26 February 2021

News Flash

८३. अग्रक्रम

श्रीसद्गुरू ज्याला आपलं मानतात त्याचं शुद्ध आत्मकल्याण व्हावं, हाच त्यांचा एकमात्र हेतू असतो. बाकी सगळ्याच बाबतीत ते उदासीनच असतात. बरेचदा काय होतं, शब्द वापरून वापरून

| April 29, 2013 12:35 pm

श्रीसद्गुरू ज्याला आपलं मानतात त्याचं शुद्ध आत्मकल्याण व्हावं, हाच त्यांचा एकमात्र हेतू असतो. बाकी सगळ्याच बाबतीत ते उदासीनच असतात. बरेचदा काय होतं, शब्द वापरून वापरून इतके गुळगुळीत झाले असतात की त्यांचा जो खरा अर्थ आहे तो त्यातून प्रकाशित होत नाही. उदास म्हणजे उद्+आस. उद् म्हणजे वर असणे. उदास म्हणजे आस, ओढीपेक्षा वर असणे. ‘आसीन’ म्हणजे एखाद्या गोष्टीत लिप्त असणे. ‘उद्’ म्हणजे वर. श्रीसद्गुरू प्रत्येक गोष्टीबाबत उदासीन असतात याचा अर्थ असा की धारणेच्या दृष्टीने ते इतक्या उच्च स्थानी असतात की कोणतीच गोष्ट त्यांना अडकवू शकत नाही, लिप्त करू शकत नाही. एकदा एका साधकानं श्रीनिसर्गदत्त महाराजांना विचारलं की, सगळेच सत्पुरुष इतके उदासीन असतात. तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा आनंद कधी होत नाही का? श्रीनिसर्गदत्त महाराज उत्तरले, कुणी सर्वोच्च आध्यात्मिक ध्येय साध्य केलं तरच सत्पुरुषाला खरा आनंद होतो! तेव्हा आपल्या माणसानं आध्यात्मिक ध्येय साध्य केलं तरच श्रीमहाराजांना खरा आनंद होतो. ते ध्येय त्यानं साध्य करावं यासाठीच तर ते अहोरात्र कार्यरत असतात. जो एक पाऊल टाकेल त्याच्यासाठी दहा पावलं ते टाकत असतात. लहान मूल कसंबसं उठून धडपडत पहिलं पाऊल टाकतं तेव्हा आईला किती आनंद होतो! मुलानं एक पाऊल टाकलं तर मीसुद्धा एक पाऊलच त्याच्याकडे जाईन, असा हिशेब ती करीत नाही. ती धावत त्याच्याकडे जाते आणि त्याचे दोन्ही हात हातात घेऊन त्याला चालायला शिकवू लागते. आपण एकही पाऊल न टाकता आध्यात्मिक शिखर गाठायची स्वप्नं रंगवतो! तर हे पहिलं पाऊल टाकण्याच्या आड जे काही येतं त्यापासून श्रीमहाराज मला सावध करताना सांगतात की, पैशासाठी उभं राहू नका, पैशासाठी पावलं टाकू नका, भगवंतासाठी उभं राहा. भगवंतासाठी पावलं टाका. पैसा मिळविणे नव्हे भगवंत मिळविणे, आपले खरे काम आहे, असं श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात तेव्हा त्यांना खरे तर माझ्या माणसानं पैसा नव्हे तर भगवंत हेच जीवनाचं ध्येय मानलं पाहिजे, हेच ठसवायचे आहे. जगण्याचा मुख्य हेतू भगवंत असला पाहिजे, हे त्यांना सांगायचे आहे. पुरुषार्थ साधताना अग्रक्रम कशाला द्या, हे ते यातून सांगत आहेत. श्रीतुकाराम महाराज यांचाही एक अभंग आहे:
एक मन तुझ्या अवघ्या भांडवला। वांटितां तें तुला येईल कैसें।। १।।
म्हणउनि दृढ धरीं पांडुरंग। देहा लावीं संग प्रारब्धाचा।। २।।
देह आणि मन यांनी मिळून माणूस बनला आहे. त्यातही स्थूल देहाला मर्यादा आहेत पण सूक्ष्म मन अमर्याद आहे. हे मन हेच खरं भांडवल आहे. भांडवल कशासाठी लागतं? उद्योगासाठी लागतं. माणसाला जन्माला येऊन कोणता उद्योग करायचा आहे? परमात्मप्राप्ती हा तो उद्योग आहे. जन्माला आल्यावर मायेच्या प्रभावाने माणसाला भौतिकातील प्रगतीचा उद्योगही मोहवू लागतो. मग त्याला वाटतं, भौतिकही साधून घेईन आणि भगवंताची प्राप्तीही करून घेईन. तुकाराम महाराज त्याला म्हणतात, बाबारे, भांडवल एकच आहे ते तुला वाटता कसं येईल?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2013 12:35 pm

Web Title: 83 priority
Next Stories
1 ८२. रोख
2 ८१. पैका
3 ८०. आंतरविरोध
Just Now!
X