तुका म्हणे एकें कळतें दुसरें। बरियानें बरें आहाचें आहाच। म्हणजे ‘बऱ्याने बरे व खोटय़ाने खोटे समजते,’ हा या चरणाचा प्रचलित अर्थ ज्ञानेंद्रनं पुन्हा वाचला.
हृदयेंद्र – हा अर्थ आधीच्या चरणाशी पूर्ण सुसंगत वाटत नाही.. आधीचा चरण आई आणि मुलाचा आहे. त्या आधारावरच ‘एकें कळतें दुसरें’ पहायला हवं.. आता असं पहा, ‘आई’ या शब्दातच ‘मूल’ही अध्याहृतच नाही का? ‘आई’ आहे तिथे ‘मूल’ असलंच पाहिजे आणि ‘मूल’ आहे तिथे ‘आई’ही ओघानंच आली..
कर्मेद्र – फार छान! एका वाहतूक चौकात आई-मुलाचं शिल्प आहे. त्याखाली लिहिलं आहे: ‘मुला’च्या जन्माबरोबरच एका ‘आई’चाही जन्म होतो!
योगेंद्र – ग्रेट! एकें कळतें दुसरें!!
ज्ञानेंद्र – एका अभंगात तर तुकाराम महाराज म्हणतात, ‘आमुचिया भावे तुज देवपण!’ भक्तामुळेच तर देवाला देवपण आहे!
हृदयेंद्र – जिथे भक्त आहे तिथे देव असलाच पाहिजे.
योगेंद्र – आता ‘बरियानें बरें आहाचे आहाच’ या चरणाचा अर्थ काय असावा?
हृदयेंद्र – आपण ‘तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा।।’ पाहिलं ना? ‘बरवा’ म्हणजे सहज सोपा, ‘बरवा’ म्हणजे सहजप्राप्य. सद्गुरू माझ्या जीवनात सहजतेनं आले म्हणून भक्तीही सहज शक्य झाली! बरियाने बरे’.. ते आहेत म्हणून तुम्हीही आहात.. आहाचे आहाच! ‘आई’ आहे म्हणून मुलाला ‘मूल’पण आहे. सद्गुरू आहेत म्हणून शिष्याला शिष्यपण आहे. देव आहे म्हणून भक्ताला भक्तपण आहे! (हे बोलत असतानाच तुकोबांची गाथा उलगडून एक अभंग काढतो) आता हा सत्त्याहत्तरावा अभंगच पहा ना, यातून ही बाब स्पष्ट होईल. हा अभंग असा आहे : भक्ताविण देवा। कैचें रुप घडे सेवा।। शोभविलें येर येरां। सोनें एके ठायीं हिरा।। देवाविण भक्तां। कोण देता निष्कामता।। तुका म्हणे बाळ। माता जैसें स्नेहजाळ।। भक्ताशिवाय देवाचं रूप तरी उकलणार आहे का? तो देव रुपात प्रकटल्याशिवाय भक्ताला तरी सेवा साधणार आहे का? ‘शोभविले येर येरां’ पहा हं! इथे आता त्या ‘बरियानें बरें’ची जोडणी ‘शोभविले येर येरा’शी आहे. एकामुळे दुसऱ्याची आणि दुसऱ्यामुळे या एकाची शोभा आहे. जसं सोन्याच्या अंगठीत हिऱ्याचं कोंदण! दोघं परस्परपूरक.. परस्परसौंदर्यवर्धक!! हा देव नसेल तर भक्ताला निष्कामता कधी तरी साधेल का हो? लहान मूल म्हणजे जसं मातेच्या स्नेहतंतूचा आधार असतं तसा भक्त हा देवाच्या दया-करुणाभावाचा आधार आहे!
योगेंद्र – आता इथे ‘निष्कामता’ही म्हटलंय आणि ‘स्नेहजाळ’ही म्हटलंय.. स्नेहाचं जाळं आहे तिथं निष्कामता कुठली?
हृदयेंद्र – मुलाला आईशिवाय दुसरं काही हवं असतं का?
योगेंद्र – नाही.. ती गोष्ट आठवली.. एका गरीब बाईबरोबर तिचं मूल जत्रेत फिरत असतं. फुगेवाला दिसताच फुगा हवा म्हणून ते रडू लागतं.. खेळणीवाला दिसताच खेळण्यांसाठी रडू लागतं.. आइस्क्रीमवाला दिसताच आइस्क्रीमसाठी रडू लागतं.. थोडय़ा वेळात आईपासून त्याची ताटातूट होते.. मग त्याचं रडं थांबावं म्हणून लोक त्याला फुगे देतात, खेळणी देतात, आइस्क्रीम देतात.. पण त्याला आईच हवी असते!
हृदयेंद्र – किती सुरेख! म्हणजे एका आईशिवाय अन्य कोणतीच कामना मुलाच्या मनात नसते, तसं देवाचं प्रेम लागलं की त्या देवाशिवाय अन्य कोणतीच कामना मनात उरत नाही, हीच निष्कामता नाही का? भक्तासाठी प्रेमाचा एकमेव परिपूर्ण आधार भगवंत हाच असतो, जसं मुलासाठी वात्सल्य, प्रेम यांचा एकमेव आधार केवळ आईच असते! बरोबर ना?
अनाहूतपणे ‘बरोबर ना?’ हा प्रश्न आपण ज्ञानेंद्रकडे बघून विचारला आणि त्यावर ज्ञानेंद्रनं तुटकपणे ‘असेलही’ हे उत्तर दिलं तेव्हा आपल्या प्रश्नाचा रोख आणि तो विचारतानाचं आपलं ज्ञानेंद्रकडे एकटक पाहणं हे दोन्ही चुकीचं होतं, याची जाणीव हृदयेंद्रला झाली. ज्ञानेंद्रच्या उत्तरातला तुटकपणा कर्मेद्रलाही जाणवला. त्याला वाटलं, या चर्चेत प्रज्ञा नाही, हे बरंच झालं. खरंच मूल नसल्याची वेदना आधुनिक युगातही सनातन का असावी? सहज भासणाऱ्या रुपकांतूनही कुणाच्या मनावर उमटणारे ओरखडे जाणवूही का नयेत?
चैतन्य प्रेम