किनाऱ्यावरील वाळूनं घडवलेल्या त्या औट घटकेच्या पसाऱ्याकडे दादासाहेब अंतर्मुख होऊन पाहात होते.. वाऱ्याच्या वेणुनादात हृदयेंद्रचे गंभीर शब्द उमटले..
हृदयेंद्र – काम आणि क्रोध हे अत्यंत सूक्ष्म असतात आणि त्यांना आवर घालण्याचा जो विवेक आहे तोही तर सूक्ष्मच असतो.. सद्सदविवेकबुद्धी म्हणतात ना? म्हणजे सत् काय आणि असत् काय हे जाणणारी बुद्धी तीदेखील सूक्ष्मच तर असते.. ज्ञानेश्वरांनी..
योगेंद्र – (हृदयेंद्रच्या सुरात सूर मिसळत) तिला दिव्याच्या ज्योतीची उपमा दिली आहे! (हृदयेंद्र हसून पाहातो) अरे पाठ झालीय तुझी ती उपमा!!
कुशाभाऊ – पण आम्हाला तर ऐकू दे..
योगेंद्र – माउलींची ओवी आहे..
हृदयेंद्र – जैसी दीपकळिका धाकुटी। परी बहु तेजाते प्रगटी। तैसी सद्बुद्धी हे थेकुटी। म्हणो नये.. म्हणजे दिव्याची ज्योत लहानशी असते..
ज्ञानेंद्र – दीपकळिका.. काय सुरेख शब्द आहे..
हृदयेंद्र – हो ना.. तर ही ज्योत लहानशी असते, पण ती अवघी खोली उजळून टाकते तशी सद्बुद्धी सूक्ष्म असते, पण ती अवघं जीवन उजळवून टाकते..
नाना – वा! (सर्वाचेच चेहरे उजळले आहेत..)
योगेंद्र – आणि जर सद्बुद्धीच्या जागी दुर्बुद्धीच बलिष्ठ असेल तर मग अवघ्या जीवनाची घसरणच सुरू राहाते..
हृदयेंद्र – तेव्हा या विवेक हातवडय़ानं समस्त विकारांवर हळूहळू घाव घालत ते नष्ट केल्याशिवाय जीवनाचा दागिनाही खऱ्या अर्थानं सुबक सुंदर घडणार नाही!
ज्ञानेंद्र – तर अशा रीतीनं आपण अखेर बुद्धीच्या महात्म्यापर्यंत पोहोचलोच! आज जीवनातले, अगदी सार्वजनिक जीवनातलेही बरेचसे प्रश्न माणसाच्या अविवेकातूनच उत्पन्न झाले आहेत, नाही का? हल्ली जो तो स्वयंघोषित विवेकी झाला आहे आणि त्याच्या मते त्याच्या विरुद्ध मताचा प्रत्येकजण अविवेकी आहे! जग अत्याधुनिक बनतंय आणि माणूस अधिकाधिक रानटी! मग अशावेळी विवेकाचे संस्कार समाजावर करणार कोण आणि विवेकाची कास समाज धरणार तरी कसा? हृदू मला क्षमा कर.. पण समाजात हल्ली विवेकाचं नामोनिशाणही नाही, उलट श्रद्धेचंच स्तोम आहे आणि जिथे शुद्ध विवेक असेल तिथे श्रद्धा आणि श्रद्धा असेल तिथे शुद्ध विवेक टिकूच शकत नाही.. मग अभंगापुरते विवेक हातवडय़ाचे गुण गायचे, प्रत्यक्षात श्रद्धेच्या नावावर विवेक दडपून टाकायचा..
हृदयेंद्र – मला वाटतं व्यक्तिगत आणि सामाजिक अशा दोन जगांची तू काहीतरी गफलत करतोयस.. आणि श्रद्धा अविवेकीच असते, अशी तुझीही श्रद्धाच दिसते!
ज्ञानेंद्र – पण व्यक्तिगत आणि सामाजिक अशी दोन जगं असतात का? समाजापासून व्यक्ती आणि व्यक्तीपासून समाज दूर कसा असू शकतो?
हृदयेंद्र – जग एकच आहे, खरंच! पण या जगाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन, या जगाकडून असलेली प्रत्येकाची अपेक्षा, जगाबाबतची प्रत्येकाच्या अंतरंगातली धारणा आणि आसक्ती वेगवेगळी नाही का? आणि जशी माझी आंतरिक धारणा, प्रेरणा, वासना असते त्यानुसार या जगात माझा वावर असतो. मग मी जर संकुचित, विकारशरण, अहंकेंद्रित असेन तर माझा वावर जगाला त्रासदायकच होणार! जो व्यापक, निस्वार्थी आहे त्याचा जगातला वावर किती सकारात्मक असेल! आणि हे जे व्यापक होणं आहे ते ज्या विवेकाशिवाय शक्य नाही त्या विवेकाचं बीज प्रत्येकाच्या आवाक्यात असलंच पाहिजे. जीवन सत्कारणी कसं लावायचं, हे विवेकाशिवाय ठरणारच नाही आणि अशाश्वतातून सुटण्याचा हा विवेक भक्तासाठीही आवश्यक नाही का? ज्ञानाचा वापर संकुचित स्वार्थासाठीच होत असेल तर त्या ज्ञानाची काय किंमत? माउलींची ओवी आठवते.. मोराचां आंगीं असोसें। पिसें आहाति डोळसें। परी एकली दिठी नसे। तैसें तें गा।। मोराच्या पिसाऱ्यावर शेकडो डोळे असतात, पण दृष्टी एकाही डोळ्याला नसते! तसा भौतिक ज्ञानाच्या जोरावर जीवनाचा बहुरंगी पिसारा फुलला आहे, पण खरी जीवनदृष्टी नसेल तर त्या
पिसाऱ्याला काय अर्थ? आणि ही जीवनदृष्टी संतांच्या सहवासातूनच गवसते. मग हा सहवास प्रत्यक्ष असो की त्यांच्या ग्रंथाचा!  त्या सहवासात जो बोध बिंबतो तो बोध हेच विवेकाचं अस्सल बीज आहे. ते रुचलं तर अंत:करणात रुजल्याशिवाय राहणारच नाही!  
 चैतन्य प्रेम