News Flash

५२. व्यसन घात

प्रपंच हा व्यवहारमात्र आहे. जिथे देणं-घेणं पूर्ण होतं तिथे व्यवहार पूर्ण होतो. आपण कुणाचं देणं लागत असू तर ते देणं फेडलं अथवा कुणाकडून आपल्याला येणं

| March 14, 2013 02:20 am

प्रपंच हा व्यवहारमात्र आहे. जिथे देणं-घेणं पूर्ण होतं तिथे व्यवहार पूर्ण होतो. आपण कुणाचं देणं लागत असू तर ते देणं फेडलं अथवा कुणाकडून आपल्याला येणं असेल आणि ते येणं आलं की व्यवहार पूर्ण होतो. प्रपंचातलं हे देणं-घेणं यथायोग्य पार पाडण्यालाच आपण कर्तव्य म्हणतो. वडिलांचं मुलासंबंधात काही कर्तव्य असतं, तसंच मुलाचंही वडिलांसंबंधात काही कर्तव्य असतं. पतीचं पत्नीसंबंधात तसंच पत्नीचंही पतीसंबंधात काही कर्तव्य असतं. भावा-भावांमध्ये, बहिणी-भावामध्ये, बहिणी-बहिणीमध्ये, आई-मुलामध्ये अगदी प्रत्येक नात्यात एकमेकांशी कर्तव्य असतं. जगात ज्यांच्या ज्यांच्याशी आपला संबंध येतो त्यांच्याशीही आपलं काही ना काही कर्तव्य असतं. इथेच खरी अडचण येते. जेवढं कर्तव्य आहे तेवढाच व्यवहार आपण करीत नाही कारण आपण हवे-नकोपणाने प्रपंच करीत असतो. काही गोष्टी आपल्याला हव्याशा वाटतात, काही नकोशा वाटतात. काही नाती हवीशी वाटतात, काही नकोशी वाटतात. आपल्या प्रपंचात आपली आवड-निवड असते. आपल्या आवडीच्या नात्याच्या माणसासाठी आपण कर्तव्याची सीमारेषा ओलांडून मोहाने ग्रासून व्यवहार करीत राहतो. त्याचप्रमाणे आपल्या नावडीच्या नात्याच्या माणसासाठी आपण कर्तव्याइतपतदेखील व्यवहार न करता द्वेषानं ग्रासून वागतो. आपला प्रपंच असा मोह आणि द्वेषानं भारलेला आहे आणि अशाच प्रपंचाचं आपल्याला पक्कं व्यसन जडलं आहे. श्रीगोंदवलेकर महाराज स्पष्ट सांगतात, ‘‘व्यवहारात व्यसन म्हणून काही करू नये. जेथे ज्याची जितकी जरूर तितकेच केले पाहिजे.’’ म्हणजेच प्रपंच हा कर्तव्याला अनुसरूनच करायचा आहे. त्यात आसक्तीनं व्यसनांध बनून वावरू नका. जेवढं कर्तव्य आहे तेवढंचं करणं जरूर आहे. प्रपंचापेक्षा भगवंताचं व्यसन जडलं तरी काही बिघडत नाही. कारण? श्रीमहाराजच सांगतात की, ‘‘भगवंताचे व्यसन बिघडवीत नाही. बाकी कोणतेही व्यसन घात करते. व्यसन नेहमी वाढत्या प्रमाणावर असते. आजच्यापेक्षा उद्याचे प्रमाण अधिक हवेसे असते. ते घात करते.’’ म्हणजे प्रपंचाचं व्यसन जडलं की प्रपंच कधीच पुरा झाल्यासारखं वाटत नाही. आवडत्या माणसांसाठी मोहानं वाहवत जाऊन सतत काही तरी करीत राहायची सवय जडते. कितीही केलं तरी ते अपुरंच वाटतं. हे व्यसन घात करतं. याचं कारण असं की, जो भाव आपल्या बाजूनं असतो तोच दुसऱ्या बाजूनं असेलच असं नाही. बऱ्याचदा तो नसतोच. स्वार्थ जोवर साधला जात असतो तोवर नातं टिकवायचं हा माणसाचा स्वभावच आहे. त्यात आपणही आलोच. आपल्या स्वार्थाच्या आड जरा कुणी येऊ द्या, तुम्ही त्या माणसाचं जीवनातलं महत्त्वच कमी करून टाकता. तेव्हा मोहभ्रमानं दुनियेसाठी वाहवत जाण्याचं व्यसन लागलं की त्याचा शेवट आघातातंच होतो. नातं तुटतं, नात्यांचे हेतू बदलतात, संदर्भ वेगळे होतात तेव्हा आपलेपणाच्या व्यसनानं ग्रासलेल्या माणसाला वास्तवाचा आघात सोसावाच लागतो. आघात जगाचे नसतात, आपलेपणाचेच असतात!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 2:20 am

Web Title: addiction
टॅग : Chaitanya Chintan
Next Stories
1 ५१. पत्त्यांचं व्यसन!
2 ५०. अदृश्य चौकट
3 ४९. सावली
Just Now!
X