निमिषभरात मिळणाऱ्या शांतीनंदेखील मन किती शांत होतं, त्याची शक्ती किती व्यापक होते, हे जाणवू लागलं, की मग उपासनेची गोडी वाटू लागेल. मग उपासनेचा अभ्यास अधिक नेमानं होईल, अधिक प्रेमानं होईल. तो अभ्यास कोणता, हे ९१व्या ओवीत सांगितलं आहे, तो पाहण्याआधी या अभ्यासानं काय साधतं, हे सांगणारी ९२वी ओवी प्रथम पाहू. स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ९२वी ओवी, या अभ्यासाची परिपूर्ती कशात होते, हे दाखवते. ही ओवी सांगते की, ‘‘ऐसें नेणो काय आपैसें। तयातेंचि कीजे अभ्यासें। समाधि घर पुसे। मानसाचें।। ९२।।’’ (ज्ञा. अध्याय ६, ओवी ४६१). म्हणजे, ध्येय इतक्या सहजतेनं गाठलं जाऊ शकतं का? तर हो, त्यासाठी अभ्यास मात्र अनिवार्य आहे. अभ्यास अंगवळणी पडला की समाधीच जणू त्याच्या मनाचा शोध लावत येते! म्हणजे या अभ्यासानं सहज समाधी साधणार आहे! आता हा अभ्यास काय आहे? हा अभ्यास स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ९१व्या ओवीत सांगितला आहे. ही ओवी अशी : ‘‘बळियें इंद्रियें येती मना। मन एकवटे पवना। पवन सहजें गगना। मिळोंचि लागे।। ९१।।’’ (ज्ञा. अध्याय ६, ओवी ४६०). या ओवीचा प्रचलित अर्थ असा की, ‘‘बलवान इंद्रिये मनाच्या अधीन होतात, मन प्राणवायूशी एक होते आणि प्राणवायू अनायासे मूध्र्निआकाशास मिळू लागतो.’’ सोऽहं साधनेच्या अंगाने या ओवीचा सखोल विचार केला जातो आणि यातील योगरहस्याचाही मागोवा घेतला जातो. सोऽहं साधनेबाबतचं मार्गदर्शन हे प्रत्यक्ष जाणत्या मार्गदर्शकाकडूनच घेतलं पाहिजे आणि अभ्यासिलं पाहिजे. अशोकानंद रेळेकर यांची सोऽहं साधनेवरील दोन अनुभवसिद्ध पुस्तके स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने प्रकाशित केली आहेतच. या ओवीपुरता आपण सोऽहंच्या अंगाने आणि त्यापलीकडेही अगदी संक्षेपानं विचार करणार आहोत. हा सोऽहं काय आहे हो? आपल्या श्वासोच्छ्वासाकडे नीट लक्ष दिलं तर जाणवेल आत श्वास घेतला जातो तेव्हा ‘स:’ आपोआप होत असतो आणि तो बाहेर टाकला जाताना ‘ह:’ आपोआप होत असतो. ‘ध्यानयोगरहस्य’ या ग्रंथात यालाच सहज सुरू असलेला अजपाजप म्हटलं आहे. स्वामीही सांगतात की, ‘‘नाभीपासूनी ब्रह्मरंध्रात। सोऽहम् ध्वनि असे खेळत। तेथे साक्षेपें देऊनि चित्त। रहावें निवांत घडी घडी।।’’ या शरीराच्या खोळीत हा जो सोऽहं आपोआप सुरू आहे, त्याकडे साक्षेपानं अगदी सावधचित्त होऊन लक्ष द्यायला स्वामी सांगत आहेत. आता जेव्हा असं लक्ष द्यायला लागू तेव्हा काय होईल हो? जगाकडचं लक्ष आपोआप आत एकवटेल! स्थूलातून सूक्ष्माकडे आपोआप वळेल. स्थूल इंद्रियांत गुंतलेलं मन आत वळेल आणि मन त्या सोऽहंशी इतकं एकरूप होत जाईल की, आपोआप ते गगनात मिसळेल! हे गगन काय आहे हो? नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत जात असलेल्या सोऽहंकडे लक्ष जाईल तेव्हा मन ऊध्र्वगामी होत मस्तकातील अवकाशात एकरूप होत जाईल. यालाच मस्तकाकाश, महदाकाश म्हणतात.