात्र प्रपंचासक्त राहण्याचं व्यसन जडू देऊ नका. जितकं कर्तव्य आहे तितकं पार पाडा. यालाच श्रीमहाराज म्हणतात, ‘जेथे ज्याची जितकी जरूर तितकेच केले पाहिजे’. इथे हा जो ‘तितकेच’ शब्द आहे तो कर्तव्याची लक्ष्मणरेषा पाळायला सांगतो. प्रत्यक्षात कर्तव्याची सीमारेषा कुठे संपते आणि मोहाच्या प्रांतात आपण कधी भरकटू लागतो, हेच आपल्याला उमगत नाही. कर्तव्यकर्म कोणतं आणि मोहग्रस्त कर्म कुठलं, हे उमगत नाही. मुलाचा योग्य सांभाळ करावा, हे कर्तव्य झालं, पण त्याचं हित-अहित लक्षात न घेता त्याचा प्रत्येक हट्ट पुरवीत राहणं आणि बिनगरजेच्या महागडय़ा वस्तूंची त्यालादेखील सवय जडवणं, हे कर्तव्य नाही! अशा अनेक गोष्टी आपल्याकडून होत राहतात ज्या कर्तव्याची लक्ष्मणरेषा ओलांडतात आणि मोहजन्य असतात. मग कर्तव्य नेमकं काय, हे ओळखावं कसं? श्रीमहाराजांचं तिसरं बोधवचन आहे- ‘‘कर्तव्यात राहणे साधण्याकरता भगवंताचे स्मरण हवे व त्याकरता नाम हवे. मग प्रपंच व परमार्थ एकच होईल’’ (बोधवचने, क्र. ७९). माझ्या वाटय़ाचं नेमकं कर्तव्यकर्म कोणतं, हे मला ओळखायचं असेल आणि त्यानुरूप कर्म अचूक पार पाडायचं असेल तर त्यासाठी भगवंताचं स्मरण, त्याचं नाम यांचाच आधार आहे. तो घेतला तर माझी सर्व प्रापंचिक कर्तव्यं अचूकपणे पार पडतीलही आणि ती सर्वच र्कम भगवंताच्या इच्छेशी सुसंगत असल्यामुळे माझा प्रपंच आणि परमार्थ यांच्यातही भेद उरणार नाही, अंतराय उरणार नाही. ते दोन्ही एकरूपच होतील, एकच होतील! तर श्रीमहाराजांची ती तीन बोधवचने पुन्हा एकवार वाचू. श्रीमहाराज सांगतात : ज्या गोष्टीची आस लागते तिचा ध्यास लागतो. जसा अळीला भुंग्याचा ध्यास लागतो. ध्यास म्हणजे स्वतचा विसर. तो भगवंताच्या स्मरणातच झाला पाहिजे (बोधवचने, क्र. २२३). व्यवहारात व्यसन म्हणून काही करू नये. जेथे ज्याची जितकी जरूर तितकेच केले पाहिजे. भगवंताचे व्यसन बिघडवीत नाही. बाकी कोणतेही व्यसन घात करते. व्यसन नेहमी वाढत्या प्रमाणावर असते. आजच्यापेक्षा उद्याचे प्रमाण अधिक हवेसे असते. ते घात करते (बोधवचने, क्र. १२४). कर्तव्यात राहणे साधण्याकरता भगवंताचे स्मरण हवे व त्याकरता नाम हवे. मग प्रपंच व परमार्थ एकच होईल (बोधवचने, क्र. ७९). या बोधवचनांचा खरा रोख आणि खरा अर्थ काय, हे आपण आठवडाभर पाहिलं. प्रपंच हा व्यवहारमात्र आहे. त्यातील कर्तव्यं पार पाडली की प्रपंच पूर्ण होतो. पण ती कर्तव्यं नेमकी कोणती हे लक्षात न घेता आपण मोह आणि भ्रमाने प्रपंचाच्या व्यसनातच अडकतो. प्रपंचाचं हे व्यसन आपला घात करतं. ते व्यसन न लागता प्रपंच नेटकेपणाने पार पडावा यासाठी कर्तव्यात कुचराई करून चालत नाही. मात्र कर्तव्यं नेमकी कोणती, हे उमगण्याकरिता भगवंताचंच स्मरण हवं, हा या बोधवचनांचा रोख आहे. याच बोधवचनांच्या आधारे आपण प्रपंच आणि परमार्थ यांच्यात ऐक्य कसं साधायचं, याचा शोध घेणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2013 5:02 am

Web Title: 53 border
Next Stories
1 ५२. व्यसन घात
2 ५१. पत्त्यांचं व्यसन!
3 ५०. अदृश्य चौकट
Just Now!
X