प्रश्न मोठा मार्मिक होता, हृदयाची भावनिकतेशी घातली जाणारी सांगड शरीरशास्त्रदृष्टय़ा सार्थ आहे का? प्रश्न आणि आधीच्या चर्चेचे संदर्भ मनात घोळवत डॉक्टरसाहेब बोलू लागले..
डॉ. नरेंद्र – हे हृदय मुठीच्या आकाराचं आणि छातीच्या पिंजऱ्यात डाव्या बाजूस कललेलं असतं. मी फार तपशीलात सांगत नाही. जवनिका, कर्णिका वगैरे आपण शाळेतही शिकलो आहोतच.. सोप्या शब्दांत सांगायचं तर हृदयाची डावी आणि उजवी बाजू आहे. शरीराच्या विविध भागांतून प्राणवायूविरहित अशुद्ध रक्त हे हृदयाच्या उजव्या भागात येतं. इथून ते शुद्धीकरणासाठी फुप्फुसाकडे जातं. फुप्फुसाकडून शुद्ध झालेलं प्राणवायूयुक्त रक्त हृदयाच्या डाव्या भागात येतं आणि तिथून ते सर्व शरीरभर रक्तवाहिन्यांमार्फत पसरतं. मग सर्व पेशींना अन्न, पाणी आणि प्राणवायूचा पुरवठा करीत पेशीतील उत्सर्जक घेऊन ते पुन्हा हृदयाच्या उजव्या भागात येतं. हे अशुद्ध अर्थात कार्बन डायऑक्साइडयुक्त रक्त फुप्फुसात शुद्धीकरणासाठी पाठवलं जातं.. ही क्रिया अखेरच्या श्वासापर्यंत चालत असते.. थोडक्यात सांगायचं तर हृदय हे शरीरातलं अशुद्ध रक्त गोळा होण्याचं, तिथून ते शुद्धीकरणासाठी फुप्फुसात पाठवलं जाण्याचं आणि मग फुप्फुसातून आलेलं शुद्ध रक्त शरीरभर पोहोचविणारं केंद्र आहे..
कर्मेद्र – म्हणजेच भावनिकतेचा हृदयाशी संबंध नाही..
डॉ. नरेंद्र – तसं नाही म्हणता येणार.. कारण अखेर माणूस हा भावप्रधान प्राणी आहे.. भावना, वासना यांच्या साच्यातूनच माणूस घडतो.. त्या साच्यानुसार तो घडत किंवा बिघडत असतो. या भावना आणि वासनांचं केंद्र मनच असतं आणि मानसिक ताण हे हृदयविकाराचं एक मुख्य कारण आहे! तुम्ही पहा, बेचैनी, अस्वस्थता, सततची चीडचीड, सतत उफाळून येणारा क्रोध यातून उच्चरक्तदाबाचा विकार जडला तर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही बळावतो..
हृदयेंद्र – आणि प्रेमभावनाच प्रधान असेल, जीवनात कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढळत नसेल.. मन शांत आणि प्रसन्न राहात असेल, तर हृदयक्रियाही चांगली राहाते आणि त्यालाच हृदय बलवान असणं, प्रेमानं भरून जाणं म्हणत असावेत..
कर्मेद्र – पण हे जे मनाचा तोल ढळू न देणं आहे नं त्यातही मला धोका वाटतो बरं का! (हृदयेंद्रनं प्रश्नार्थक चेहरा केला, त्याच्याकडे पाहत कर्मेद्र पुढे म्हणाला) बरेचदा काय होतं, माणसं वरकरणी शांत, संयमी वाटतात, पण आतून किती खदखदत असतात, कुढत असतात! त्यापेक्षा काय आहे ते बोलून मोकळं होणं कधीही चांगलं.. एक घाव दोन तुकडे, बास!
ज्ञानेंद्र – बाबा रे जगात असं वागून चालत नाही. रेशमाची दोरीही तुटली तरी जोडता येते, पण मधे गाठ रहातेच..
कर्मेद्र – ज्ञान्या ‘बाबा रे’च्या ऐवजी ‘बाळा रे’ म्हणालास ना, तर हे वाक्य ‘श्यामची आई’तलंच वाटेल.. बाळा संगणकात टाइप करताना काही चुकलं तर डिलीट करता येतं, पण ज्या वाक्यानं दुसऱ्याचं मन दुखावतं ते त्याच्या मनातून नाही बरं डिलीट करता येत..
हृदयेंद्र – (हसत) कर्मू आता वाहावत नको जाऊस..
ज्ञानेंद्र – आणि याच.. याच ‘एक घाव दोन तुकडे’ वृत्तीमुळे पहिला प्रेमभंगही ओढवून घेतलास ना?
अचानक नि:शब्द शांतता. डॉक्टरसाहेब मोबाइलवर काहीतरी धांडोळा घेण्यात दंग आहेत, किंवा तसं भासवत आहेत.. ज्ञानेंद्रचा चेहरा एकदम कावराबावरा झाला. हृदयेंद्र आणि योगेंद्रही गंभीर झाले..
ज्ञानेंद्र – सॉरी कर्मू.. मी असं..
कर्मेद्र – इट्स ओके यार.. पण डॉक्टरसाहेब माझं हृदय एकदम स्ट्राँग आहे.. पुन्हा प्रेमात पडलो, लग्न केलं, तिचंही नाव ख्यातिच ठेवलं.. आणि या तिघांना सहन करून तर ते आणखीनच दणकट झालंय..
हृदयेंद्र – या स्वभावामुळेच तू आम्हाला आवडतोस कर्मू. त्यावेळी मात्र आम्ही तिघे तुझ्या काळजीनं हबकलोच होतो. तू मात्र शांत होतास. नेहमीसारखं वावरत होतास.. पण खरं सांग, तेव्हा तूसुद्धा मनाचा तोल ढळू नये, म्हणून स्वत:शी धडपडत नव्हतास का? वरवर नेहमीसारखं वावरत होतास, पण आतून?
कर्मेद्र – अरे साल्यांनो तुम्ही माझं कौतुक करताय की गॉसिपिंग करताय? (सर्वच हसतात) अरे माझं हृदय दणकट आहे, पण त्या बिचाऱ्या कावळ्याचा जीव फार छोटा आहे रे! त्याच्या सहनशक्तीचा अंत नका पाहू.. ढकला की त्याला वरच्या चक्रात!
-चैतन्य प्रेम