News Flash

अरुण सिंह

अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून अरुण सिंह यांच्यावर काही आठवडय़ांत जबाबदारी सोपवण्यात येईल.

| March 4, 2015 01:01 am

अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून अरुण सिंह यांच्यावर काही आठवडय़ांत जबाबदारी सोपवण्यात येईल. परराष्ट्र सचिवपदी एस. जयशंकर यांची नियुक्ती झाल्यानंतर, भारत-अमेरिका संबंधांना अधिक गतिमान करण्याच्या मोहिमेसाठी योग्य व्यक्ती म्हणून सिंह यांच्यावर पंतप्रधानांनी विश्वास टाकला आहे. हा विश्वास एका अर्थाने त्यांच्या आजवरच्या कौशल्यपूर्ण कामगिरीची फलनिष्पत्तीच आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे २००८ ते २०१३ या काळात वॉशिंग्टनमध्ये भारतीय वकिलातीत राजनैतिक उपाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले होते. इस्रायलमध्ये २००५ ते २००८ दरम्यान त्यांनी भारताचे राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळली. सिंह हे सध्या फ्रान्समध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत. येत्या मेपर्यंत त्यांच्याकडे राजदूतपदाची सूत्रे दिली जातील. त्याआधी म्हणजे एप्रिल महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची पॅरिसमध्ये भेट होईल.  
सिंह हे १९७९च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी परराष्ट्र सेवेत येण्याचा निर्णय घेतला. १९८१ ते ८२ पासून रशियातील भारतीय वकिलातीतच असताना त्यांनी रशियन भाषा अवगत केली. त्यानंतर १९८८ पर्यंत अदिस अबाबा व टोकिओत उपसचिव म्हणून काम पाहिले. तेथून भारतात परतल्यानंतर पूर्व आशियाई देश आणि पाकिस्तानसाठीच्या सेवेत त्यांनी उपसचिव, उपसंचालक म्हणून सेवा बजावली. परराष्ट्र मंत्रालय कार्यालयाचे प्रमुख म्हणून त्यांची १९९१ ते ९३ या काळात नियुक्ती झाली होती. संयुक्त राष्ट्रांतील भारतीय दूत म्हणून त्यांनी १९९७ पर्यंत अनेक देशांशी मसलती केल्या.  २००० ते २००५ हा कालावधी त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा ठरला. याच काळात त्यांनी सहसचिव म्हणून संयुक्त राष्ट्रांपुढे भारताची धोरणे मांडण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणच्या परराष्ट्र खात्याशी भारताचे संबंध व्यापक आणि दृढ करण्यावर भर दिला. २८ एप्रिल २०१३ रोजी त्यांच्याकडे फ्रान्समधील भारताचे राजदूत म्हणून नवी जबाबदारी सोपवण्यात आली. सिंह यांनी या काळात फ्रेंच आणि हिब्रू भाषेचा अभ्यास केला. भाषेच्या मदतीने भारताचे संबंध अधिक घट्ट करणारा मुरब्बी म्हणून अरुण सिंह यांनी आपली छाप परराष्ट्र खात्यावर पाडली आहे. अमेरिकेच्या व्यापार संस्कृतीत प्रवेश करताना सिंह यांच्यावरील ही जबाबदारी बऱ्याच अंशांनी वाढलेली असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2015 1:01 am

Web Title: arun singh named new indian ambassador to united states
Next Stories
1 यासर केमाल
2 डॉ. मीरा कोसंबी
3 इसाक मुजावर
Just Now!
X